September 19, 2024
पूर्वतयारी | pre planning | kitchen ready

अशी करा स्वयंपाकाची पूर्वतयारी | शामल देशपांडे | Getting the kitchen ready before cooking | Shamal Deshpande

अशी करा स्वयंपाकाची पूर्वतयारी

शहरातील असो वा ग्रामीण भागातील; महिलांना अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागते. अगदीच तसे नसले तरी घरात अनेक जबाबदाऱ्या असल्याने गृहिणीला सकाळी कमी वेळेत स्वयंपाक करताना तारेवरची कसरत करावी लागते. वेळेचे गणित जमवण्यासाठी हाताशी कितीही अत्याधुनिक उपकरणे असली, तरी स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवणे महत्त्वाचे ठरू शकते. किचनमधील काही कामांची पूर्वतयारी केल्यास स्वयंपाक झटपट आणि वेळेत तर होतोच, शिवाय पदार्थ बिघडण्याची भीती किंवा ऐनवेळी होणारी गडबडही टाळणे शक्य होते. दिवसभरातील किंवा सुट्टीच्या दिवसाचा काही वेळ स्वयंपाकाच्या पूर्वतयारीला दिला, तर रोज स्वयंपाक काय करायचा हा यक्षप्रश्न सोडवणे सहज शक्य होते. उलट, स्वयंपाक करण्याचा आनंदही घेता येतो आणि शांत मनाने काम करता येते. उत्तम नियोजनामुळे सकाळचे काम तणावविरहित होते, त्यामुळे संपूर्ण दिवस उत्साहात जातो. कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखादे दिवशी काही खास पदार्थ करायचा असेल तर स्वयंपाकाचे नियोजन गरजेचे ठरते.

अशी करा पूर्वतयारी :

* आपल्या कुटुंबातील सदस्य, त्यांच्या आवडीनिवडी आणि पथ्यपाणी लक्षात घेऊन दररोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करावे. हे नियोजन आदल्या दिवशीच करणे सोयीचे ठरते.

* आठवडाभर नाश्त्यासाठी काय बनवायचे किंवा जेवणात कोणत्या भाज्या करायच्या, सकाळ-रात्रीच्या जेवणासाठी कोणता मेन्यू करायचा याचा एक लहानसा तक्ता करावा. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी त्या-त्या पदार्थासाठी लागणाऱ्या जिन्नसांची जुळवणी अथवा खरेदी करता येते.

* आपल्याकडे भाज्यांमध्ये वाटण,
शेंगदाण्याचा किंवा तिळाचा कूट घातला जातो. त्यासाठी शेंगदाणे, तीळ भाजून त्याचा १०-१५ दिवस पुरेल असा कूट आधीच तयार करून ठेवावा. सुके खोबरे किसून ठेवावे. नारळ फोडून खोबरे किसून किंवा त्याचे काप करून ते फ्रीजरमध्ये ठेवून द्यावे. गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो.

* वाटणासाठी कांदा, लसूण, सुके खोबरे वेगवेगळे भाजून घेऊन त्याचे वाटण तयार करावे. पनीर, छोले किंवा इतर काही पदार्थांमध्ये हे वाटण वापरत नाही. त्यांना कांदा-टोमॅटोची प्युरी लागते. त्यासाठी कांदा, लसूण आणि टॉमेटो याचे वेगळे वाटण तयार करून डब्यामध्ये भरून ठेवावे.

* गुळाची ढेप किंवा मोठा तुकडा असेल तर बारीक चिरून ठेवावा. पिठीसाखर लागत असल्यास तयार करून डब्यात भरून ठेवावी.

* पुदिना, चिंच-गूळ यांची चटणी करून ठेवावी. कोरड्या चटण्या बनवून ठेवा. अचानक पाहुणे आले तर चाटची एखादी रेसिपी झटपट बनवता येते.

* कोथिंबीर किंवा अळूच्या वड्या करण्याचा बेत असल्यास आदल्या रात्रीच त्याची तयारी करून, उंडा उकडून घेणे. उंडा थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा. आयत्या वेळी वड्या चिरून तळून घ्या.

* १५ दिवस पुरेल एवढी धणे-जिरेपूड, मिरपूड, आले-लसूण पेस्ट एकदाच करून ठेवावी.

* पोहे चाळून निवडून ठेवावेत. रवा कोरडा भाजून ठेवावा, यामुळे त्याला कीड लागत नाही व ऐनवेळी चाळण्या-भाजण्याचा वेळ वाचतो. रवा, शेंगदाणे, तीळ किंवा इतर जिन्नस एकाच वेळी भाजल्याने पदार्थ बनवते वेळी जास्त भांडी लागत नाही आणि पसाराही
कमी होतो.

* वाटणासाठी, भाजीसाठी चार-पाच दिवस पुरेल इतका लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होत नाही.

* आठवडाभर लागणारी भाजी सुट्टीच्या ‍दिवशीच आणून फ्रीजमध्ये ठेवावी. आले, लिंबू, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टॉमेटो हे आठवडाभरासाठीचे एकदम आणून ठेवावे.

* आठवडाभर लागणाऱ्या फळभाज्या जसे की ब्रोकोली, लाल भोपळा, शेवग्याची शेंग, सिमला मिरची स्वच्छ धुऊन कापून वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवा. पनीरचे तुकडे करून ते डब्यात भरून ठेवा. घरी पनीर असल्यास झटपट चिली पनीर किंवा पनीरची भाजी बनवता येते. या कापलेल्या भाज्या सांबार किंवा पुलाव बनवण्यासाठीही उपयोगी पडतात.

* पालेभाज्या निवडून वर्तमान-पत्रात गुंडाळून किंवा प्लास्टिक डब्यात भरून ठेवल्याने त्या खराब होत नाहीत. तसेच घाईच्या वेळी भाज्या निवडण्यात वेळ जात नाही. पालक चांगला धुऊन त्याची पेस्ट करून ठेवावी. पालकाची पेस्ट तयार असेल तर झटपट पालक-पनीर किंवा पालक पुलाव बनवू शकतो.

* दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचे असल्यास भाजी चिरून त्यात फोडणी, वाटण, मसाले, मीठ घालून ही कच्ची भाजी एअरटाइट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी उठल्यावर अर्धकच्ची फ्रीजमधून बाहेर काढा आणि पाणी टाकून शिजवा.

* बटाटे उकडून, थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा. यामुळे कमी वेळेत बटाट्याची भाजी बनवता येते किंवा आयत्या वेळी चाट, टिक्की बनवताना वेळेचा खोळंबा होत नाही. बटाट्याप्रमाणे मकाही उकडून ठेवू शकता.

* गाजर सोलून त्याचे छोटे तुकडे करून डब्यात भरून ठेवा. उपमा, पुलाव किंवा सलाड बनवण्यासाठी हे उपयोगी पडते.

* हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्या धुऊन, पुसून कोरड्या सुती कापडात गुंडाळून ठेवल्यास बरेच दिवस टिकतात. मिरच्यांप्रमाणेच कढीपत्ताही धुऊन, सुकवून ठेवावा.

* आल्याचे छोटे-छोटे तुकडे करून स्वच्छ धुऊन काचेच्या बरणीत ठेवा. सकाळी गडबडीच्या वेळी चहामध्ये आले घालण्यास उपयोगी पडते.

* आठवड्याचे नियोजन करून डाळ धुऊन, शिजवून डाळीचा घट्ट गोळा तयार करून ठेवा. अचानक पाहुणे आल्यास दालफ्राय किंवा दाल तडका बनवता येऊ शकतो. अधिक डाळ शिल्लक राहिल्यास पीठ मळताना त्यात डाळ घालून डाळीचा पराठा बनवता येतो.

* दुसऱ्या दिवशी लागणारी कडधान्ये आदल्याच रात्री कुकरमध्ये किंवा कुकरच्या डब्यात भिजवून ठेवावीत, म्हणजे सकाळी ती उकडताना भांड्यांचा पसारा वाढत नाही आणि कडधान्ये उकडणे सोपे जाते.

* आठवड्याच्या नियोजनात उसळ किंवा कडधान्यांची भाजी बनवायची असल्यास शनिवारी रात्रीच आठवड्याला लागणारी विविध कडधान्ये वेगवेगळी भिजत घालून ठेवा. कडधान्य अशीच वापरायची असल्यास दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये सर्व कडधान्ये वेगवेगळी उकडून घ्या. कडधान्ये थंड झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. मोड आलेली कडधान्ये हवी असल्यास त्याला मोड आणून ती डब्यात भरून ठेवावी. अचानक पाहुणे आले किंवा नेहमीच्या जेवणाचा कंटाळा आला असल्यास मोड आलेल्या कडधान्याची भाजी किंवा उसळ करता येईल.

* रात्री शक्यतो किचनचा ओटा पुसून स्वच्छ करून ठेवावा. दुसऱ्या दिवशी लागणारे ओट्यावरचे, भांडी पुसण्याचे, हात पुसण्याचे नॅपकिन तयार ठेवावे. ओटा रात्रीच स्वच्छ केला असल्यास सकाळी कामाला हुरूप येतो. दुसऱ्या दिवशी लागणारी भांडी, सुरी, चॉपिंग बोर्ड, तवा घासून-पुसून तयार ठेवावा.

* स्वयंपाक करताना प्रथम एक पदार्थ केला, मग थोड्या वेळाने दुसरा पदार्थ केला, असे शक्यतो करू नये. एकाच वेळी स्वयंपाक पूर्ण करून घ्यावा. गॅस शक्यतो रिकामा राहणार नाही, असेही पाहावे. फूड प्रोसेसर किंवा हाताने कणीक मळताना समोर दूध गरम करायला ठेवल्यास काम करता करता त्याकडे लक्ष देता येते किंवा भाजी चिरण्यापूर्वी वरणाला फोडणी द्यावी, म्हणजे भाजी चिरण्याच्या वेळेत वरणाला उकळी येऊन वरण तयार होते.

* कणीक शक्यतो प्रथम मळून घेतल्यास इतर कामे करेपर्यंत ती चांगली मुरते. यामुळे पोळ्या मऊ होतात. आपल्याला पीठ चाळण्याची सवय असल्यास गहू दळून आणले की एकदम पीठ चाळून ठेवावे.

* कुकर लावण्यापूर्वी डाळ-तांदूळ काढून ठेवावेत. शक्यतो डाळ १० ते १५ मिनिटे आधी भिजवून ठेवल्यास भाताबरोबर चटकन शिजते.
(डाळ, तांदूळ आधीच निवडून ठेवावेत.)

* भाजी चिरून झाली की फोडणी टाकण्यापूर्वीच मसाल्याचा डबा, चिरून ठेवलेला कांदा, लसूण अथवा भाजीला लागणारे साहित्य हाताशी ठेवावे. मगच फोडणी द्यावी म्हणजे ऐनवेळी जिन्नसांची शोधाशोध करेपर्यंत फोडणी जळत नाही. मसाल्याच्या डब्यातील सारे जिन्नस पुरेसे आहेत की नाही, हेही रात्रीच पाहून ठेवा.

* भाजी चिरताना होणारा कचरा ओट्यावर तसाच न ठेवता त्यासाठी रद्दी कागद किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी जवळ ठेवावी. भाजी चिरून झाल्यानंतर कचरा उचलून लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकावा. त्यामुळे ओट्यावर पसारा होत नाही. कणीक मळताना आणि पोळ्या लाटताना परातीखाली/पोळपाटाखाली सुती कापड घेतल्यास कणीक सांडून पसारा होत नाही. ही काळजी घेतल्यास स्वयंपाकानंतर ओटा आवरताना जास्त वेळ खर्च होत नाही.

* ज्या वस्तू अथवा भांड्यांचे काम झाले ती लगेच जागेवर ठेवावी, नाहीतर पसारा आवरायलाच खूप वेळ लागेल.

* सुट्टीच्या दिवशी आठवडाभर लागणारे किंवा संपलेले पदार्थ जसे की तूप, साखर, चहापावडर, मसाले आदी डब्यात काढून ठेवावे

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 शामल देशपांडे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.