कराओके | Karaoke | karaoke fun

तुझ्या ‘गळ्या’, माझ्या ‘गळ्या’ | श्रीकांत बोजेवार | Mastering the Art of Karaoke Performance

तुझ्या ‘गळ्या’, माझ्या ‘गळ्या’

जग बदलते, तशा आपल्या सवयी-सुद्धा बदलतात. त्याचबरोबर इतरांना सळो की पळो करून सोडण्याचे मार्गही! काळाच्या ओघात आल्यागेल्याचा छळ करण्याचे काही नवे फंडेसुद्धा तयार झाले. त्यातलाच एक म्हणजे ‘कराओके’.

संगीतकारांनी, वादकांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या गाण्यामधून गायकाचा गोड आवाज पुसून टाकायचा आणि तिथे आपला भसाडा, भेसूर आणि बेसूर आवाज भरायचा याला कराओके म्हणतात. एखादे काम नीट करण्यापेक्षा, ज्याच्याकडे कामाचा दर्जा ठरविण्याचे अधिकार आहेत, त्याला खूश करून ‘करा ओके’ म्हणण्याची संस्कृती आपल्याकडे सगळीकडे खोलवर रुजलेली आहे. गाणे कसेही गायले, तरी ते गोड मानून घेण्याची सामाजिक-सांस्कृतिक सक्ती अभिप्रेत असल्यामुळेच बहुधा या प्रकाराला ‘कराओके’ हे नाव दिले गेले असावे!

गाण्यातला ताल, वाद्यांचा आवाज, दोन ओळींच्या अथवा दोन कडव्यांच्या मधले संगीत हे सगळे अस्सल, ओरिजिनल किंवा सेम टू सेम असते, त्यामुळे हौशी गायकाचा आवाज वगळता ते गाणे अगदी अस्सल वाटते. त्यातल्या गायकाचा आवाज मात्र गायींच्या कळपात चुकून बकरी शिरावी तसा आपल्याला त्रास देत राहतो. बरे, ह्या गाणाऱ्या व्यक्ती कधी आपले जवळचे नातेवाईक, तर कधी मित्र असतात. त्यांना दुखवताही येत नाही. वर पुन्हा ‘किती छान गातेस गं तू, स्टेजवर का नाही गात?’ असे प्रोत्साहनपर काहीतरी बोलावे लागते. ‘फक्त मधले म्युझिक फार छान होते,’ असे खरे बोलायची सोय नाही.

स्क्रीनकडे पाहून ही मंडळी गाण्याच्या ओळी वाचत किंवा गात असतात. त्यामुळे अनेकदा ताल-सूर-गाण्यांच्या ओळी पुढे पुढे जातात आणि गायक धापा टाकत मागून येतो किंवा गायक पुढे जातो आणि वाद्याची वाजंत्री त्याच्या मागोमाग येते. पट्टीचे गायक आपण अनेक पाहिलेले असतात, मात्र एकच गाणे प्रत्येक कडव्याला किंवा प्रत्येक ओळीला वेगवेगळ्या पट्टीत गाणारे गायक आपल्याला ‘कराओके’मुळे ऐकायला मिळत आहेत. मात्र यापैकी काहीही झाले, कितीही चुका झाल्या तरी गाणारे आणि ऐकणारे एकमेकांच्या चुका मोठ्या मनाने ‘कानात’ घेतात. त्यामुळे अशा व्हिडिओंची पैदास वाढत जाते.

आपले गाणे लोकांनी ऐकावे अशी तीव्र इच्छा असलेल्यांनी इतरांना व्हिडीओ पाठवण्यापेक्षा खरे तर ऑडिओ  क्लिप  पाठवायला  हवी. म्हणजे खुनाऐवजी खुनाचा केवळ प्रयत्न केल्याचे, थोडे खालचे कलम तरी लावता येईल. पण आपण गाताना कसे दिसतो हे दाखवण्याचीही अपार हौस या गायकांना असते. ज्यांची मुलेबाळे देशात-परदेशात कुठेतरी सुशेगात जगत असतात अशी काही वयस्क जोडपी तर जोडीने कराओकेवर गाण्याचे व्हिडीओ शूट करून पाठवतात आणि इतरांचा छळ करतात. त्यापैकी अनेकांना कॅमेरा अँगल वगैरेचा गंध नसतो, त्यामुळे ते टेबलवर मोबाइल ठेवून समोर उभे राहून गातात. लो अँगलने गाणे शूट होते आणि गाणंभर त्या दोघांच्या नाकांची भोके पाहत ते ऐकावे किंवा खरे तर पाहावे लागते. काही दिवसांनी आपण त्यांचे समोरासमोरून दिसणारे चेहरे विसरूनच जातो. ती माणसे समोर आली, तरी लो अँगलने पाहिल्याशिवाय त्यांची ओळख पटत नाही. साठी-पासष्टीला आलेली ही जोडपी ‘परदेशिया, ये सच है पिया’सारखी गाणी म्हणतात. स्क्रीनवर ‘परदेसिया’ लिहून आलेले असते, परंतु गाणारी काकू ‘सिया’चे ‘शिया’ करते. त्या काकूचा ढेरपोट्या किशोर कुमारसुद्धा ‘जाने जिंदगी कैसे बिताते है लोग’ऐवजी ‘जाने ज्यिंदगी कैसे…’ म्हणतो आणि तसे म्हणताना आपण काही चूक करत आहोत, याचा त्याला गंधही नसतो. दुसऱ्याने आपले गाणे ऐकावे अशी इच्छा असेल तर- आणि तशी ती असतेच- त्याचे गाणेही आपल्याला ऐकावे लागते. याच मजबुरीतून लोक एकमेकांची गाणी ऐकत असतात आणि भरमसाठ कौतुकही करत असतात.

संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून  वेद वदवून घेतल्याची कथा आपण ऐकलेली आहे. पण ज्ञानेश्वरांनी तसे का केले होते, याचे उत्तर आता कुठे मिळत आहे. कराओके गाणी ऐकण्याच्या दृष्टीने आपल्या मनाची मशागत आणि तयारी व्हावी, असा हेतू त्यामागे होता. कराओकेने घरोघरी जन्माला घातलेल्या किशोर, लता, रफी यांचे त्या रेड्याशी काहीतरी आंतरिक नाते नक्कीच असणार.

कुठलीही प्रथा नष्ट होत नसते, तर ती फक्त स्वरूप बदलून नव्या पद्धतीने पुन्हापुन्हा येत असते. ‘मुलगी पाहायला जाणे’ हे कितीही बावळटपणाचे वाटले तरी त्याला पर्याय नाही, मात्र त्याचे स्वरूप नव्या काळानुसार बदलत आहे. अशा चहापोह्यांच्या कार्यक्रमात लवकरच, ‘कराओके’वर गाणे म्हणून दाखव बरे बाळा,’ या नव्या मागणीचा समावेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘मॅट्रिमॉनिअल्स’वर प्रोफाइल अपलोड करताना वय, वर्ण, शिक्षण, गोत्र, उत्पन्न, अपेक्षा यांसोबतच ‘फेवरिट कराओके साँग’ लिहिणे लवकरच सक्तीचे होऊ शकते.

लग्नाचा सोहळा तीन दिवसांचा होऊन त्यात ‘संगीत’ नामक नादखुळा उपक्रम पंजाबी कल्चर कृपेने आता मराठी लग्नातही घुसलेला आहे. त्यात वधूमायचा हात हाती घेऊन वधूपिता किंवा वरमायचा पदर धरून वरपिता कराओकेवर हमखास ‘ऐ मेरी जोहराजबी’ हे गाणे म्हणतो आणि सगळे त्यांना न चुकता दाद देतात. मोठ्ठा पंखा लावून वधूचा पदर स्टेजवर फडफडवला जात आहे आणि तिच्या त्या पदराकडे पाहत पाहत तिचा भावी पती कराओकेवर ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ असे क्वहणत असल्याचे दृश्य आपण लग्नात पाहतो, तेव्हा कराओकेने केलेली क्रांती लक्षात येते. ‘पल पल दिल के पास’ हे गाणे कराओकेवाल्यांचे फेवरेट गाणे आहे, कारण त्यातल्या त्यात हे गाणे गायला सोपे आहे. त्याची चाल ‘सरळ’ आहे, फार वेडीवाकडी वळणे त्यात नाहीत. ‘सरळ चालीची माणसे’ समाजाला उपकारक असतात हे माहीत होते, परंतु सरळ चालीची गाणीसुद्धा किती उपकारक असतात हे ‘पल पल’ने दाखवून दिले. संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचे समस्त कराओक्यांवर हे किती मोठे उपकार आहेत, याची कराओक्यांना जाणीव नसेल.

कराओक्यांचे हे उपद्व्याप घरा-घरांतून  कौटुंबिक  कार्यक्रमांमधून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत पोहोचले आहेत. कमी गजबज असलेल्या एखाद्या चौकात, सार्वजनिक उद्यानात सकाळी-संध्याकाळी असले अनेक ‘कराओके स्टार’ गळा काढत असतात आणि एका मोठ्या स्पीकरवर ते सगळ्यांना सक्तीने ऐकवत असतात. गाणारा गात असतो आणि ‘याचे गाऊन झाले की आपलाच नंबर’ म्हणून बाकांवर बसलेले पाच-सात जण त्या गायकाची हौस कधी फिटते याची वाट पाहत असतात. यात सहसा पुरुष गायकच प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे अनेकांच्या घरी सकाळी-संध्याकाळी ‘बाबा फिरायला गेले आहेत’ म्हणण्याऐवजी ‘बाबा गायला गेले आहेत’ असेही आता म्हणू लागले आहेत.

काही वर्षांनी मूळ गाणी लुप्त होऊन आसमंतात केवळ कराओकेंचीच गाणी शिल्लक राहतील की काय, अशी भीती आता वाटू लागली आहे. ‘तुझ्या गळ्या, माझ्या गळ्या, गुंफू कराओकेंच्या माळा’ असे म्हणण्याची वेळ तेव्हा आपल्यावर येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


श्रीकांत बोजेवार

(लेखक ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.