सायटिका | Sciatica | back pain |

सायटिका: एक असह्य वेदना | डॉ. आमोद काळे | Sciatica: An unbearable pain | Dr. Amod Kale

सायटिका: एक असह्य वेदना

आपल्यापैकी अनेकांनी ‘सायटिका’ हा आजार ऐकला असणार. पण हा आजार नेमका कशामुळे होतो किंवा तो झाल्यावर काय त्रास होतो हे त्यांना माहीतच असेल असे नाही. कंबरेच्या आसपास असणारी सायटिक नस दुखावल्याने हा आजार होतो. सतत मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला ही समस्या सतावण्याची शक्यता अधिक असते.

‘सायटिका’ हा शब्द ‘सायटिक’ या मूळ शब्दापासून आला आहे. सायटिक ही शरीरातील सर्वात लांब व महत्त्वाची नस आहे. पाच नसांची मिळून ही एक मोठी नस बनते. (गुडघ्याच्या मागच्या भागात ती इतर दोन नसांमध्ये विभागली जाते. एका नसेला टीबीएल व दुसरीला कॉमन पेरोनिअल असे म्हणतात.) पाठीच्या मणक्यापासून सुरू होणारी ही नस खाली दोन्ही पायांपर्यंत गेलेली असते. पायांच्या स्नायूंना ताकद आणि त्वचेला स्पर्शज्ञान यांचा पुरवठा ही नस करते. या सायटिक नसेला इजा झाल्यास किंवा त्या नसेवर दाब पडल्यामुळे ‘सायटिका’ हा आजार उद्भवू शकतो. सायटिकाचे हे दुखणे विशेषतः कंबरेपासून मांडीच्या मागच्या बाजूला जाणवू लागते. कंबरेच्या खालच्या भागात सुरू झालेली वेदना हळूहळू पार्श्वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्या या अवयवांमध्ये पसरत जाते. हे दुखणे कुठे आणि किती प्रमाणात जाणवणार. सायटिक नस कंबरेत कुठे दबली गेली आहे यावर अवलंबून असते.

आजाराची कारणे:

सायटिक नसेवर दाब पडल्यामुळे: बहुतांश वेळा हा दाब दोन मणक्यांमधील मऊ गादी (Disc) मागे सरकल्यामुळे पडतो. ज्या वेळी झटकन वाकून काही काम केले जाते, वाकून वजन उचलले जाते किंवा कमरेला आकस्मित झटका लागल्यास ही गादी मागे सरकण्याची शक्यता असते. गादी मागे सरकल्यामुळे पायाकडे जाणाऱ्या नसेवर तीव्र दाब निर्माण होतो आणि या नसेतून कळा यायला लागतात.

सायटिक नसेला इजा झाल्यानेः अपघात, खाली पडल्याने मणक्याचे फ्रॅक्चर होणे किंवा मांडीला दुखापत झाल्याने सायटिक नसेला इजा होऊ शकते.

सायटिक नस कुठल्यातरी आजाराने खराब झाल्यामुळे: मधुमेह, मणक्याचे आजार (क्षय, जंतुसंसर्ग), मेंदूचे किंवा नसांचे आजार या कारणांमुळे ही नस बाधित होऊ शकते.

लक्षणे:

* कंबरेपासून खाली पायात कळा जाणे.

* पायामध्ये वेदनादायक मुंग्या येणे. सुया टोचल्यासारखे वाटणे, पाय बधिर होणे.

* पायातील मांडीच्या, नडगीच्या किंवा घोटा आणि पावलांच्या स्नायूंची ताकद कमी होणे.

* हालचाल केल्यास पायातून प्रचंड वेदना येणे.

* कंबर धरली जाणे, झोपून पाय ताठ वर उचलायला त्रास होणे.

* सततची कंबरदुखी

* पोटरीत असह्य वेदना होणे.

* दीर्घकाळ बसल्यानंतर काही व्यञ्चती उठताना कुबड काढतात.

उपचार:

सायटिका या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार केल्यावर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि रुग्ण पूर्वपदावर येऊ शकतो.रुग्णावर उपचार करण्याआधी रुग्णाची पूर्ण शरीरिक तपासणी करून त्याच्या आजाराची तीव्रता, किती काळापासून त्रास होत आहे आदी तपशील जाणून घेतला जातो. त्याचबरोबर या आजाराचे वर नमूद केलेल्या तीन कारणांपैकी नेमके कोणते कारण आहे, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

क्ष किरण (एक्स रे), एम.आर.आय.आणि इ.एम.जी. / एन.सी.व्ही. अशा टेस्ट करून या आजाराचे कारण आणि तीव्रता यांचे निदान केले जाते. एकदा या आजाराची तीव्रता समजली आणि त्यामागचे कारण लक्षात आले, की त्यावर योग्य इलाज करता येणे शक्य आहे. सायटिक नसेवरील ताण कमी करण्यासाठी, तसेच या नसेच्या उपचारांसाठी विविध पद्धती आहेत. पाठीचे आणि पोटाचे व्यायाम, कंबरेवर ताण देण्याच्या गोष्टी टाळणे, नस पूर्ववत करण्यास मदत होईल अशा औषधांचे सेवन आदी माध्यमातून या आजारावर उपचार केले जातात. या उपचारांच्या सुरुवातीच्या काळात शरीराला आणि कंबरेला आराम देणे, व्यायामाबरोबरच गरम पाण्याचा शेक, वजन कमी करणे हे छोटे छोटे घरगुती उपाय आराम मिळवून देतात. सुरुवातीच्या काळात वेदनाशामक व स्नायू सैल करण्यासाठीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. फिजिओथेरेपीच्या माध्यमातूनही या आजारावर उपचार केले जातात. या सर्व उपायांनी सायटिकामध्ये आराम पडेल, पण सायटिका पूर्णपणे बरा होईल, याची खात्री नाही. त्यामुळे या उपायांनी जर बरे वाटले नाही, तर स्टेरॉइड इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया करून त्या नसेवरील दाब काढून टाकावा लागतो. अलीकडे या उपचार पद्धतीत अतिशय उत्तम प्रगती झाली आहे. कमीतकमी चिरफाड करून शस्त्रक्रिया केल्या जातात, ज्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो. मधुमेह, मेंदू आणि नसेच्या विकारांमुळे सायटिकाची व्याधी जडली असेल तर मधुमेहाच्या, मेंदूच्या विशेषतज्ज्ञांना दाखवून योग्य इलाज व उपचार करता येऊ शकतो, ज्यामुळे या नसेच्या पुनर्बांधणीस मदत होऊन सायटिका बरा होऊ शकतो.

सायटिकाची व्याधी टाळण्या-साठी कोणती काळजी घ्यावी?

* पाठीचे स्नायू बळकट करण्याचे व्यायाम नियमित करा.

* चालणे, सायकलिंग किंवा पोहण्याचा व्यायाम नियमितपणे करा.

* दररोज स्ट्रेचिंग करा.

* कंबर आणि पायांवर जास्त वजनाचा भार पडू नये, यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा.

* वयानुसार कृती करण्याची पद्धत बदला.

* स्वतःला क्रियाशील आणि सक्रिय ठेवा.

* अवजड वस्तू उचलताना काळजी घ्या.

* कंबरेला दुखापत होणार नाही, याची काळजी घ्या.

* वेदनादायक भागावर उष्मा (हिटिंग) पॅक धरा.

* खुर्चीत बसल्यावर पाठीला योग्य आधार मिळेल अशा पद्धतीने खुर्चीत बसा.

* खुर्चीत बसल्यावर पाय जमिनीला व्यवस्थित टेकलेले असावेत.

* एका कुशीवर झोपताना आपल्या गुडघ्यांमध्ये एक लहान, मजबूत उशी ठेवा किंवा पाठीवर झोपताना आपल्या गुडघ्याखाली मजबूत उशी ठेवा.

* दुखणे सुरू झाल्यास जास्त वेळ बसू किंवा झोपू नका. हालचाल करताना वेदना जाणवत असल्या तरी थोड्याथोड्या वेळाने हालचाल करत राहा.

* धूम्रपान करणे टाळा. धूम्रपान केल्याने सायटिकाचा धोका वाढतो.

वाढत्या वयाबरोबर व कामाबरोबर या गोष्टी लक्ष देऊन नियमितपणे केल्या तर सायटिका टाळता येऊ शकतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. आमोद काळे

(लेखक अनुभवी आर्थोपेडिक सर्जन आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.