प्रारब्ध आणि अध्यात्म | चैतन्य प्रेम | Destiny And Spiritualism Chaitanya Prem

Published by चैतन्य प्रेम on   September 1, 2022 in   Readers Choice

प्रारब्ध आणि अध्यात्म

आपण पत्ते खेळतो, तेव्हा हाती आलेल्या पत्त्यांमध्येच खेळावे लागते. जीवनाचेही काहीसे तसेच आहे. जन्मानुसार वाट्याला आलेली माणसे आणि परिस्थिती स्वीकारूनच जीवनाचा डाव मांडावा लागतो. माणसे आणि परिस्थिती अनुकूल असली, तर जगणे सुखद होते. पण तीच जर प्रतिकूल असेल तर जगणे खडतर होते. तेव्हा हातात पत्ते कसे येतील, हे जसे अनिश्चित असते तसेच जीवनाचा प्रवाह नेमका कसा असेल, हे माणसाला माहीत नसते आणि जे अज्ञात असते त्याचीच माणसाला भीती वाटते! मग कधी कधी त्याला प्रश्न पडतात, की जीवन असेच का आहे? अथक प्रयत्न करूनही एखादा अपयशाच्या गर्तेत का सापडतो? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे ‘प्रारब्ध’!

आता ‘प्रारब्ध’ म्हणजे काय? हे जाणण्यासाठी कर्माचा सिद्धांत जाणून घेतला पाहिजे. सनातन तत्त्वज्ञान सांगते, की माणूस कर्माशिवाय क्षणभरही राहू शकत नाही आणि प्रत्येक कर्माचा परिणाम वा फळ त्याला भोगावेच लागते! या कर्मांची तीन प्रकारांत वर्गवारी करता येईल.

१. क्रियमाण कर्मे: आपली बहुतांश कर्मे या गटात मोडतात. ही कर्मे तत्काळ फळ देऊन शांत होतात. उदाहरणार्थ, तहान लागली, पाणी पिण्याचे कर्म घडले. भूक लागली, अन्न ग्रहण करण्याचे कर्म घडले, पोट भरण्याचे फळ लगेच मिळाले.

२. संचित कर्मे: ज्या कर्माचे फळ मिळायला काही कालावधी जावा लागतो, ती कर्मे या गटात येतात. उदाहरणार्थ, रोज नोकरी केली, पण पगाररूपी फळ मिळायला महिना जावा लागला. रोज अभ्यास केला आणि एके दिवशी परीक्षा दिली, पण निकालरूपी फळ मिळायला दोन-तीन महिने जावे लागले. म्हणजेच कर्म होऊनही ज्यांचे फळ तात्काळ मिळत नाही, अशा फळाच्या प्रतीक्षेत आपल्या खात्यात जमा झालेल्या कर्मांना संचित म्हणतात.

३. प्रारब्ध कर्मे: काही संचित कर्मांचे फळ एका जन्माच्या अवधीतही वाट्याला येत नाही. त्या कर्मांचे भोग पुढील जन्मांमध्ये परिस्थितीनुरूप वाट्याला येतात. त्यांनाच प्रारब्ध म्हणतात.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, प्रत्येक कर्माचे फळ अटळ आहे आणि ते कर्म आपणच केले असल्याने त्या कर्मफळरूपी भोगांना आपणच जबाबदार असतो! हे प्रारब्ध प्रत्येक माणसागणिक निश्चितच वेगळे असते. एकाच घरात, एकाच परिस्थितीत जन्मलेल्या सख्ख्या भावंडांच्या जीवनातही एकसमानता नसते! याचाच अर्थ, जीवनाचे बाह्य रूप, दिसणारे रूप एकसमान भासत असले, तरी प्रत्यक्ष जगण्याचे आंतरिक वास्तविक रूप माणसागणिक वेगवेगळे असते. आधीच सांगितल्याप्रमाणे एक मात्र निश्चित, की स्वतः केलेल्या कर्मांचेच परिणाम माणूस भोगतो आणि म्हणून त्याच्या प्रारब्धाला तोच जबाबदार असतो!

मग माणसाला प्रश्न पडतो, की प्रारब्ध बदलता येते का? स्वप्रयत्नांनी दैवावर मात करता येते का? प्रारब्ध खडतर आहे म्हणून कर्म करणेच सोडून द्यायचे का? हा प्रश्न आजचा नव्हे, हजारों वर्षांपासूनचा आहे! ‘मत्स्य पुराणा’त भगवान मत्स्यदेवांना प्रश्न विचारला गेला, की ‘दैव श्रेष्ठ आहे की पुरुषार्थ?’ अर्थात प्रारब्धाचे बळ अधिक आहे की प्रयत्नांचे? यावर मत्स्य भगवान म्हणाले, की ‘आधीच्या अनंत जन्मांमध्ये केलेली कर्मेच या जन्मी दैव बनून, प्रारब्ध बनून वाट्याला आलेली असतात. त्यामुळे माणूस जे कर्म करतो त्यालाच अधिक महत्त्व आहे. कारण त्याचे चुकीचे कर्मच  त्याला संकटात गोवते आणि त्याचे योग्य कर्मच त्याला सोडवते. तेव्हा दैवाची साथ नसली, तरी माणसाने निराश न होता योग्य सत्कर्मेच केली पाहिजेत. कर्तव्यकर्मेही न टाळता योग्यरीत्या पार पाडली पाहिजेत. कारण जो सदा सत्कर्मरत आणि प्रयत्नरत असतो अशा माणसाचे प्रतिकूल प्रारब्धही पालटते!’ (मत्स्य पुराण, अध्याय २२१, श्लोक क्र. २ व ३)

मग योग्य कर्मे कोणती? सत्कर्मे कोणती? ती कशी साधतील? हे प्रश्न पडतात तेव्हा अध्यात्माची वाट दिसू लागते! या प्रश्नांबरोबरच आणखी एक ठळक प्रश्न उत्पन्न होतो तो म्हणजे,  अध्यात्माने प्रारब्ध बदलते का? याचे उत्तर असे, की अध्यात्माने प्रारब्ध बदलते की नाही, हे महत्त्वाचे नाही, पण अध्यात्माच्या आधारामुळे प्रारब्ध भोगणारा माणूस बदलतो, हे निश्चित! ‘अध्यात्म’ म्हणजे ‘आधी+आत्म’! आपण स्वतःला ज्या नाम-रूपाने ओळखतो त्याचे मूळ अधिक सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्माकडे नेत सर्व तऱ्हेचा संकुचितपणा मोडून अंतःकरणाला व्यापक करणारे शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’!

आता या अध्यात्माच्या आधाराने माणसाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. अर्थात मूळ शुद्ध सु-मन, सु-बुद्धी प्रकाशमान होऊ लागते. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत त्याप्रमाणे, ‘आपले बरेचसे प्रश्न हे आपल्या मनानेच निर्माण केलेले असतात.’ म्हणजे काय? तर काल्पनिक भीती, दुसऱ्याचा द्वेष व मत्सर, न्यूनगंड वा अहंगंड, अविश्वास वा अतिविश्वास, ध्येय निवडण्यात चूक आणि त्यामुळे प्रयत्नांत चूक; यांसारख्या बऱ्याच गोष्टींना आपले मनच कारणीभूत असते. या मनात अध्यात्माने पालट होतो.

घराला आग लागते तेव्हा आगीत अडकलेल्या माणसापेक्षा त्या घराबाहेर असलेला माणूस ती आग अधिक वेगाने विझवू शकतो. दोरखंडाने जखडलेल्या माणसाला, ज्याचे दोन्ही हात मोकळे आहेत, तोच सोडवू शकतो. अगदी त्याचप्रमाणे मानसिक भ्रम आणि मोहामुळे संकटात अडकलेला माणूस आपणहून त्या संकुचित मनाच्या चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय त्या संकटांना खऱ्या ताकदीने तोंड देऊ शकत नाही. जीवनाकडे जो अलिप्तपणे पाहू शकतो, आपल्या जगण्याच्या रीतीकडे जो तटस्थपणे पाहू शकतो त्यालाच आपले नेमके चुकते कुठे, हे लक्षात येते. आपलाच भावनिक, मानसिक गुंता आपल्या आड कसा येतो, हे उमगू लागते. ही अलिप्तता, तटस्थता, स्वनिरीक्षण, स्वपरीक्षण आणि स्वसुधारणेची संधी अध्यात्म देते. ते माणसाला व्यापक करते, निश्चिंत करते, निरपेक्षपणे कर्तव्य करायला प्रेरित करते आणि कर्तेपणाचा अहंकारही चिकटू देत नाही.

यासाठी शुद्ध अध्यात्माच्या मार्गावर चालायला हवे. अध्यात्म हा अंतर्मुख होण्याचा अभ्यास आहे. त्यामुळे बेगडीपणा, दिखाऊपणा, बहिर्मुखता जिथे आहे तिथे खरे अध्यात्म नाही हे ओळखावे. आपल्या साधनेची सुरुवात संतवचनावर विश्वास ठेवून संतबोधानुरूप जगण्याचा प्रयत्न करीत साधावी. अशा साधनेच्या आधाराने प्रारब्ध भोगणारा माणूस मनाने जेव्हा अधिक खंबीर, अधिक सक्षम होतो, त्याची बुद्धी जेव्हा खऱ्या अर्थाने निर्णयक्षम होते, चित्त स्थिर होते तेव्हा त्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची भीती वाटत नाही. भक्तीच्या आधाराने आंतरिक शक्ती जागी झाल्याने जीवन अधिक सकारात्मक होते. एकेकाळी दुःखाने काठोकाठ भरलेला त्याच्या अंतःकरणाचा डोह आनंदाने भरून जातो. त्या डोहात मग तरंगही आनंदाचेच निर्माण होत जातात!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


चैतन्य प्रेम

(लेखक आध्यात्मिक तत्त्वचिंतक आहेत.)