Power of denial | Veena Gavankar

नकाराचे सामर्थ्य | वीणा गवाणकर | Power of Denial | Veena Gavankar

नकाराचे सामर्थ्य

माणसाची वाटचाल काही स्वीकारत, तर काही नाकारत चालू असते. ज्या गोष्टीत त्याला समाधान, सार्थकता, आनंद मिळणार असतो, त्यासाठी तो सहज होकार देतो. दिलेल्या अशा होकाराचे संभाव्य बरे-वाईट परिणाम सहन करण्याची त्याची तयारीही असते. तर, काही प्रसंगी माणूस परिस्थितीला शरण जाऊन, आपल्या मनाला, विचारांना मुरड घालून कोणत्यातरी आग्रहाला, दबावाला बळी पडून अनिच्छित गोष्टीला नाइलाजाने होकार देतो आणि मग अनेकदा पश्चात्ताप करण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवते. उलट, काही व्यक्ती अनिच्छित प्रस्ताव न स्वीकारता त्यांना खंबीरपणे नकार देतात. त्या नकाराची किंमत मोजायचीही त्यांची तयारी असते.

कृष्णवर्णी डॉ. जॉर्ज डब्ल्यू. कार्व्हर यांनी आडगावातल्या एका साध्याशा प्रयोगशाळेत घडवून आणलेली कृषिक्रांती पाहून प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी त्यांच्यासमोर मोठ्या वेतनाचा प्रस्ताव ठेवत आपल्या आधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळेत यायला सांगितले, पण कार्व्हरनी त्यास नकार दिला. ‘‘माझ्या बांधवांसाठी हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून येऊ शकत नाही,’’ असे ते म्हणाले. उर्वरित आयुष्यात त्यांनी आपले हे शब्द सिद्ध करून दाखवलेही.

लीझ माईटनर, जर्मनीतील बुद्धिमान ज्यू अणुशास्त्रज्ञ. हिटलरच्या ज्यू द्वेष्टेपणामुळे एका रात्रीत त्यांना जर्मनी सोडून स्वीडनचा आसरा घ्यावा लागला. तिथे त्या अत्यंत अभावग्रस्त जीवन जगत होत्या. तरीही, जर्मनीतील आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत होत्या. हिटलर अणुबॉम्ब तयार करेल, त्याआधीच अमेरिकेने तो बनवावा अशी विनंती शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना केली होती. तो प्रकल्प मॅनहटन येथे सुरू होत असताना त्यात लीझ माईटनरनी सहभाग घ्यावा, अशी विनंती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना केली. तो प्रस्ताव लीझनी स्वीकारला असता तर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या असत्या. त्यांची आर्थिक तंगी संपली असती. मात्र, ‘‘माझे संशोधन विनाशासाठी नाही!’’ असे बजावत त्यांनी या प्रस्तावाला नकार दिला.

चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील मान्यवर अभिनेते निळू फुले. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांची कारकिर्द आणि ते करत असलेले समाजकार्य लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवले गेले. निळूभाऊंनी ‘‘आपण एक व्यावसायिक अभिनेता आहोत. जमेल तशी समाजसेवा करतो. आपण करत असलेल्या समाजसेवेपेक्षा डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे समाजकार्य फार मोठे आहे,’’ असे सांगून स्वतःकडे चालून आलेला पुरस्कार नाकारतानाच त्यासाठी बंग दाम्पत्याचे नाव आग्रहपूर्वक सुचवले. त्या वर्षी तो पुरस्कार बंग पतिपत्नीला देण्यात आला.

या थोरांनी दिलेले नकार कोणतीही सबब व अडचण सांगणारे नव्हते. उलट, त्यांच्या तत्त्वनिष्ठेला झळाळी देणारे होते. तडजोडीला दिलेल्या ह्या नकारात त्यांचा दिसतो, तो पूर्ण आत्मविश्वास आणि नैतिकतेचे, विवेकाचे प्रचंड पाठबळ, निर्लोभ आणि प्रसिद्धीपराङ्मुखता ! त्यामुळेच ते नकार इतरांना बळ देणारे, आपल्या विचारांवर ठाम राहायला शिकवणारे ठरतात. आपण दिलेल्या होकाराचे किंवा नकाराचे परिणाम काय संभवतात, याचा विवेकपूर्वक निर्णय घ्यायला ते मदत करतात. त्या नकारांत दूरदृष्टी असते. असे ‘नकार’ श्रेयस (सुरुवातीला अवघड पण भविष्यकाळात हितकारक ठरणारे) आणि सकारात्मक कृतींना पाठबळ देणारे ‘होकार’ असतात.

श्रेयस आणि प्रेयस (पाहताच क्षणी किंवा विचार करताच हवेहवेसे वाटणारे, आनंद देणारे पर्याय) यातला फरक समजला, की लोकाग्रहाला किंवा क्षुद्र लोभ व मोहांना बळी न पडता अनिच्छित अथवा अग्राह्य गोष्टींना नकार देण्यासाठी वैचारिक आणि मानसिक तयारी करणे कठीण जात नाही.

सामान्य माणसाला रोजच्या जगण्यातही अनेकदा होकार द्यावा की नकार, या द्वंद्वाला सामोरे जावे लागते. तिथेही चंगळवादाला दिलेला नकार हा शाश्वत विकासाला प्राधान्य देणारा, अपरिग्रहाचा आदर करणारा होकार असतो. सवंग लोकप्रियतेला दिलेला नकार हा ‘श्रेयस’ची पाठराखण करणारा असतो, झगमगाटाला दिलेला नकार हा साधेपणाचा मान राखणारा असतो, जंक फूडला दिलेला नकार स्वास्थ्यासाठी होकार असतो हे लक्षात घ्यायला हवे.

लोकाग्रहाला बळी पडून आपल्या इच्छेविरुद्ध कृती करण्याची वेळ आली, की मनस्ताप होणे अटळच. खरेतर, योग्य-अयोग्य, श्रेयस-प्रेयस ठरवताना आत्मपरीक्षण होत असते. त्याने आत्मविश्वास, आत्मबल वाढून त्याचा उपयोग आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यासाठीच होतो.

अनेकदा दैनंदिन जीवनातले नकार सोय-गैरसोय, वेळप्रसंगी व्यावहारिक बाबींशीही निगडित असतात. अर्थात, असे वागता येणे नेहमीच सोपे आणि सहज नसते. समोरच्याचा आदर राखत सौम्य, तर्कशुद्ध शब्दांत नकार देता यायला हवा. तरीही अनेकदा असे नकार देताना लोकांची नाराजी, लोकापवाद, रोष, गैरसमज यांनाही तोंड द्यावे लागते.

मी नेहमीच माझ्या वेळेचे व्यवस्थापन करत आले आहे. त्यामुळे सुरुवातीला लोकांची माझ्याबद्दल असणारी ‘ही नोकरी करत नाही, गृहिणीच आहे.हिला भेटायला न कळवता कधीही गेले तरी चालेल,’ अशी समजूत मला जाणीवपूर्वक बदलावी लागली. त्यासाठी प्रसंगी वाईटपणाही पदरात घ्यावा लागला. मात्र हळूहळू माझी भूमिका पटत गेली आणि आगंतुकपणे भेटीसाठी येणाऱ्यांचा त्रास कमी झाला. कार्यक्रम स्वीकारतानाही मी वेळेची आणि विषयांची बंधने आधीच आयोजकांना सांगत असते. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना येते. आडपडदा न ठेवता योग्य शब्दांत कोणतीही गोष्ट स्पष्ट केली तर गैरसमज होत नाहीत. समोरचाही विचार करतो आणि आपला नकार किंवा सशर्त केलेला स्वीकार समजू शकतो.

माझा पिंड नसल्याने मी कुलाचार, व्रतवैकल्ये, पक्षीय राजकारण, धार्मिक संघटना यांच्याशी स्वतःला कधीच जोडून घेतले नाही. सुरुवातीच्या काळात माझ्या या भूमिकेचा मला त्रासही झाला. परंतु त्या त्या काळात मी ज्यांची चरित्रे लिहीत होते, त्या अभ्यासानेच मला खंबीर बनवले. कालांतराने माझी ही भूमिका स्वीकारलीही गेली.

काही संस्थांनी त्या त्या वर्षातील उत्कृष्ट पुस्तकांची निवड पुरस्कारासाठी करण्याविषयी मला प्रस्ताव पाठवले. मी ते नाकारले. याचे कारण, मी एखाद्या चरित्राचा अभ्यास करायला घेतला की त्या दोन-तीन वर्षांच्या काळात मी समकालीन फारच थोडे आणि तेही निवडक असेच वाचलेले असते.अशा वेळी मी वाचलेल्या मर्यादित पुस्तकांतूनच निवड करणे, हे मी न वाचलेल्या अन्य पुस्तकांवर अन्याय करणारे ठरते. एखादी संस्था मला पुस्तके पाठवून त्यातून काही पुस्तके पुरस्कारार्थ निवडायला सांगते. मात्र पाठवत असलेल्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा निवडीसाठी दिलेल्या दिवसांची संख्या कमी असते. असे प्रस्तावही मी ठामपणे नाकारते. माझ्याकडे परीक्षणार्थ आलेल्या पुस्तकाचे नीट वाचन न करता निवड करणे मला गैर वाटते.

तुम्ही कोणती मूल्य मानता, कोणती पथ्ये पाळता, कशाला प्राधान्य देता, काय नाकारता हे तुमच्या आचरणातून दिसत जाते. तुमची एक ओळख तयार होते. तुम्ही तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक आहात, तुम्ही तडजोड करणार नाहीत हे लक्षात आले, की काही करून तुमच्याकडून होकार मिळवणे शक्य नाही हेही तशी मागणी करणाऱ्यांच्या लक्षात येते. ते तुमचा नकार आदराने मान्य करतात.

शेवटी जाता जाता, ह्या माझ्या लेखात अश्रेयसाला दिलेला नकार अध्याहृत आहे, श्रेयसाला दिलेला नकार नाही. अशा नकाराचे सामर्थ्य स्वामी रामदासांच्याच धाटणीने अधोरेखित करते..!

सामर्थ्य आहे नकाराचे। जो जो करील तयाचे॥

परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे। श्रेयसाचे॥

(लेखिका ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वीणा गवाणकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.