निवृत्ती

निवृत्तीचा काळ सुखाचा! | कौस्तुभ जोशी | Happy Retirement | Koustubh Joshi

निवृत्ती चा काळ सुखाचा!

आयुष्यभर कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करता यावा, यासाठी पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन आवश्यक आहे. कमाईची सुरुवात होते तसतसे खर्चही वाढू लागतात. कधी गरज नसताना खर्च केला जातो, नव्हे करणे भाग पडते. वय वाढत जाते तशा वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या बदलू लागतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यावर होणारा खर्च टाळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रसंगी चैनीच्या खर्चाकडे थोडेसे दुर्लक्ष करून तो पैसा योग्य ठिकाणी कसा गुंतवला जाईल, याचा विचार करायला हवा. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाल्यावर आपल्या हाती जास्त पैसे उरलेले नाहीत, असेही काही जणांना वाटू शकते. म्हणूनच निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात आपल्या कमावत्या वयातच करायला हवी.

पैशाचे गणित मांडू या

दरमहा घरातील सर्व सदस्यांच्या गरजा विचारात घेता आपल्याला खर्चासाठी किती पैसे लागतात, याचा अंदाज घ्या. बदलत्या तंत्रज्ञानाने हे काम सोपे केले आहे. हल्ली स्मार्टफोनमध्ये ‘एक्सपेन्स मॅनेजर’ तत्सम अॅप्लिकेशन्स असतात. रोजचे सर्व खर्च त्यात नोंदवू शकतो.

आकस्मिक निधीची तरतूद

तुमच्या दरमहा खर्चाच्या सहा पट इतके पैसे आकस्मिक खर्चासाठी बाजूला ठेवा. उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबाला दरमहा ५० हजार रुपये खर्चासाठी लागत असतील तर तीन लाख रुपये तुमच्या आकस्मिक निधीमध्ये ठेवून द्या. हे पैसे राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्टात ठेवा. या निधीला कधीही हात लावू नका.

गुंतवणुकीचे पर्याय

पर्याय       जोखीम

सरकारी बँक >> सर्वात कमी

पोस्टातील योजना >> सर्वात कमी

पेन्शन योजना >> सर्वात कमी

शेअर बाजार >> अधिक

इक्विटी म्युच्यु. फंड >> अधिक

निवृत्तीनंतरच्या    गुंतवणुकीचा विचार करताना जोखीम आणि परतावा (रिटर्न्स)  याचा  विचार  केल्यास आपल्याला गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत हे समजते. जेवढी जोखीम कमी तेवढे त्यातून मिळणारे रिटर्न्ससुद्धा कमी असतात. तर जोखीम जास्त असल्यास मिळणारे रिटर्न्स जास्त असतात. आपल्याला गुंतवणुकीचा  कालावधी  १५-२० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक ठेवायचा असेल तर जास्त जोखीम असलेल्या आणि जास्त रिटर्न्स देणाऱ्या खात्रीशीर पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतील आणि त्यातून निवृत्तीनंतरचा निधी जमा होईल. आपल्या सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक कधी सुरू करावी, याचा सर्वमान्य नियम नसला तरीही बऱ्याचदा निवृत्तीचा काळ जवळ आल्यावर आपण गुंतवणूक केली पाहिजे असे वाटायला लागते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

चाळिशीच्या आत निवृत्ती नियोजन सुरू करा आणि निर्धास्तपणे आयुष्य जगा!

तिशीच्या   वयातच   निवृत्ती नियोजनाला सुरुवात केली तर उत्तम! पारंपरिक बँक आणि पोस्टातील ठेवी दीर्घकाळात त्यामानाने अत्यंत कमी रिटर्न्स देतात. जोखीम कमी आहे म्हणून बँका, पोस्ट ऑफिस किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवले जातात. पण महागाई दर वाढत असताना त्यापेक्षा कमी व्याज देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे नुकसान. त्याऐवजी काही प्रमाणात  म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड हा दीर्घकाळात उत्तम निधी जमा करणारा आश्वासक पर्याय आहे. त्यासाठी वेळेवर सुरुवात करणे आवश्यक आहे. रमेश आणि सुरेश या मित्रांच्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊ या. रमेशने दरमहा पाच हजार रुपये म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत सलगपणे वीस वर्षे गुंतवले आणि सुरेशने दहा हजार रुपये सलग दहा वर्षे गुंतवले. वार्षिक ११ टक्के परतावा गृहीत धरल्यास रमेशला ४० लाख रुपये मिळतील, तर सुरेशला दुप्पट रक्कम गुंतवूनही अवघे २२ लाख रुपये मिळतील! याचाच अर्थ आपल्याला सेवानिवृत्तीनंतर पुरेसे पैसे जमवायचे असतील तर जेवढ्या लवकर सुरुवात करू तेवढा अधिक निधी जमतो. चाळिशीमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केल्यावर ५५ वर्षे वय होईपर्यंत ‘अधिक जोखीम अधिक परतावा’ देणाऱ्या विश्वासार्ह योजनांमध्ये गुंतवणूक करावी आणि जसजशी निवृत्तीची वेळ जवळ येईल तसे जमलेले पैसे स्थिर उत्पन्नाच्या पर्यायांमध्ये वळते करावेत म्हणजे गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध होतात.

गुंतवणुकीच्या पर्यायांसाठी ‘शंभर वजा तुमचे वय’ हे गणित समजून घ्या. जर तुमचे वय ४५ असेल तर १०० - ४५ = ५५; म्हणजेच तुमच्या एकूण गुंतवणुकींपैकी ५५ टक्के रक्कम जोखीम असलेल्या पर्यायात योग्य सल्ल्यानुसार (इक्विटी शेअर्स, इक्विटी म्युच्यअल फंड्स) गुंतवू शकता. वय वाढत जाईल तसतसे गुंतवणुकीतील जोखीम असलेल्या पर्यायांचे प्रमाण कमी करावे.

गुंतवणूक करताना बँकेतील काही फिक्स   डिपॉझिट / मुदतबंद   ठेवी याबरोबरच म्युच्युअल फंडातील डेट फंड, लिक्विड फंड अशा पर्यायांचा अवश्य विचार करावा. या डेट, लिक्विड फंडातील गुंतवणुकी कमी जोखमीच्या असतात. त्यावरील परतावा कमी असला तरी एकूण पोर्टफोलिओच्या जोखीम सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गुंतवणूक लिक्विड फंडामध्ये असायलाच हवी.

आरोग्य विमा महत्त्वाचा

वृद्धापकाळात आजारी पडणे आणि वैद्यकीय उपचारांची गरज भासणे हे आता नित्याचे झाले आहे. गुंतवलेले पैसे औषधोपचारांसाठी वापरण्यापेक्षा वेळेत आरोग्य विमा घेणे लाभदायक ठरू शकते. तुम्ही इस्पितळात दाखल झाल्यावर तुमच्या उपचारांचा खर्च या योजनेतून केला जातो. कुटुंबातील व्यक्तींसाठी प्रतिव्यक्ती किमान दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा असणे अत्यावश्यक आहे. जसजसे आरोग्य खर्चाचे आकडे वाढतील, तशी विम्याची रक्कम वाढायला हवी.

मुदतबंद विमा

जीवन विम्याच्या अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या पारंपरिक योजनांमध्ये अगदीच कमी परतावा मिळतो आणि विम्याचे कवचही खूपच कमी असते. याउलट टर्म इन्शुरन्स अत्यंत स्वस्तात भरपूर विमा कवच देणारा पर्याय आहे. चाळिशीच्या आत या टर्म योजना सुरू करा. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान २० पट एवढा जीवन विमा प्रत्येक व्यक्तीकडे असला पाहिजे. समजा तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख असेल, तर तुम्ही एक कोटी रुपयांची शुद्ध टर्म विमा योजना विकत घेतली पाहिजे.

शेअर ट्रेडिंग आणि सेवानिवृत्ती

निवृत्तीची वेळ जवळ आल्यावर आपल्या हाताशी पैसा असायला हवा. अशा वेळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा निर्णय धोकादायक ठरू शकतो.कोणत्याही अवाजवी परतावा देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे टाळा. आयुष्यभर मेहनतीने कमावलेली तुमची रक्कम कोणाच्यातरी भिडेखातर ज्ञान नसताना शेअर बाजारात गुंतवणे हा चुकीचा निर्णय आहे. आपले पैसे कुठे गुंतवले जात आहेत, ते आपल्याला समजले पाहिजे.

घर पाहावे बांधून?

निवृत्तीच्या काही वर्षे आधी घर किंवा स्थावर मालमत्तेमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार अनेकदा केला जातो. जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर घर बांधणे किंवा महानगरात घर विकत घेण्याआधी एक विचार मनाशी स्पष्ट हवा. तो म्हणजे या गुंतवणुकीतून भविष्यात परतावा हवा आहे का? तुम्ही स्वतःला राहण्यासाठी किंवा मुलांसाठी म्हणून ही गुंतवणूक केलेली आहे का? या खरेदीमागील कारण समजून घेऊ या. गुंतवणूक म्हणून घर घेतले असल्यास त्यातून येणारे दरमहा घरभाडे तुमच्या अंदाजापेक्षा कमी यायला लागले किंवा काही कारणास्तव मालमत्तेचा बाजारभाव कोसळला तर तुमची निवृत्तीनंतरची सर्व गणिते कोलमडू शकतात.

मोहमाया के्रडिट कार्डची

क्रेडिट कार्डच्या मर्यादेपैकी आपण जेवढे पैसे वापरले आहेत, ते सर्व पैसे चुकते न करता कार्ड वापरत राहिल्यास त्यावर सज्जड व्याजदर आकारला जातो. हाच कार्ड कंपन्यांचा व्यवसाय आहे! कित्येकदा या सगळ्याची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे ग्राहकाला नाहक व्याजाचा भुर्दंड पडतो. यासाठीच एक मुद्दा पक्का डोक्यात बसवून घ्या. तो म्हणजे क्रेडिट कार्ड हा खर्च करण्यासाठी वापरायचा शेवटचा उपाय आहे!

अती आकर्षक लाभाच्या योजना (पॉन्झी स्कीम्स)

पोस्टाचे किंवा सरकारी बँकांचे व्याजदर किती असतात, याचा अंदाज घ्या. त्यापेक्षा अधिक व्याजदर जर एखादी व्यक्ती / कंपनी तुम्हाला देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्यापासून चार हात दूरच राहा. एकदाच पैसे भरून दर महिन्याला आकर्षक व्याजदर देणाऱ्या कंपन्या अचानक नाहीशा झाल्या, त्यांची दिवाळखोरी आली तर आपल्याला आपले पैसे परत मिळण्याची शक्यता नसतेच. मग त्यामुळे येणारे पोलीसकेस, कोर्टकचेऱ्यांचे अनुभव घेत  बसण्यापेक्षा  अशा गुंतवणुका टाळलेल्याच बऱ्या!

निवृत्ती नियोजन पैशांचे, वेळेचे आणि गरजांचेही!

कुटुंबातील सर्वांच्या गरजांची पूर्तता करताना भविष्यकाळात आपल्या गरजांची पूर्तता कोण करेल, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा, तरच निवृत्तीनंतरचे नियोजन का महत्त्वाचे आहे हे समजेल. नोकरी किंवा व्यवसाय करायला लागल्यावर जेवढ्या लवकरात लवकर जमेल तशी गुंतवणूक करायला सुरुवात करावी. जसजसे वय वाढते तसतसे एकूण उत्पन्नापैकी जास्तीत जास्त पैसे निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी बाजूला काढले पाहिजेत. आपल्या स्थिर, समाधानी, यशस्वी, निर्धोक सेकंड इनिंगसाठी आपणच प्रयत्न करायला हवे, नाही का?

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कौस्तुभ जोशी

(लेखक अर्थशास्त्राचे प्राध्यापक, अभ्यासक  आणि वित्तीय नियोजनकार आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.