गट | Gut Health Secrets: Unraveling the Mysteries of Your Digestive System | The Essential Gut Health Secrets You Can't Ignore | What Are the Hidden Dangers Lurking in Your Gut? Uncover the Secrets!

‘गट्’-रहस्य | शक्ती साळगावकर | Secrets to a healthy gut | Shakti Salgaokar

‘गट’-रहस्य

जगप्रसिद्ध शेफ जेमी ऑलिव्हर यांनी २०१० साली ‘टेडटॉक्स’ मध्ये ‘Teach every child about food’ या विषयावर व्याख्यान दिले. ‘टेड’च्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये प्रचंड गाजलेल्या या व्याख्यानाने अमेरिकावासीयांना समाजातल्या एका गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. ‘जगातील या बलाढ्य देशाने शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी आरोग्याच्या क्षेत्रात मात्र अमेरिका पिछाडीवर राहिला आहे. आजच्या घडीला अमेरिका हा जगातील आजारी/अस्वस्थ (unhealthy) देश आहे. या अवस्थेपर्यंत पोहचण्यास जबाबदार ठरली आहे, ती देशाने ३० ते ४० वर्षांपूर्वी स्वीकारलेली ‘फास्टफूड’ची खाद्यसंस्कृती. शर्करा आणि मिठाचे अतिप्रमाण असलेले फास्टफूड व  प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या नियमित सेवनामुळे आजमितीला अमेरिकेतील ८० ते ८५ टक्के लोकांना पचनसंस्थेसंबंधित आणि लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.’ ऑलिव्हरने व्याख्यानात सदर माहिती दिली.

आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना ऑलिव्हर वेस्ट व्हर्जिनियाचे  उदाहरण देतो. ऑलिव्हर म्हणतो, ‘‘२००३ साली मी अमेरिकेच्या दक्षिणेकडील वेस्ट व्हर्जिनिया या राज्यात राहायला गेलो. त्या काळी वेस्ट व्हर्जिनिया हे सर्वांत आजारी/ अस्वस्थ (unhealthy) राज्य म्हणून ओळखले जात होते. तेथे मला अनेक लठ्ठ व्यक्ती आढळल्या. येथील बहुतेक रहिवासी मधुमेह, यकृत निकामी होणे अशा भयंकर आजारांनी ग्रासलेले होते. हे असे का, याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले, की बदललेली खाद्यसंस्कृतीच या लोकांचा घात करत आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी येथील लोकांच्या जेवणात आजूबाजूच्या परिसरात पिकणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या भाज्या, फळे यांचा समावेश होता. मात्र, झपाट्याने झालेल्या विकासासोबत येथील लोकांनी ‘फास्टफूड’ची संस्कृती स्वीकारली. कामासाठी घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना स्वयंपाकघरात जेवण बनवण्यापेक्षा पोटभरीचे आणि जिभेला चविष्ट वाटणारे पर्याय सोयीचे वाटू लागले. हळूहळू ही सोयच त्यांची खाद्यसंस्कृती बनून गेली. आपल्या अभ्यासाची खातरजमा करण्यासाठी ऑलिव्हरने येथील शाळांना भेटी देत मुलांशी संवाद साधला. या संवादातून त्याच्या लक्षात आले की, पॅकेटबंद आणि प्रक्रिया केलेले (processed) अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे येथील अनेक मुलांनी ताजी फळे, भाज्या पाहिलेल्याही नाहीत. त्यामुळे त्यांना फळे, भाज्या ओळखणेही कठीण जात होते.’’ आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्याने त्याला भेटलेल्या एका १६ वर्षीय मुलीचे उदाहरण दिले. तो म्हणाला, ‘‘मला भेटलेल्या या मुलीचे फारफारतर आणखी ६ वर्षांचे आयुष्य शिल्लक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिला पौष्टिक जेवण कसे खावे किंवा घरी स्वयंपाक कसा बनवावा, हे कोणी शिकवलेच नाही. पौष्टिक अन्न मिळणे हा मुलांचा हक्क आहे, निरोगी पिढी घडवण्यासाठी आणि सुदृढ राहण्यासाठी आजपासूनच आपल्याला ‘अन्नक्रांती’च्या दिशेने वाटचाल करावी लागेल.’’

ऑलिव्हरने वेस्ट व्हर्जिनिया-मधील अनेक शाळा व सार्वजनिक ठिकाणांना भेट देत पौष्टिक आणि चविष्ट अन्नपदार्थ घरी कसे बनवावे, याचे प्रशिक्षण लोकांना दिले. अमेरिकेतील शाळांमधून पौष्टिक जेवण मिळावे, यासाठी तो आग्रही राहिला. ऑलिव्हरच्या व्याख्यानाच्या तब्बल १३ वर्षांनंतर अमेरिकेतील फास्टफूड विकणाऱ्या बलाढ्य कंपन्या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या. त्यांना एखाद्या पदार्थामध्ये कॅलरीजचे प्रमाण किती आहे हे उघड करावे लागते. तर दुसरीकडे पौष्टिक अन्नपदार्थांचे महत्त्व कळू लागल्याने तेथील फास्टफूडच्या दुकानांमध्ये आता पूर्वीसारखी गर्दीही दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया केलेले पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या आज आपल्या अस्तित्वासाठी हातपाय मारताना दिसत आहेत. खाद्यसंस्कृतीचा हा इतिहास सांगण्याचा खटाटोप एवढ्याचसाठी की, ४० वर्षांपूर्वी अमेरिकेची खाद्यसंस्कृती जिथे होती, त्या धोकादायक वळणावर आज आपण उभे आहोत.

एकीकडे जागतिकीकरण, विभक्त कुटुंबपद्धती आणि स्त्रियांसमोरील वाढलेले व्याप तर दुसरीकडे सहज, सोपे आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या फास्टफूडमुळे अमेरिकेच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचालही ‘अनहेल्दी’ खाद्यसंस्कृतीच्या दिशेने सुरू आहे. आरोग्यासाठी हानिकारक ठरवलेल्या ज्या-ज्या गोष्टी पाश्चिमात्य देशांनी नाकारल्या त्या गोष्टींच्या जाहिराती करून आज भारतातील क्रिकेटर्स, कलाकार आणि समाज माध्यमांवरील प्रभावक (influencer) भरमसाठ पैसा कमवत आहेत आणि आपण त्यांनी केलेल्या जाहीरातबाजीचे बळी प्रडत आहोत.

गटहेल्थ म्हणजे काय?

जगभरात आज ‘गटहेल्थ’बद्दल भरपूर चर्चा सुरू आहे. पण ‘गट’ म्हणजे नेमके काय? आपल्या आरोग्याचा आपल्या पचनक्रियेशी आणि पचनसंस्थेशी निकटचा संबंध असतो. पचनसंस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे आतडे. आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या आणि वाईट जीवाणूच्या (बॅक्टेरिया) स्थितीला गटहेल्थ म्हणतात. गेल्या काही वर्षांतील संशोधनानंतर असे लक्षात आले आहे की, आपल्या शरीराची यंत्रणा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी आपल्या आतड्यांमधील चांगले जीवाणू महत्त्वाची भूमिका बजावतात.

तुमच्या आहारात ऋतुनुसार पिकणारी ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, मूळ रूपातील धान्ये यांचा जितका समावेश कराल तेवढे तुमच्या शरीरातील चांगल्या जीवाणूंचे पोषण होईल. भारतीय खाद्यसंस्कृती ही अत्यंत ‘गट फ्रेंडली’ आहे. आपल्याकडे विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या कोशिंबीरी, पालेभाज्या,फळभाज्या, गोडाचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ खाल्ले जातात. या सगळ्यांमधून त्या-त्या ऋतूंमध्ये शरीराला लागणारी ऊर्जा आणि पोषणमूल्ये पुरवली जातात. अन्न म्हणजे फक्त कॅलरीज, प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ नसून अन्नातून विविध अमिनो अॅसिड, अँटी ऑक्सिडंट्स, तंतुमय पदार्थ (फायबर) असे महत्त्वाचे घटक आपल्या शरीराला मिळतात. उदाहरण द्यायचे, तर आपल्याकडे इडलीसोबत खोबऱ्याची चटणी, पुरणपोळीवर तूप खाण्याची पद्धत आहे.

आतड्यांमधील चांगले जीवाणू जितके वैविध्यपूर्ण तितकी तुमची प्रकृती चांगली, असे समजले जाते. आपल्या आहाराचा जीवाणूच्या वाढीवर परिणाम होतो. दीर्घकाळ शरीरात दडलेल्या आजारांवर उपचार करण्यासाठी आपण डॉक्टरकडे गेलो असता डॉक्टर घरी पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला आपल्याला देतात. याचे कारण तुम्हाला तुमच्या आईकडून मिळालेली ‘सूक्ष्मजीव संस्था’ – गटहेल्थ होय! त्यामुळेच काही लोकांना भात खाणे रुचते, तर काही लोकांना भात खाल्ल्यानंतर ग्लानी येते. काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आपल्या आवडीनिवडीसुद्धा याच गटमध्ये तयार होतात.

सध्या आपल्याकडे आवडते तेच खाण्याचा अतिरेक केला जातो. तुम्ही असे एकच पदार्थ खात राहिला तर तुमचे आतडे तेच अन्न पचवायला लागणारे जीवाणू बनवायला सुरुवात करते. उदाहरण, जर तुम्ही रोज बर्गर खात असाल तर बर्गर पचवायला लागणारे ‘अ’ जीवाणू शरीरात वाढत जातील. तर दुसरीकडे वरणभात पचवणाऱ्या ‘ब’ जीवाणूला पोषण न मिळाल्याने ते कमकुवत होत जातील. अशा अवस्थेत ‘अ’ जीवाणूने आपले नियमित काम सोडल्यास ‘ब’ जीवाणू त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. ही अवस्था दीर्घकाळ राहिल्यास शरीरात ‘अ’ जीवाणूचे वर्चस्व वाढतच राहील आणि पुढच्या पिढीला आपल्या पालकांकडून किंवा आईकडून अशा बिघडलेल्या ‘गटहेल्थ’ची रचना जन्मजात मिळेल.

आपल्या शरीराला जितक्या जीवाणूंची ओळख होते. तितका आपला गट हा चांगला असतो. त्यामुळे एखाद्या वाईट जीवाणूचा तुमच्या शरीरात प्रवेश झाला तर त्याला प्रतिकार करण्याची यंत्रणा तुमच्या शरीरात तयार होते. लसीकरणाची प्रक्रियाही याच पद्धतीने तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करत असते. आपल्या शरीराला एका मर्यादित प्रमाणात जीवाणूची ओळख झाली की प्रतिकारशक्ती वाढू लागते. पण, आजच्या आहाराच्या बदललेल्या सवयींमुळे अशा प्रकारे जीवाणूशी ओळख करून घेण्याचे प्रमाण कमी होत चालल्याचे दिसते. उदा. लहान मुले मैदानात खेळताना मातीचे हात तोंडात घालतात, तेव्हा त्यांच्या शरीराची या नव्या चांगल्या-वाईट जीवाणूसोबत ओळख होत असते. पण आज आपण सॅनिटायझर आणि मिनरल वॉटर यांचा अतिवापर करून मानवनिर्मित रासायनिक सुरक्षित जगात वावरत आहोत. यामुळे आपल्या शरीराची नव्या जीवाणूशी ओळख होणे आपणच बंद केले आहे. परिणामी, शरीरातील प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे.

गटहेल्थ बिघडल्यास काय  परिणाम होतात ?

चांगले जीवाणू तुमच्या आहारावर जगतात. मात्र, आधुनिक जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे आतड्यांशी संबंधित आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊन तब्येत बिघडते. वारंवार होणाऱ्या तब्येतील चढउतारांमुळे पोट खराब होणे, कमी भूक लागणे, बद्धकोष्ठता, अतिसार, छातीत जळजळ होणे असे पोटाशी संबंधित आजार डोके वर काढू लागतात. याचा हार्मोन्स आणि मेंदूवरही परिणाम होतो. हार्मोन्समधील बिघाडामुळे वजन वाढणे, मासिक पाळीत बदल, पीसीओडी, थायरॉईड असे आजार होतात. तर मेंदूवरील परिणामामुळे थकवा, चिंता, नैराश्य, मूड बदलणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

कशी घ्यावी गटची काळजी?

* जर तुमचे आतडे निरोगी असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकाल. त्यामुळे आहारात अतिगोड, खारट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळा. आपला आहार वैविध्यपूर्ण आणि चौरस असावा. त्यामुळे आतडे जलद आणि चांगल्या प्रकारे काम करते. याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

* प्रोबायोटिक फूड्स आतड्यांमध्ये चांगले जीवाणू वाढण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्या आहारात जवस, ओट्स, चिया सीड्स, केळी, सफरचंद, बार्ली, कडधान्ये, डाळी, शेंगा यांसारख्या प्रोबायोटिक फूडचा समावेश करावा. आंबवलेले पदार्थ शरीरात नैसर्गिक प्रोबायोटिक म्हणून काम करतात, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.

* आजकाल सर्दी-खोकला झाला तर प्रतिजैवकांचा वापर होताना दिसतो. ही प्रतिजैविके आपल्या शरीरातील चांगल्या जीवाणूंवरसुद्धा हल्ले करतात. त्यांच्या अतिवापरामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊन व्यक्ती वारंवार आजारी पडू शकते. त्यामुळे प्रतिजैवकांचा अतिवापर टाळा.

* मुलांना पौष्टिक आणि ताजे जेवण द्या. रोज घरी बनवलेल्या पौष्टिक अन्नाचे सेवन करा.

आपले शरीर आपल्याला काय संकेत देत आहेत, याकडे थोडे लक्ष दिले तरी जी गोष्ट शिकायला अमेरिकेला ४० वर्षे लागली ती गोष्ट आपण सहज शिकून पुढची निरोगी पिढी घडवू शकतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शक्ती साळगावकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.