त्वचा | sunscreen | SPF | sunblock cream | skin cream

सनस्क्रीन आणि त्वचा | डॉ. मैथिली कामत | Sunscreen and Skin | Dr. Maithili Kamat

सनस्क्रीन आणि त्वचा

उन्हातून बाहेर जाताना त्वचेची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळे उन्हात घरातून बाहेर पडताना चेहऱ्याला सनस्क्रीन/एसपीएफ लावायला हवे. सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम सनस्क्रीन करते. यामुळे त्वचा टॅन होण्यापासून बचावते.

सनस्क्रीन म्हणजे काय ?

सनस्क्रीनला सनब्लॉक किंवा सनबर्न क्रीम असेही म्हणतात. उन्हापासून त्वचेचे रक्षण करणारे हे एक उत्पादन आहे. सूर्याच्या किरणांमुळे त्वचा भाजली (पोळली) जाते. सूर्यकिरणांच्या त्वचेवर होणाऱ्या परिणामांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम सनस्क्रीन लोशन/क्रीम करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचेचा रंग उजळ असलेल्या व्यक्तींना त्वचेचा कर्करोग होण्यापासून यामुळे प्रतिबंध होतो. लोशन, स्प्रे, जेल, फोम, स्टिक, पावडर अशा प्रकारात सनस्क्रीन उपलब्ध आहे.

सनस्क्रीन कसे वापरावे ?

त्वचेची काळजी घेण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणजे सनस्क्रीन वापरणे. अंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुतल्यानंतर आधी त्वचेला मॉइश्चरायझर लावावे आणि मग सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीनवर मेकअप किंवा टाल्कम पावडर लावता येते. त्वचेचा उघडा राहणारा जो भाग सूर्य प्रकाशाच्या थेट संपर्कात येईल, अशा सर्व भागांवर व्यवस्थित प्रमाणात सनस्क्रीन लावावे.

सनस्क्रीन कसे निवडावे ?

भारतीय त्वचेसाठी SPF (सन प्रोटेक्शन फॅक्टर) ३० किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन निवडावे. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी मॅट वा जेलचा बेस असलले सनस्क्रीन तर कोरडी किंवा मॅच्युअर त्वचा असल्यास पाणी व जेलचा बेस असलेले सनस्क्रीन वापरणे योग्य ठरते. एखाद्या व्यक्तीला त्वचेवरील डाग झाकायचे असतील तर टिन्टेड सनस्क्रीनही वापरता येऊ शकते. अशा प्रकारच्या सनस्क्रीनमुळे त्वचेचे संरक्षण होण्यासोबत चेहऱ्यावरील डागही लपले जातात.

सनस्क्रीन केव्हा वापरावे ?

उन्हाळा असो, पावसाळा असो वा हिवाळा; सनस्क्रीन दररोज लावायला हवे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळात उन्हातून बाहेर पडत असाल तर या वेळेत सनस्क्रीन लावायलाच हवे. सनस्क्रीन कितीही अधिक SPF असणारे असले तरी दर तीन तासांनी लावावे. पोहल्यानंतर, खूप शारीरिक काम केल्यानंतर, अतिघाम आल्यास किंवा टॉवेलने अंग पुसल्यानंतर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा. तुम्ही जर समुद्र किनाऱ्यावर असाल तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर डाग (पिगमेंट्स) असतील त्यांनी सनस्क्रीनच्या वापराबाबत दक्ष असावे. उन्हामुळे डागांची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. घराच्या आत असतानाही सनस्क्रीन लावा, कारण पारदर्शक काचेतूनही अतिनील किरणे
७५ टक्क्यांपर्यंत आत पोहोचतात. वातानुकूलित कारमधून प्रवास करणाऱ्यांनीही उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. बाहेर जाण्यापूर्वी कमीत कमी १५ मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. चेहरा, मान, हात यासह सर्व उघड्या भागावर सनस्क्रीन लावा.सूर्याच्या प्रकाशामुळे त्वचेला अपाय होऊ शकतो. त्वचेला होणाऱ्या अपायांपासून तसेच टॅनिंगपासून बचावासाठी सनस्क्रीनचा नियमित वापर करायला हवा.

सनस्क्रीन वापराचे फायदे

सनस्क्रीन वापराचे अनेक फायदे आहेत. भारतीयांची त्वचा सावळी आहे. जेव्हा उन्हाच्या किंवा सूर्यकिरणांच्या संपर्कात ही त्वचा येते (यूव्हीए व यूव्हीबी किरणे) तेव्हा त्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या अपायापासून सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करते. त्वचेवर यूव्ही किरण पडल्याने त्वचा टॅन होते म्हणजे ती निस्तेज होते, त्वचेचे वय लवकर वाढते (एजिंग) आणि डागही पडतात. सनस्क्रीन नियमितपणे वापरले तर त्वचा नितळ, समतल राहते आणि त्वचेचा पोत एकसमान राहून त्वचा तरुण राहते.

प्रतिबंधात्मक उपाय

काही जणांना उपचार म्हणून सनस्क्रीन लावावे लागते. ज्या व्यक्तींना ल्युकोडर्मा आहे, त्यांना त्वचेचा कर्करोग होऊ नये यासाठी सनस्क्रीन लावावे लागते. त्याचप्रमाणे उन्हाचा त्रास होत असलेल्या म्हणजे ल्युपसच्या रुग्णांना सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावावे लागते. ज्या व्यक्तींना ल्युकोडर्मा (व्हिटिलिगो) आहे त्यांनी त्वचेचा कर्करोग होऊ नये यासाठी सनस्क्रीन काळजीपूर्वक लावावे. ज्यांची त्वचा पांढरी असते आणि कमी मेलॅनिन पिगमेंट असतात त्यांना सूर्यकिरणांच्या संपर्कामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. ल्युपस, सन एक्झेमा यांसारखे आजार झालेल्या रुग्णांनीही त्वचेचे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

साइड इफेक्ट्स

सनस्क्रीन वापराचे फायदे जास्त आहेत, तोटे अगदीच नगण्य आहेत. सनस्क्रीनमुळे क्वचितच अॅक्नेची समस्या उद्भवते किंवा त्वचा चुरचुरते, लाल होते, पोळते. त्वचेवर पुरळ आले, लाल झाली किंवा जळजळ झाली तर लगेचच तुमच्या त्वचाविकारतज्ज्ञाशी (स्किन
स्पेशालिस्ट) संपर्क साधा. संवेदनशील त्वचेसाठी कोणते सनस्क्रीन वापरावे, याची निवड करण्यासाठी तुमचे त्वचाविकारतज्ज्ञ तुमची मदत करतील.

सनस्क्रीन डोळ्यात गेले तर जळजळ होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांभोवती सनस्क्रीन लावताना काळजी घ्या. पापण्यांच्या वरील भागावर सनस्क्रीन लावणे टाळा.

सनस्क्रीन कोणते निवडावे ?

सनस्क्रीन निवडताना ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीनची निवड करावी. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे यूव्हीए व यूव्हीबी या दोन्ही अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याची क्षमता असलेले सनस्क्रीन. किमान ३० SPF असलेले सनस्क्रीन निवडावे. SPF ३० सनस्क्रीन सामान्य पातळीचे असते. सनस्क्रीनची ही पातळी सर्व वयोगटांसाठी आणि त्वचेच्या प्रकारांसाठी योग्य ठरते. तुम्ही अधिक वेळ उन्हात, घराबाहेर घालवणार असाल तर त्याहून अधिक SPF असणारे सनस्क्रीन निवडा.

त्वचाविकारतज्ज्ञ वॉटरप्रूफ सनस्क्रीनची शिफारस करतात, म्हणजे ओल्या किंवा घामेजलेल्या त्वचेवरही सनस्क्रीन काही काळ टिकून राहू शकते. वॉटरप्रूफ सनस्क्रीन ४० ते ८० मिनिटे टिकून राहते. सगळीच सनस्क्रीन्स वॉटरप्रूफ नसतात.

सनस्क्रीन नियमितपणे वापरल्याचे काही फायदे निश्चितच असतात. जेव्हा त्वचा सूर्यकिरणांच्या (अतिनील ए व अतिनील – बी म्हणजेच यूव्हीए, यूव्हीबी किरणे) संपर्कात येते तेव्हा सोलर डॅमेज (सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणारा अपाय) होतो. सनस्क्रीन नियमितपणे लावल्याने त्वचा चांगली राखण्यास मदत होते. सूर्यकिरणांच्या प्रतिकूल परिणामाला प्रतिबंध करण्यास सनस्क्रीनमुळे मदत होते. भारतीय सावळ्या त्वचेचा यूव्ही किरणांशी संपर्क आल्यास खालील परिणाम होतो :

* टॅनिंग

* निस्तेज आणि त्वचेचा टोन असमान होणे

* मुदतपूर्व वार्धक्य

* पिगमेंटेशन

* त्वचेच्या पेशींमधील डीएनएचे नुकसान होते.

* भारतीय त्वचेसाठी SPF ३० हून अधिक असलेली सनस्क्रीन सुयोग्य असतात. ज्या व्यक्तींची त्वचा तेलकट आहे त्यांनी मॅट किंवा जेलचा बेस असलेले सनस्क्रीन वापरावे तर कोरडी वा मॅच्युअर त्वचा असलेल्यांनी पाणी व जेलचा बेस असलेली सनस्क्रीन वापरावी. उन्हात अधिक काळ राहायचे नसल्यास सकाळी लावलेले सनस्क्रीन दिवसभराच्या संरक्षणासाठी पुरेसे आहे.

* आंघोळ केल्यावर/चेहरा धुतल्यावर त्वचेला आधी मॉइश्चरायझर लावावे आणि मग त्यावर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन लावल्यानंतरही उन्हात जाताना चेहरा झाकायला हवा.  सनस्क्रीनसह रुंद कडा असलेली हॅट, सनग्लासेस आणि पूर्ण बाह्या असलेल्या कपड्यांमुळेही उन्हापासून संरक्षण होते. कोणतेही सनस्क्रीन उन्हापासून तुमच्या त्वचेचे १०० टक्के संरक्षण करू शकत नाही.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. मैथिली कामत

(लेखिका अनुभवी डर्माटोलॉजिस्ट, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.