हॉटपॉट | शेफ निलेश लिमये | Hotpot Recipe

Published by शेफ निलेश लिमये on   January 18, 2020 in   2020Food Corner

 

हॉटपॉट

चीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये चिकन, भाज्या मिक्स करतो. पाणी उकळत राहते. त्यात हे मटण, भाज्या शिजतात. त्या पाण्याचा अप्रतिम चवीचा स्टॉक तयार होत असतो. मग लोक आपल्या आवडीप्रमाणे हा स्टॉक घेतात. आपण घातलेल्या भाज्या, चिकन, मटण आणि नूडल्स सूप बोलमध्ये घेतात, त्यात सॉसेस घातले जातात. गप्पा मारता मारता या हॉटपॉट पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. एक चविष्ट पदार्थ आपणच शिजवायचा आणि आपणच त्याचा आनंद घ्यायचा. ही अशी खास रेस्तराँ चीन मध्ये पाहायला मिळतात.

साहित्य : ६ कप व्हेज स्टॉक,  ४१/४ इंच आले (जाडसर सोलून घेतलेले), २-३ लसूण पाकळ्या, २ छोटा चमचा  तेल, ११/२ कप मशरूम (साफ केलेले), १/४ छोटा चमचा रेड पेपर, १ पोक चोय लहान आकाराचे, १०० ग्रॅम व्हीट नूडल्स, ५० ग्रॅम टोफू, १ कप गाजर किसलेला, २ छोटा चमचा सोया सॉस, २-४ छोटे चमचे व्हिनेगर, १ छोटा चमचा तिळाचे तेल, मीठ चवीनुसार.

सजावटीकरिता : १/४ पांढरा पातीचा कांदा.

कृती : एका भांड्यात व्हेज स्टॉक, आले व लसूण घालून दहा-पंधरा मिनिटांकरिता मध्यम आचेवर उकळवून घ्या. मिश्रणातून आले व लसूण नंतर काढून टाका. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात मशरूम व रेड पेपर घालून शिजवून घ्या. आता पोक चोयच्या काड्या घाला. मशरूमचे मिश्रण तयार स्टॉकमध्ये घालून एकत्र करा. त्यात व्हीट नूडल्स घालून मध्यम आचेवर चार-पाच मिनिटांकरिता शिजवून घ्या. त्यात पोक चोयचा हिरवा भाग व टोफू घालून शिजवून घ्या. गाजर,चवीनुसार मीठ, व्हिनेगर, सोया सॉस व तिळाचे तेल वरील मिश्रणात घाला. पातीचा पांढरा कांदा घालून गरम सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शेफ निलेश लिमये