त्वचा | skincare routine | skin types | For Natural Glowing Skin | beauty tips for glowing skin at home | home remedies for smooth face

सतेज त्वचेसाठी…| शेफाली त्रासी | For a Fresh Skin | Dr Shefali Trasi Nerurkar

सतेज त्वचा साठी

‘‘चांगली त्वचा आपोआप मिळत नाही, तुम्ही नीट काळजी घेतली तरच तुमची त्वचा सतेज होते,’’ हे ऐकल्यावर आपल्या दिनचर्येमध्ये त्वचेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपले पूर्वज म्हणत असत, की चांगली त्वचा हा जन्माने मिळालेला गुण आहे. पण, सध्याच्या तंत्रज्ञानाने बदल होत जाणाऱ्या जगात योग्य घटक योग्य प्रमाणात वापरून सुंदर त्वचा नक्कीच साध्य करता येऊ शकते.

चांगल्या त्वचेसाठी आधी त्वचेचे प्रकार समजून घ्यायला हवेत. साधारणतः त्वचेचे तीन प्रकार आढळून येतात – सामान्य, तेलकट आणि कोरडी. मिश्र किंवा टी-झोन तेलकट त्वचा हा प्रकारही अनेक व्यक्तींमध्ये आढळून येतो. त्यामुळे सर्वात आधी त्वचाप्रकार समजून घ्या. कोणत्याही प्रकारच्या त्वचेची काळजी घेताना क्लीन्झर किंवा फेसवॉश, मॉइश्चरायजर आणि सनस्क्रीन अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्वचेची पूर्ण निगा राखण्यासाठी नाइट सीरम, स्क्रब किंवा मास्क याचीही भर त्यात घालता येईल.

सकाळी त्वचेला क्लिन्झिंग करणे फायद्याचे असते. कारण रात्रभरात आपल्याला घाम येऊन आपली त्वचा अधिक तेलनिर्मिती करत असते. या तेलामुळे त्वचेवर अॅक्ने (मुरुम) येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि सकाळी त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण जी प्रसाधने वापरतो ती त्वचेत शोषली जाण्याला प्रतिबंध होतो. रात्री क्लिन्झिंग केल्यास त्वचेवरील दिवसभराची धूळ व मळ निघून जातो. तेलकट त्वचेसाठी जेल किंवा फेसयुक्त फेसवॉश गरजेचा असतो. यामुळे त्वचा व्यवस्थित धुवून निघते आणि त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो. अशा फेसवॉशमध्ये सॅलिसायलिक अॅसिड, मॅन्डेलिक अॅसिड किंवा ग्लायकॉलिक अॅसिड असल्याची खातरजमा करून घ्या. तर सामान्य व कोरड्या त्वचेसाठी फेसवॉशमध्ये मायसेलर वॉटर, स्टेरिल किंवा सेटिल अल्कोहोलसारखे फेस न येणारे घटक असतील याची खातरजमा करून घ्या. हे फेसवॉश नियमितपणे वापरा. कारण सामान्य साबण त्वचेवर कठोर ठरू शकतो आणि कोरडेपणा व ‘एक्झिमा’सारख्या त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतो.

मॉश्चरायझर हे त्वचेसाठी टॉनिक किंवा बूस्टरसारखे असते. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असते. जेलवर आधारित मॉश्चरायझर हे तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असते. इतर त्वचाप्रकारांसाठी क्रीमवर आधारित मॉश्चरायझर वापरावे. ‘अटॉपिक डर्माटायटिस’ (अत्यंत कोरडी त्वचा) ची समस्या असल्यास त्वचेत ओलावा राखण्यासाठी तीव्र स्वरुपाच्या मॉश्चरायझरची गरज असते.

काही प्रकारच्या कोरड्या त्वचांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्सचा लेप चेहऱ्यावर लावणे आवश्यक ठरते. चांगल्या मॉश्चरायझरमध्ये ह्यॅलुरॉनिक अॅसिड, सोडियम ह्यॅलुरोनेट, मायसेलर वॉटर, ग्लिसरिन, शिया बटर, कोलोयडल ओट मील, व्हिटॅमिन ‘ई’ हे घटक असतात. तुमच्या त्वचेसाठी कोणते प्रसाधन / उत्पादन उपयुक्त आहे, हे शोधणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे वातावरण बदलल्यावर मॉइश्चरायजरही बदलणे आवश्यक असते. उदा.उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्वचा तेलकट वाटत असेल तर जेलवर आधारित मॉइश्चरायजर वापरावे. पण हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर क्रीमवर आधारित मॉइश्चरायजर वापरावे.

जेल किंवा मॅट फिनिश असलेल्या सनस्क्रीनमुळे त्वचा तेलकट दिसणार नाही. झिंक ऑक्साइड किंवा टायटॅनिअम ऑक्साइड-सारखी फिजिकल सनस्क्रीन (त्वचेवर लावल्यावर त्वचेवरच राहून नील किरण परावर्तित करते) सुरक्षित असतात आणि अतिनील व इन्फ्रारेड रेडिएशनविरुद्ध उपयुक्त ठरते.नोकरदार स्त्रिया फाउंडेशन बेस असलेले सनस्क्रीन वापरू शकतात. असे असले तरी कोणत्याही सनस्क्रीनचा परिणाम हा जास्तीत जास्त ४-५ तास टिकतो. त्यामुळे उन्हात अधिक काळ वावरत असणाऱ्या व्यक्तीने ४-५ तासानंतर पुन्हा सनस्क्रीन लावणे हितावह असते. लॉकडाऊननंतर, जेव्हा लोक पुन्हा प्रत्यक्ष कामावर जाऊ लागले तेव्हा ते अधिक ‘टॅन’ (त्वचा काळवंडू लागली) होऊ लागले. अशा पिगमेंटेशनसाठी कम्प्युटरमधून येणारा प्रकाश कारणीभूत असतो. त्यामुळे वातावरण कसेही असले, तरी सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे.

क्लीन्झर, मॉइश्चरायजर, सनस्क्रीन आदी प्रसाधने निवडल्यावर चांगले ‘गुड नाइट’ (रात्रीसाठी क्रीम) उत्पादन निवडणेही तेवढेच आवश्यक आहे. नाइट प्रॉडक्ट्स (रात्रीच्या उत्पादनांमध्ये) अॅक्टिव्ह घटक असतात, जे त्वचेची संपूर्ण काळजी घेण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त असतात. सीरम, क्रीम, तेल किंवा स्लीप मास्क या प्रकारात ही उत्पादने उपलब्ध आहेत.

सीरम: सीरम म्हणजे पातळ, त्वचेत पटकन शोषले जाणारे द्रवपदार्थ (लिक्विड). त्वचेत ओलावा राखण्यासाठी, हायपर पिगमेंटेशनच्या समस्यांसाठी आणि बारीक रेषा व सुरकुत्यांवर उपचार करण्यासाठी सामान्यपणे याचा वापर केला जातो. सुदृढ उजळ त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’, इतर अँटिऑक्सिडंट्स, रेटिनॉइड्स, निआसायनामाइड, ह्यॅलुरॉनिक अॅसिड आणि पेप्टाइड्स वापरतात. कोणत्याही प्रकारच्या त्वचाप्रकारासाठी सीरम वापरतात.

क्रीम: सामान्य किंवा कोरड्या त्वचाप्रकारांसाठी क्रीम वापरतात. नाइट क्रीममुळे त्वचेमध्ये कोलॅजनची निर्मिती अधिक प्रमाणात होते. या क्रीममध्ये ह्यॅलुरॉनिक अॅसिड, मायसेलर जेल, निआसायनामाइड, कोलॅजेन पेप्टाइड्स, बॅकुशिऑल आणि पेप्टाइड्स असणे हितकारक असते. या घटकांमुळे वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर कमी दिसतात आणि त्वचा ओलसर (हायड्रेटेड) व गुबगुबीत दिसते.

त्वचेवरील हायपर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी कोजिक अॅसिड, अर्बुटिन, ग्लायकोलिक अॅसिड, अॅझेलिक अॅसिड इत्यादींचा समावेश असलेल्या क्रीमचा वापर करता येईल. त्वचेवरील रेषा व सुरकुत्या कमी करण्यासाठी रेटिनॉल क्रीमची मदत होते.

तेल: अत्यंत कोरड्या त्वचाप्रकारांसाठी बहुधा तेल वापरले जाते. वय झालेल्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी रोझहिप व सीबकथॉर्न ही तेले अँटिऑक्सिडंटचे काम करतात. साधे खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदामाचे तेल कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायजरचे काम करते. असे असले तरी इतर त्वचाप्रकारांबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. कारण तेलांमुळे फॅलिक्युलिटिस किंवा फर्नकल्स अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळा त्वचा व तेल यांच्यात क्रिया होऊन चुरचुरणारा त्वचारोग होऊ शकतो.

सीरम वापरायचे की तेल याबाबत नेहमीच लोकांचा गोंधळ उडतो. सीरममध्ये त्वचेवर विशिष्ट काम करणारे निश्चित असे गुणधर्म असतात तर तेल त्वचेला प्रामुख्याने ओलावा प्रदान करते. सीरममध्ये तेल किंवा पाणी हा प्रमुख घटक असतो (ऑइल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड). सीरम त्वचेमध्ये झिरपू शकते, तर तेल त्वचेच्या आत न झिरपता त्वचेच्या वरील थरावरच राहते.

त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रब किंवा एक्सफॉलिएटरचा वापर करता येतो. या साधनांचा वापर करून त्वचेच्या पृष्ठभागावरील मळ काढला जातो आणि त्वचा स्वच्छ, उजळ व मुलायम राहील, याची काळजी घेतली जाते. यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा स्क्रबचा वापर करावा, अशी शिफारस केली जाते. पण त्वचेला इजा पोहचवणारे तीव्र स्क्रब वापरू नयेत.

फेस मास्क त्वचेवरील मृत पेशींना काढून टाकतात आणि त्वचेला आर्द्रता देतात. त्यामुळे ती तेजस्वी व ताजी राहते. हे फेस मास्क बहुदा पेस्ट, पावडर किंवा पापुद्र्याच्या स्वरुपात असतात. बाजारात सामान्यपणे मिळणारे फेसमास्क हे मड (चिखल) किंवा क्ले (माती) मास्क तेलकट, संवेदनशील व कोरड्या त्वचेसाठी, क्रीम मास्क (कोरड्या त्वचेसाठी) आणि जेल मास्क (सर्व प्रकारच्या त्वचेसाठी) असतात.

फेस मास्क व फेस स्क्रबपैकी मास्क अधिक उपयुक्त ठरतो. कारण तो त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो, शिवाय त्वचेला आर्द्रता देतो व अतिरिक्त तेलही शोषून घेतो. त्यामुळे तुमची त्वचा मऊ व स्वच्छ होते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्रसाधनांची यादी आपल्याला मिळाली आहे. त्यातून आपल्या त्वचेला साजेसे असे उपयुक्त उत्पादन आपण निवडू शकतो. त्यामुळे तजेलदार त्वचा प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. चुकीचे उत्पादन वापरले, तर त्वचेवर मुरुम येऊ शकतात किंवा त्वचारोग होऊ शकतो. कोरड्या त्वचेमध्ये रेटिनॉल उत्पादनांमुळे अतिरिक्त कोरडेपणा येऊन ड्राय एक्झिमा होऊ शकतो.

त्वचाविकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या निश्चित करता येऊ शकते. काही विशिष्ट प्रकारच्या त्वचाविकारांसाठी त्वचाविकार तज्ज्ञांकडून उपचार घेण्यास कचरू नका.

 केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा समावेश स्कीनकेअरमध्येच होतो. चमकदार केसांसाठी चांगले शॅम्पू आणि लीव-ऑन सीरम वापरणे हितावह असते. हे शॅम्पू सल्फेटरहित व पॅराबेनरहित असतील, याची काळजी घ्या. एका चांगल्या शॅम्पूमध्ये पेप्टाइड, कॅफिन, अॅलोवेरा आणि इतर वनस्पतींवर आधारित घटक असावेत. चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा केसांना तेल लावावे. यासाठी खोबरेल तेल, बदामाचे तेल, आरगन तेल आणि मोरोक्कन तेल फायदेशीर ठरते.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शेफाली त्रासी

(लेखिका अनुभवी डर्माटोलॉजिस्ट आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.