September 15, 2024
चाट

हेल्दी झुणका भाकरी चाट | जुईली खर्डेकर, पुणे | Healthy Zunka Bhakri Chat | Julie Khardekar, Pune

हेल्दी झुणका भाकरी चाट

साहित्य॒: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बेसन, १ कांदा, ४/५ लसूण पाकळ्या, तेल, १  वाटी पाणी, प्रत्येकी आवश्यकतेनुसार मीठ, शेव, चाट मसाला, किसलेले गाजर, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा व पात, /वाटी भाजलेले शेंगदाणे, /वाटी चिंचेची चटणी, /वाटी हिरव्या मिरचीची चटणी, २-३ चमचे तेल घालून पातळ केलेला ठेचा, कोथिंबीर, कढीपत्ता.

कृती: पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घाला आणि उकळत ठेवा. पाणी उकळायला लागले, की त्यात ज्वारीचे पीठ घाला आणि उकड काढा. ५ मिनिटे झाकून ठेवा, नंतर चांगले मळा. मळून झाल्यावर छोटा गोळा घेऊन परत मळून घ्या व त्याची छोटी पोळी लाटून घ्या. गरम तव्यावर ही भाकरी टाका व खालची बाजू थोडीशी भाजून घ्या, पाणी लावू नका. दुसरीकडे फोडणीची कढई उलटी करून गरम करा. त्यावर ही भाकरी टाकून मंद भाजा. दुसऱ्या पातेलीत फोडणी करून त्यात लसूण तुकडे घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. हळद, तिखट, कढीपत्ता, कोथिंबीर व मीठ घाला. बेसनमध्ये पाणी घालून भज्यांच्या पिठाप्रमाणे पेस्ट करा व ती कांद्यावर घाला व हलवून चांगले शिजवून घ्या. घट्टसर गोळा होईल. चांगली वाफ आणून शिजवा. थंड झाल्यावर हा गोळा किसणीने किसा. भाकरीच्या कटोरीला ठेच्याचे बोट फिरवून त्यावर किसलेले पिठले घाला. त्यावर बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, थोडी कांद्याची पात, थोडी-थोडी चिंचेची चटणी, हिरवी चटणी, शेव व शेंगदाणे घाला. वरून कोथिंबीर घाला व चाट मसाला भुरभुरा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जुईली खर्डेकर, पुणे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.