September 20, 2024
मेंदू | मेंदू आणि शरीर | Connection between brain and body | brain and body relationship | mind and body wellness | mind body and brain connection

मेंदू आणि शरीराचा संवाद | डॉ. शुभांगी पारकर | Interaction between brain and body | Dr. Shubhangi Parkar

मेंदू आणि शरीराचा संवाद

दिल और दिमाग में फर्क बस इतना हैं,
दिल बिल्कुल सोचता नही हैं,
और दिमाग सोचता बहुत हैं।

मेंदू म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा, पण समजायला कठीण असा अवयव. आपला प्रत्येक विचार, कृती, भावना, स्मृती आणि या जगातील आपला प्रत्येक अनुभव मेंदूच निर्माण करत असतो. आपल्या सर्वांच्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा, चातुर्याचा संबंध मेंदूबरोबरच जोडला जातो. त्यामुळे आपला मेंदू कसा काम करतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. इतिहासाकडे वळून पाहिले तर मेंदूत अमूर्त असे मूलतत्त्व आहे, ज्याला आपण ‘आत्मा’ म्हणून संबोधतो, असा सिद्धांतही तत्त्ववेत्त्यांनी मांडला आहे. अर्थात, आधुनिक शास्त्राच्या मर्यादेत आत्मा ही संकल्पना आज मानली जात नाही, परंतु मेंदूचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मेंदूच्या अस्तित्वाशी आणखी एक बाजू जोडली जाते, ती म्हणजे शैक्षणिक स्पर्धेची. आज प्रत्येक पालक आपल्या मुलांचा मेंदू कसा सक्षम आणि तल्लख करता येईल, हाच विचार करत असतो. ज्या मुलांची बौद्धिक क्षमता कमी असते, अशा मुलांचे पालक त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हर्बल पाल्यापासून ते महागड्या पोषक टॉनिक वा गोळ्यांपर्यंत अगदी कोणतीही औषधे घ्यायला तयार असतात.

शरीरासाठी महत्त्वाचा असणारा आपला मेंदू हा केवळ तीन पौंडांचा अवयव आहे. काहीजण त्याला ‘जेली’ म्हणून संबोधतात. ही जेली आपले विचार, भावना, वागणूक, शारीरिक हालचाली तसेच श्वासोच्छ्वास, चयापचय, रक्ताभिसरण आणि बरेच काही नियंत्रित आणि नियोजित करत असते. तसे पाहिले तर मेंदूमध्ये इतकी केंदे्र आहेत, जी आपल्या शरीराचे विविध कार्य अतिशय चतुराईने आणि तत्परतेने इतर अवयवांशी संवाद साधत पार पाडत असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की एखादा मॅनेजर त्याच्या हाताखालील दहाबारा लोकांना सांभाळून त्यांच्याकडून कामाचे नियोजन करून घेताना किती कसरत करत असतो, हे त्याचे त्यालाच माहीत असते. म्हणूनच मेंदूला अचाट असा जादूगर म्हटले तर वावगे ठरणार नाही.

संपूर्ण शरीराचे व मनाचे कार्य सर्वसामान्य मेंदू विलक्षण तत्परतेने करत असतो. आपल्या संपूर्ण शरीराच्या वजनाच्या दोन टक्के वजन हे आपल्या मेंदूचे असते. मेंदूचे एकंदरीत मस्तिष्क (Cerebrum), अज मस्तिष्क (Cerebellum) आणि मस्तिष्क स्तंभ (Medulla Oblongata) असे तीन महत्त्वाचे भाग आहेत. जरी माणसाचा मेंदू हा खूप मोठा अवयव नसला, तरी त्याच्या संपूर्ण कार्यक्षमतेसाठी प्रचंड ऊर्जा लागते. मेंदूला इतक्या प्रचंड ऊर्जेची गरज का असते? ही ऊर्जा मुळात मेंदूची वैचारिक किंवा बौद्धिक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी आणि इतर शारीरिक प्रक्रिया व कार्य करण्यासाठी लागते. मेंदू आपल्या आरामदायी वेळेत बऱ्याच गोष्टींची माहिती गोळा करण्यासाठी, ती साठवण्यासाठी ही ऊर्जा
वापरत असतो, ज्यामुळे आपल्या दैनिक कार्यात मेंदूचे मार्गदर्शन आपल्याला होत असते. आपण झोपेत असतो तेव्हासुद्धा आपल्या मेंदूचा संवाद चालू असतो. मेंदूमध्ये जवळजवळ कोट्यवधी मेंदूपेशी आहेत, शिवाय कोट्यवधी मज्जातंतू आहेत. ह्या कोट्यवधी मज्जातंतूची टोके एकमेकांना रासायनिक माध्यमातून किंवा विद्युत संदेशातून जोडलेली आहेत, ज्याद्वारे एका पेशीतून दुसऱ्या पेशीत संदेशवहन होत असते. या संदेशवहनात बिघाड झाला तर किंवा या रसायनांमधला समतोल बिघडला तर मेंदूचे कार्य बिघडू शकते व मानसिक आजार उद्भवू शकतात.

मेंदूचा मोठा मेंदू (प्रमस्तिष्क) हा भाग दोन गोलार्धात उजव्या आणि डाव्या भागात विभागलेला आहे आणि मज्जातंतूच्या गुंडाळीने (कॉर्पस कॅलोझम) एकमेकाला जोडलेला आहे. मोठ्या मेंदूचा डावा भाग (सेरेब्रम) शरीराच्या उजव्या भागाला आणि उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाला विशेषतः स्नायूंना नियंत्रित करतो. मोठ्या मेंदूचा शरीरावर जो प्रभाव आणि नियंत्रण आहे ते अत्यंत मोलाचे व दैनंदिन व्यवहार सांभाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.

१) स्पर्श, वास, दृष्टी, रुची आणि श्रवण या पंचेंद्रियाच्या संवेदनांचे स्पष्टीकरण करणे.

२) विचार करणे, समस्यांची उकल करणे आणि आपली वागणूक सामाजिक आवश्यकतेनुसार अनुकूल रीत्या हाताळणे.

३) भाषेची महत्त्वाची सर्वांगीण कार्यपद्धती आपला मोठा मेंदू सांभाळतो. मोठ्या मेंदूतील व्हर्निके क्षेत्र कानावर पोहोचणाऱ्या आवाजातील ध्वनिलहरींचे आणि डोळ्यांतून वाचल्या
जाणाऱ्या शब्दांच्या प्रतिमांचे योग्य अर्थबोध करतात. तर ब्रोका हे क्षेत्र शब्दांचा उच्चार करण्यासाठी आणि योग्य व आवश्यक असलेल्या बोलांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्नायूंना योग्य हालचाली करण्याचे संदेश पाठविते.

४) मोठा मेंदू आपल्या सभोवतालचे अवकाश पारखत असतो.

५) आपला शरीराच्या हालचाली हाताळण्याचे कामही प्रमस्तिष्क करते.

६) राग, प्रेम, आनंद, कणव अशा आपल्या भावना मेंदूतील लिम्बीक क्षेत्रात वसलेल्या आहेत. त्याला भावनिक मेंदू म्हणूनही ओळखतात. याच लिम्बीक भागात अमिग्डॅला नावाचे केंद्रक धोक्याचा संदेश अचूक ओळखते आणि मेंदूला स्वसंरक्षण किंवा धोकादायक संदेशाची जाणीव करून देते. तसेच या विविध भावनांच्या स्मृतींचे जतनही याच विभागात केले जाते, ज्यामुळे बिकट परिस्थितीचा सामना कसा करायचा किंवा ती परिस्थिती कशा पद्धतीने टाळायची यासारखे बुद्धिनिष्ठ निर्णय प्रमस्तिष्क घेऊ शकतो.

७) मनुष्यप्राण्याला लाभलेली एक महत्त्वाची आणि अमूल्य गोष्ट म्हणजे स्मृती. स्मृती तात्काळ स्वरूपाची जशी असते तशीच ती अल्पकाळासाठी आणि दीर्घकाळासाठी असते. तात्काळ स्मृती ही काही सेकंदांसाठी असते, तर अल्पकाळाची स्मृती काही सेकंदांपासून मिनिटांपर्यंतच्या गोष्टी लक्षात ठेवते. दीर्घकालीन स्मृती ही प्रकट असते आणि प्रासंगिक किंवा घटनात्मक गोष्टींशी संलग्न असते. या गोष्टी मेंदूला जाणीवपूर्वक आठवून व्यक्त करता येतात. अप्रकट स्मृती या माणसाच्या सरावाच्या किंवा एखाद्या कार्यकृतींच्या असतात. त्या व्यक्त करताना सहज नैसर्गिकदृष्ट्या व्यक्त होतात. या अशा स्मृती बळकट करण्यासाठी खेळाडू करतात तसा गंभीर सराव किंवा गायक करतात तसा शिस्तप्रिय रियाज सतत करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी जे पाठांतर करतात किंवा (पाठांतर न करताही) दोन-चार वेळा ऐकल्यावर आपण एखादे गाणे सहज गुणगुणू लागतो हासुद्धा आपल्या स्मृतीचाच एक भाग आहे.

आईवडिलांनी उठवल्याशिवाय न उठणारी मुले सहलीला जायचे असते तेव्हा स्वतःहून भल्या पहाटे उठलेली आपण पाहतो. दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायला आपल्याला उशीर होऊ नये म्हणून घड्याळाचा गजर वाजण्याआधीच आपण उठून बसतो, तेसुद्धा आपल्या मेंदूचीच कार्यक्षमता. मेंदूचा जागृत भाग आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देत असतो. एक प्रकारे आपल्या शरीराला संदेशच देत असतो, असे म्हणता येईल.

याशिवाय प्रत्येक विचार आणि संवेदना यातून आपण अनेक गोष्टींचे आकलन करीत असतो. नवीन ज्ञान वेळोवेळी शिकत असतो. नवीन ज्ञानाचा बोध घेण्याच्या आणि आकलनशक्तीच्या या एकंदरीत प्रक्रियेला आपण बोधनप्रक्रिया म्हणून संबोधतो. या प्रक्रियेत मनाची एकाग्रता, विविध प्रकारच्या स्मृती, निर्णयक्षमता, सर्वसामान्य विश्लेषण, समस्यांचे आकलन करून त्याची उकल करण्यासाठी लागणारे डावपेच, भविष्यातील अपेक्षा आणि अंदाज, ढोबळ सहजता या सर्व व्यवहारांचा समावेश आहे. शिवाय विशेष बोधभाषा, साधारण संघटन यांचाही कार्यभाग आहे. नवीन काही शिकताना / ज्ञानार्जन करताना स्मृतीत आतापर्यंत संचयित केलेल्या माहितीचा निर्णायक, योग्य आणि कौशल्यपूर्ण वापर आपला मेंदू नेमकेपणाने करत असतो. हे इतके गुंतागुंतीचे काम होताना मेंदूत अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया होत असतात. आपण स्वतः अनेक किचकट
निर्णय घेतो किंवा इतरांना क्लिष्ट निर्णय घेताना पाहतो तेव्हा आपल्याला मेंदूत घडणाऱ्या गुंतागुंतीच्या कामाची आणि त्याच्या अनमोल क्षमतेची जाणीवही आपल्याला नसते. पण मेंदूचे हे बौद्धिक सॉफ्टवेअर अफलातून तर आहेच, पण त्याची कार्यक्षमताही जबरदस्त आहे.

मेंदूच्या कार्यक्षमता जाणण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन होत असते. पूर्वी साधा एक्सरे होत असे. पुढे सीटी स्कॅन, एम.आर.आय.चे तंत्रज्ञान आले. आता मेंदूच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी थेट स्कॅन वापरले जाते. शिवाय ईईजीसारख्या (इलेक्ट्रो एनसेफालोग्राफ) तपासातून मेंदूची विद्युत प्रक्रिया ओळखून एपीलेप्सीसारखे आजार ओळखले जात आहेत.

प्रमस्तिष्क मेंदूनंतर मेंदूचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे लहान मेंदू किंवा अनुमस्तिष्क किंवा सेरेबेलम होय. तो आपल्या मस्तिष्काच्या मागे मोठ्या मेंदूच्या खाली खोचला गेला आहे. मेंदूचा हा भाग आपल्या शरीराच्या विविध हालचालींचे नियंत्रण करणे व शरीराचा तोल सांभाळणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतो. दैनंदिन परिपाठात आपण केवळ चालण्याचे काम करीत नाही, तर अनेक गोष्टी करत असतो. यात शरीराच्या मोठ्या स्नायूंपासून छोट्या छोट्या स्नायूंचा समावेश आहे. या सर्व हालचालींची गरज, त्यांचा क्रम, निरीक्षण आणि आवश्यक जुळवणी अनुमस्तिष्क सतर्क राहून करत असतो. यासाठी शरीराकडून मिळणाऱ्या विविध संवेदनांची माहिती तो घेत असतो. मग त्या हालचाली नृत्यात दिसणाऱ्या दिमाखदार हालचाली असोत किंवा खेळाडूंच्या फटक्यातील आक्रमक हालचाली असतील वा आपल्या शरीराचा विचार न करता घाईगर्दीत ट्रेन पकडताना केलेल्या आडदांड हालचाली असोत; या सगळ्यांचे आयोजन आणि नियोजन लहान पण कार्याने महान असलेला आपला लहान मेंदू करीत असतो.

या सगळ्या बौद्धिक आणि शारीरिक क्रिया मोठा मेंदू आणि छोटा मेंदू करीत असतो. त्याच वेळी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क स्तंभ हा देहासारखा जो भाग आहे, तो करत असतो. हा भाग सर्वात शेवटी मोठ्या मेंदूच्या खाली आणि लहान मेंदूच्या येथे असतो. पुढे तो मेरुरज्जूला जोडला जातो. माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जसे – श्वसन क्रिया, हृदयाची गती आणि रक्तदाब, पचन-क्रिया, शरीराचे तापमान, वेदनांचे नियमन आणि झोपेचे नियोजन इत्यादी प्रक्रिया मस्तिष्क स्तंभ नियंत्रित करतो. या मस्तिष्क स्तंभामधून मोठ्या मेंदूकडे आणि शरीराच्या इतर सर्व भागांकडे संदेश वहन करण्यासाठी अनेक चेतामार्ग वसलेले आहेत.

आपल्या आतापर्यंत लक्षात आलेच असेल की मेंदू आणि शरीराचा संवाद हा सर्वसमावेशक आहे. मेंदूची एकेक पेशी ही संदेशाची देवाणघेवाण करत शरीराचे आपत्कालीन कार्य सांभाळून बौद्धिक कार्याचेही वर्धन करीत असते. आपण ज्या पद्धतीने आपल्या सभोवतालच्या जगाचा अनुभव घेतो, तो आपल्या स्मृतिकोषात साठवतो, नवनवीन गोष्टी शिकत जातो. पुढे या गोष्टींचा उपयोग आपल्या जगात वागण्याच्या प्रक्रियेत करतो. या सगळ्यांचे नियोजन आणि नियंत्रण आपल्या मेंदूच्या आधिपत्याखाली आहे. आपण रस्त्यावरून चालताना रस्त्याचा मार्ग आपल्या उघड्या डोळ्यांद्वारे, गाड्यांचा आवाज आपल्या कानातून आणि पेट्रोल-डिझेलचा वास आपल्या नाकातून मेंदूत वेगवेगळ्या केंद्रात प्रवेश करून जे संदेश पाठविले जातात, त्यातून आपण पाहतो, ऐकतो आणि वास घेतो-अगदी सेकंदापेक्षा कमी वेळात. आपली स्वतःबद्दलची संवेदना इतकी जागृत असते की आपण जगात वावरत असतो तेव्हा आपली नक्की काय परिस्थिती आहे याची जाणीव वेळोवेळी आपल्याला आपला मेंदू करून देतो. आपल्याला केव्हा भूक लागली आहे, तहान लागली आहे हे संदेश योग्य वेळी आपल्याला मेंदूच्या विशाल कार्यप्रणालीमुळे मिळत असतात. मेंदूची लवचिकता विस्मयकारक आहे. मेंदू अगाध आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. शुभांगी पारकर
(लेखिका केईएम रुग्णालयाच्या प्राध्यापक व माजी अधिष्ठाता आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.