स्वप्ने | Dream | Motivation | Success | Self Help

मोठी स्वप्ने पाहा | अविनाश धर्माधिकारी | Dream Big | Avinash Dharmadhikari

मोठी स्वप्ने पाहा

आपल्या जीवनाविषयी आपण काय संकल्प सोडतो, याचा पुढे आपले जीवन घडण्यावर फार मोठा प्रभाव पडतो. जीवनाविषयीचा आपला संकल्प जर असा असेल, की मला चार ‘बुकं’ शिकायची आहेत, मग नोकरी, मग लग्न, मग मुलेबाळे… आपल्या अभंगात तुकोबाराय म्हणतात तसे, ‘जन्माला आला नि हेला घालुनी मेला.’

जीवनाचा संकल्पच जर असा असेल, तर तसाच आकार जीवनाला येण्याची शक्यता अधिक. याचा अर्थ, या संकल्पनेत काही कमी आहे, असे नाही.मात्र जीवनाविषयीचे संकल्प मोठे असतील तर येणारा आकारसुद्धा मोठा  असू  शकतो.  मराठीतले, जागतिक साहित्यातले सार्वकालीन श्रेष्ठ म्हणावेत असे लेखक जयवंत दळवी एकदा म्हणाले होते,॒‘सोळाव्या वर्षी आयुष्याविषयी जे स्वप्न आपण पाहतो, त्या स्वप्नाच्या प्रकाशात आपण आपले आयुष्य जगतो.’

हाच अर्थ आणखी एका वेगळ्या, व्यापक पद्धतीने सांगणारे विधान, इंग्रजी भाषेतील सार्वकालिक श्रेष्ठ कवी शेली याने केले आहे. शेली म्हणतो, ‘तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत हे मला सांगा; मी तुम्हाला त्या देशाचे भवितव्य सांगतो!’

दोन्हींचा मिळून एक अर्थ आपल्या डोळ्यांसमोर येतो, की जीवनाविषयीची भव्य, मोठी, सृजनशील स्वप्ने पाहिली तर आपल्या जीवनाला, समाजाला आणि देशालासुद्धा भव्य, सृजनशील आकार येणे शक्य आहे.

बाबा आमटे म्हणतात तसे, ‘अशी सृजनशील साहसे हवी आहेत, की जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्यांना अमलात आणतील!’

अशी स्वप्नेच आपल्याला मोठे करतात. म्हणून मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.

कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक जाणिवा, ह्या भाषा आणि वाक्प्रचारातून व्यक्त होतात. मला दुःखद वाटणारा मराठी वाक्प्रचार आहे, ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’॒किंवा॒‘बिकट वाट वहिवाट नसावी,॒धोपट मार्गा सोडू नको.’॒या दोन वाक्प्रचारांचा अर्थ होतो, की छोटाच विचार कर.उगीच फार मोठ्या उड्या मारण्याची भाषा करू नको. आपले अंथरूण पाहून पाय कितपत पसरायचे ते ठरव. सुदैवाने मराठीतले, सर्वार्थाने जागतिक दर्जाचे महान उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांनी आपल्या जगण्यातून, उद्यमशीलतेतून या म्हणीला उत्तर दिले. त्यांनी आपल्याला शिकवले, की ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ हा विचार आपण सोडून दिला पाहिजे. उलट पाय किती पसरायचे याची योजना करून, त्यानुसार अंथरूण निर्माण करण्याची जिद्द बाळगली पाहिजे !

‘धोपट मार्गा सोडू नको’ म्हणजे जीवन जगण्याची एक अविरोध, सोपी पायवाट. म्हणे की, कसा जग? तर Line of least resistance नुसार. आयुष्यात फार संघर्ष, अडचणी नकोत. बिकट वाट वहिवाट नसावी. त्यावरही आता हे म्हणण्याची वेळ आली आहे, की उलट नवनव्या वाटा शोधल्या पाहिजेत. नव्हे, आपल्या कृतीतून नवनव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत! त्यासाठी संघर्ष, अडचणी, आव्हाने अंगावर घेण्याची तयारी असावी. ‘अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ’ हाही मराठीच वाक्प्रचार की! या जिद्दीने मोठी स्वप्ने पाहत जीवन जगले पाहिजे. म्हणून आता म्हटले पाहिजे, ‘बिकट वाट वहिवाट असावी, धोपट मार्गा धरू नको.’तुझ्या उत्तुंग प्रयत्न आणि जिद्दीतून मोठ्या, असामान्य कर्तृत्वाला आकार येऊ दे, अशी स्वप्ने बघायला हवी.

एक इंग्रजी म्हण आहे, ‘Not failure, but lower aim is crime!’ अपयश हा अपराध नाही, तर ध्येय, संकल्प, स्वप्ने छोटी असणे हा अपराध आहे. इंग्रजीतून व्यक्त होणारी सांस्कृतिक जाणीव म्हणते, ‘God helps those who help themselves.’॒जे स्वतःची मदत करतात, ईश्वर त्यांची मदत करतो. खरे म्हणजे, भाषेमधून व्यक्त होणाऱ्या सामूहिक सांस्कृतिक जाणिवेबद्दल म्हणायचे, तर ‘प्रयत्नांती परमेश्वर’ किंवा ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही देखील सांस्कृतिक जाणीव मराठीतून व्यक्त होतेच की! ती आपल्या जीवनात व्यक्त करणे म्हणजेच मोठी स्वप्ने पाहणे.

जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडला. अशाच सोळाव्या वर्षी उभ्या मानवतेची ‘माउली’ झालेल्या ज्ञानोबा माउलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सिद्ध केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीसुद्धा वयाच्या सोळाव्या वर्षी ‘मायभूमीच्या॒स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ असा॒संकल्प सोडून आपल्या आयुष्याला आकार देत देशाच्या इतिहासालाही आकार दिला.

अशी मोठी स्वप्ने तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पाहता येतात. आधुनिक मराठीतले, महान कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, यांना त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच साक्षात्कार झाला होता, की आपण आयुष्यात काही होऊ शकतो तर तो कवीच! आपल्या स्वतंत्र कर्तृत्वातून मोठा उद्योगसमूह उभा करणारे ‘बी. जी.’ (बाबुराव शिर्के) यांनीसुद्धा सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात लहानाचे मोठे होताना, स्वतःचा मोठा उद्योगसमूह उभा करण्याचे स्वप्न पाहिले होते. तो त्यांनी उभा करून दाखवला. आचार्य अत्रे म्हणत असत, की आपण मराठी माणसाबद्दल ऐकतो की तो दहा हजारांच्या कर्जात बुडून मेला. अत्रे त्यांच्या ‘अत्रे शैलीत’ म्हणायचे, मरायचेच असेल तर दहा कोटींच्या कर्जात तरी बुडून मर! म्हणजे मुद्दा मोठ्या स्वप्नांचाच येतो. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणारा एक ‘पोऱ्या’ माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. त्या ‘पोऱ्या’ला एके काळी कुणीतरी विचारले, आयुष्यात तुझे स्वप्न काय? तो म्हणाला, पेट्रोल केमिकल क्षेत्रातली, माझ्या मालकीची, जागतिक कंपनी उभारणे हे माझे स्वप्न!बहुतांश लोकांनी त्याला वेड्यातच काढले असणार. मात्र त्याच ‘पोऱ्या’ने पुढे अंबानी उद्योगसमूह उभा केला. धीरूभाई अंबानी यांनी मोठी स्वप्ने पाहत जीवनाला आकार कसा देता येतो, तो कसा द्यावा, याचा एक मार्ग जगून दाखवला.

आपण प्रत्येक जण, जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातले॒ असे मोठे स्वप्न पाहत, जीवनाला आकार देऊ शकतो. अशा जीवनांना भव्य आणि सृजनशील आकार येईल, याची मलासुद्धा स्वानुभवाने खात्री आहे. म्हणून, मोठी स्वप्ने पाहा!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अविनाश धर्माधिकारी

(लेखक माजी आए. . एस. अधिकारी व चाणक्य मंडलचे संस्थापक, संचालक आहेत.)

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.