अंधश्रद्धा | faith and superstition

अध्यात्म आणि अंधश्रद्धा | डॉ. बालाजी तांबे | Spirituality and Superstition | Dr. Balaji Tambe

अध्यात्म आणि अंधश्रद्धा

अध्यात्म हे आत्म्यासंबंधित किंवा जीवनशक्तीसंबंधित असते. मनुष्य वा प्राणिमात्र ज्या एका कारणाने जिवंत असतात, ती शक्ती, ती संकल्पना म्हणजे आत्मा! मनुष्याच्या शरीरातील पेशी हालचाल करत असली, तिच्यात काही परिवर्तन घडत असले, तर ती पेशी जिवंत आहे असे आपण म्हणतो. पेशीतील जिवंतपणा हा आत्मा. पेशीतील आत्मा सर्व शरीरभर असतो का? पेशीतील हा आत्मा सूक्ष्मरूपात असतो, तर शरीरात तो प्रेमरूपात आहे असे आपण म्हणू. म्हणजे दोन हॉर्स पॉवरचे इंजिन व दोनशे हॉर्स पॉवरचे इंजिन यांच्या शक्तीत फरक आहे. मनुष्याच्या शरीरात ही जी जिवंतपणाची शक्ती आहे तो आत्मा. आत्म्यासंबंधी असलेले ते अध्यात्म आणि शरीरासंबंधी असलेले भौतिक विज्ञान. भौतिकाचे विज्ञान व आत्म्याचे विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भौतिकाचे विज्ञान हे जडत्व आहे, तर आत्म्याच्या विज्ञानात सूक्ष्मत्वाची पराकाष्ठा आहे. शरीर सगुण, साकार आहे तर आत्मा निर्गुण, निराकार आहे.

अध्यात्म इंद्रियांना समजत नाही. विज्ञानाचा जोर इंद्रियांवर असतो म्हणजेच विज्ञान आकार, वजन, घनता आदी गोष्टींचा विचार करते. या गोष्टी ज्यात नसतात ते वैज्ञानिक नाही, असे समजले जाते. अध्यात्म परिणामांनी दाखवता येते. जो जिवंत आहे म्हणजे त्याच्यात आत्मा आहे. जिवंत असण्यासाठी असलेले तत्त्व ज्यात असते तो जिवंत असतो. ते तत्त्व बाहेर काढता येत नाही. ते तत्त्व काय आहे, हे कुणाला नक्की कळत नाही. मनुष्य जगतो, झाड वाढते, मातीत टाकलेली बी रुजते याचा अर्थ मनुष्य, झाड, माती जिवंत आहे. जिवंतपणा परिणामांनी दाखवला जातो, तसेच आत्म्याचे अस्तित्व परिणामांनी लक्षात येऊ शकते. आत्मा नावाच्या शक्तीशी, आत्मा नावाच्या संकल्पनेशी संबंध जोडायचा असल्यास बाहेरील सर्व संबंध बंद व्हायला हवेत, बाहेरच्या गोष्टींपासून इंद्रिये निवृत्त होणे आवश्यक असते. मनुष्य जीविततत्त्वाला पाहू शकत नसला, तरी तो जीविततत्त्वाशी समरस होऊ शकतो. त्याला जीविततत्त्वाचा अनुभव येऊ शकतो, ते तत्त्व समजल्यामुळे तो विशिष्ट कार्य करू शकतो. जीवनतत्त्व संपूर्ण सृष्टीत व्याप्त झालेले असते. हे जीवनतत्त्व प्रकट होऊ शकते, म्हणजे त्याला आमंत्रित करता येते. एखाद्याच्या शरीरातील जीवनतत्त्व कमी झालेले असल्यामुळे तो आजारी असला आणि अशा वेळी त्याच्या शरीरातील प्राणशक्ती वाढविण्यास एखाद्याने मदत केली तर ती आजारी व्यक्ती बरी होऊ शकते. अशा वेळी त्या व्यक्तीने काही काम केले, असे आपण परिणाम पाहून म्हणतो. एखाद्या वैद्याने आजाऱ्याला औषध दिले व तो रोगी बरा झाला तर हे कसे झाले अशी कुणाला शंका येत नाही. एखाद्याने रोग्याच्या शरीरात आत्मतत्त्व वाढविल्यासही रोगी बरा होतो. आत्मतत्त्व सगळीकडे असतेच, ते वळवून घ्यायची गरज असते. औषध, गोळ्या, इंजेक्शन देऊन रोगी बरा झाला तर आपल्याला त्यामागचे विज्ञान दिसते. एखाद्याला अमुक रोग असल्यामुळे त्याला अमुक गुणाच्या वनस्पतीपासून बनविलेले औषध दिल्यास तो बरा होतो. अशा प्रकारे औषध देऊन रोगी बरा होणे, याला अंधश्रद्धा म्हणत नाहीत, तर ते विज्ञान आहे असे म्हटले जाते. ही विज्ञानावरची श्रद्धा आहे. खरे तर ही अंधश्रद्धा होय, कारण यात दुसऱ्या बाजूला असलेल्या अदृश्य प्राणशक्तीस जमेला धरण्यात आलेले नसते.

आत्मतत्त्वाच्या प्रकटीकरणाला किंवा आत्मतत्त्वाबरोबर काम करण्याला (असे काम न्यूटनच्या किंवा आधुनिक विज्ञानाच्या भाषेत समजण्यासारखे नसल्यामुळे) अंधश्रद्धा असे ढोबळमानाने म्हणणे बरोबर नाही. आत्मतत्त्वाबरोबर काम करणे हे भौतिक डोळ्यांना दिसत नसल्यामुळे त्याला अंधश्रद्धा म्हटले जाते. डोके दुखत असल्यास अमुक गोळी घेतली की डोके दुखायचे थांबते, पोट दुखत असल्यास तमुक गोळी घेऊन आराम पडतो. पण पोटातील आत्मतत्त्व कमी झाल्यामुळे पोट दुखत आहे असे समजून रोग्याच्या पोटावर हात ठेवून पोट दुखणे, डोक्यावर हात ठेवून डोके दुखणे बरे करता येते. हा परिणाम लगेच दिसेल असे नाही, तर परिणाम दिसायला थोडा वेळ लागू शकतो. मनुष्याचे जीवन सुरू होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात, शिवाय प्रसूतीच्या वेळी अपत्य बाहेर येताना त्यात आत्मतत्त्व आले तरच जिवंत मूल जन्माला येते, अन्यथा अपत्य जन्मतःच मृत असते. याचा अर्थ अपत्य जन्माला यावे यासाठी स्त्री-पुरुषाने शारीरिक पातळीवर सर्व पूर्ती केल्या असल्या तरी आत्मतत्त्व ते सामावून घेईलच असे नसते.

श्रद्धा, अंधश्रद्धा, वैज्ञानिकता, परमात्मज्ञान, आत्मज्ञान हे सगळे बाजूला ठेवले तरी अध्यात्म व अंधश्रद्धा ही मनुष्यनिर्मित आहे. श्रद्धा म्हणजे काय, याची व्याख्या मनुष्याने बनविलेली आहे. एखाद्याची कशावर तरी आज श्रद्धा असते, उद्या ती व्यक्ती मृत झाल्यास हीच श्रद्धा तिच्याबरोबर निघून जाते. तर अध्यात्म हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्राणशक्ती चराचरात भरलेली आहे, हे सत्य आहे. पण ही अंधश्रद्धा आहे, असे काही व्यक्ती म्हणू शकतात. पण मूल जिवंत जन्माला येते तेव्हा त्याच्यात ती प्राणशक्ती अचानक येते कुठून?

अंधश्रद्धा कायमची नसते. ती कायम टिकेल, असेही नसते. मनुष्याला त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. म्हणून मन स्थिर करण्यासाठी योग इत्यादींची मदत घ्यावी लागते. विश्वास कापरासारखा उडून जाऊ शकतो. एखादे औषध बाजारात येते. हे औषध शरीराला चांगले नाही, असे कारण सांगून काही दिवसांनी ते औषध बाजारातून काढून घेतले जाते. अशा वेळी व्यवस्थेवरचा विश्वास उडाला असे आपण म्हणतो.

श्रद्धा ही विश्वासाच्या पुढची पायरी आहे. विश्वास ठेवला, की श्रद्धा तयार होते. विश्वास हा भौतिकावरचा असतो. आपण भौतिकावर श्रद्धा टिकविण्याचा प्रयत्न करतो. जे दिसत नाही, ऐकू येत नाही असे निर्गुण-निराकार आहे असे समजण्याची धारणा ही श्रद्धा. ही श्रद्धा कशी टिकवायची?

अंधश्रद्धा व अध्यात्म या दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत. जो आध्यात्मिक आहे, तो अंधश्रद्ध आहे असे आपण म्हणू शकत नाही. तो अनुभवावर जगतो आहे, त्याचा विश्वास दृढ आहे कारण तो त्याचा स्वतःचा अनुभव आहे. अमुक माणसाबद्दलचा अनुभव चांगला आहे, असे आपण म्हणतो. परंतु या गोष्टीला पुरावा नसतो, तरी त्याच्यावर श्रद्धा बसते. माणूस बदलला किंवा त्याची अपेक्षा बदलली तर त्याच्यावरची श्रद्धा उडाली, असे म्हटले जाते.

जे कायमचे नाही अशा भौतिक जगाविषयी असलेल्या संकल्पनेला श्रद्धा म्हटले तर भौतिकातील वस्तू नाश पावणार, अस्तित्व-आकार बदलत जाणार म्हणजेच श्रद्धा उडून जाणार. जे त्रिकालाबाधित आहे, त्याच्यावर असलेली श्रद्धा ही अंधश्रद्धा असूच शकत नाही. झाडाच्या लाकडापासून खुर्ची बनते तेव्हा झाड संपते. काही वर्षांनी खुर्चीच्या लाकडाचा भुगा होतो तेव्हा खुर्ची संपते. अशा प्रकारे जी वस्तू संपते त्या वस्तूची धारणा करून त्याच्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा!

डोळ्यांनी दिसत नाही तेव्हा त्याला अंध म्हटले जाते. पण डोळ्यांनी दिसत असूनही एखाद्या गोष्टीकडे पाहणे टाळले, दुर्लक्ष केले तर त्याला काणाडोळा केला असे आपण म्हणतो. चालता चालता कोणी टेबलावर आपटला तर तेथे टेबल नव्हते, असे तो म्हणू शकत नाही. टेबल तेथेच होते, ते त्याला न दिसल्यामुळे टेबलावर आपटला. अशा वेळी तू आंधळा आहेस का, असे आपण म्हणतो.

ही दिसण्याची भावना त्या वस्तूला लावता येते. पण अध्यात्माला अंधश्रद्धा लावता येत नाही. अध्यात्म व अंधश्रद्धा यांची तुलनाच होऊ शकत नाही.

आपण भौतिकाला महत्त्व दिलेले आहे, भौतिकासंबंधी मुळात श्रद्धा नसतेच. भौतिकावर असतो, तो विश्वास आणि हा विश्वास कमीजास्त होत राहतो. आपण अध्यात्माला मुळात समजूनच घेतलेले नाही, अध्यात्माचा अनुभव नसल्यामुळे त्याच्यावर श्रद्धा असण्याचा संबंधच येत नाही. ज्यांना अनुभव आलेला आहे किंवा जे त्याचा परिणाम दाखवू शकतात ते श्रद्धेला पात्र असतात. ज्या वस्तूला मोजमाप आहे, ज्याच्या मागचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र समजते त्याला विज्ञान म्हटले जाते. पण वातावरणातील प्राणशक्ती, जिच्यावर प्राणिमात्र जिवंत राहून कार्य करतात ती शक्ती दिसत नसली तरी त्यामागे प्रेरणा वा उगमस्थान असणारच. ज्यांना हे समजत नाही, त्याचा स्वीकार करण्याची ज्यांची तयारी नाही व त्याला नाकारून त्या शक्तीसंबंधी परिणामाने सिद्धता दाखविलेल्या गोष्टी ज्यांना दिसत नाहीत, तेच अंधश्रद्ध होत. अध्यात्म हे दोन अस्तित्वात एकता पाहण्याचे डोळस व साक्षित्वभावाचे शास्त्र आहे. त्याचा स्वीकार न करण्याने जीवन कष्टमय होते आणि दिसणारे व न दिसणारे दोन्ही स्वीकारले तर जीवन पूर्ण आनंदमय होऊ शकते!

अजून काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. बालाजी तांबे

(लेखक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. मृत्युपूर्वी त्यांनी हा लेख लिहिला होता.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.