September 12, 2024
आरोग्य | foods for eye health | eye check | foods to improve eyesight | good eyesight | cure for the eye | foods good for eye health | nutrients for eyesight improvement

जपावे डोळ्यांचे आरोग्य | डॉ. निखिल नास्ता | Maintain eye health | Dr. Nikhil Nasta

जपावे डोळ्यांचे आरोग्य

आपल्या डोळ्यांना आपण फारच गृहीत धरतो. डोळे हा असा अवयव आहे, जो आपण २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस वापरत असतो. किंबहुना झोपेतसुद्धा आपल्या डोळ्यांची हालचाल होत असते. मग, आपले डोळे कधी तरी विश्रांती घेतात का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पाहण्याचे कार्य खरे तर डोळे करत नाहीत, तर पाहण्याचे काम मेंदू करतो. तुम्ही जे स्वप्न पाहता ते एक कल्पनाचित्र असते. म्हणजे स्वप्नात डोळे काम करत नसतात, तर आपण मेंदूतील दृश्य पाहत असतो. सामान्य परिस्थितीतही डोळे प्रतिमा कैद करतात, ती फक्त निगेटिव्ह असते. त्याचे फोटोमध्ये रूपांतर मेंदूत होते.

सध्या आपण डोळ्यांचा अतिगैरवापर करत आहोत. मिळालेल्या छोट्याशा ब्रेकमध्येही फोन हातात घेऊन समाजमाध्यमे, ईमेल, इंटरनेटवर आपण वेळ घालवतो. आता तर कारमध्येसुद्धा स्क्रीनवर मॅप पाहतो. एकूण काय, तर आपल्या डोळ्यांवर येणारा ताण, थकवा वाढला आहे.

अतिनील किरणे आणि डोळे

अतिनील किरणे आधीपासून आहेत, त्यांची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र गॅजेट्स वापरताना त्यांची स्क्रीन यूव्ही संरक्षित असेल, याची खातरजमा करून घ्या. तसेच चष्मासुद्धा यूव्ही रेजपासून संरक्षण देणारा असावा. चष्मा (नंबर) नसेल तरीही अँटि-ग्लेअर्ड ब्लू लाइट चष्मा वा लेन्स वापरणे पुरेसे आहे. उन्हात जातानाही असा चष्मा किंवा गॉगल लावावा, असा अनेकांचा समज असतो. पण त्यात फार तथ्य नाही. आपल्या डोळ्यांमध्ये निसर्गतःच एक लेन्स असते. त्यात आवश्यक फिल्टर असतात. वय झाल्यावर तो पडदा किंवा लेन्स बदलतात. जसे, मोतिबिंदू झाल्यावर डोळ्यांमध्ये लेन्स बसवतात तसे. जी लेन्स बसवतात, त्यात यूव्ही संरक्षण असणे अपेक्षित आहे. किंबहुना, ते आता सर्वच लेन्समध्ये असते.

विशेष यूव्ही संरक्षणाची गरज कुणाला असते ?

जे गिर्यारोहणासाठी समुद्र-सपाटीपासून खूप उंचीवर जातात त्यांना अशा गॉगल, चष्म्याची आवश्यकता असते. उंचीवर असणारी अतिनील किरणे डोळ्यांसाठी धोकादायक असतात.एवढ्या उंचावर यूव्ही रेज संरक्षित चष्म्याशिवाय गेल्यास डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते. जे वैमानिक दररोज समुद्रसपाटीपासून इतक्या उंचीवर असतात, त्यांनीसुद्धा असे संरक्षक गॉगल वापरले पाहिजेत.

शस्त्रक्रियेनंतर गॅसजवळ का जाऊ नये?

डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर गॅसजवळ जाऊ नका असे डॉक्टर सांगतात. त्याचे कारण म्हणजे भारतीय स्वयंपाकात फोडणी असते, मसाला असतो, कुकरच्या शिट्ट्या होतात ज्याचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो. परदेशात मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करतात, तसा केला तर काही हरकत नाही.

मेकअप आणि डोळ्यांचे आरोग्य

प्रत्येकाच्या बजेटमध्ये महागडी उत्पादने बसत नाहीत. पण तरीही त्वचेवर किंवा डोळ्यात थेट वापरली जाणारी उत्पादने ही ब्रँडेड असावीत. रस्त्यावर, ट्रेनमध्ये विकली जाणारी स्वस्त आणि दर्जाहीन उत्पादने अजिबात वापरू नका. अशी उत्पादने वापरताना आधी पॅच टेस्ट करावी (हाताच्या त्वचेवर लावून पाहा) आणि मगच ती वापरावीत. त्यामुळे त्वचेची जळजळ होत आहे की नाही, हे आधीच समजून येते. भारतीय स्त्रिया काजळ वापरतात, ते थेट डोळ्यांच्या आतील पटलावर लावले जाते. हे काजळ लावल्याने पापण्यांच्या आत काजळाचे कण डोळ्यांत राहू शकतात, ज्यामुळे संसर्ग होऊन रांजणवाडी होऊ शकते.

नवजात बालकांना काजळ लावायचे झाल्यास घरी बनविलेले काजळ हलक्या हातांनी लावावे. सुरमा लावताना त्याची काडी निर्जंतुक असावी.

आयड्रॉप्सची सुरक्षा:

डोळे दुखू लागले किंवा चुरचुरू लागले तर अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता आयड्रॉपचा वापर करतात. मेडिकल दुकानात ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय मिळणारे आयड्रॉप्स तसे सुरक्षित असतात. पण ते वापरल्यानंतर दोन-तीन दिवसांत आराम पडला नाही, तर मात्र तातडीने डॉक्टरांची भेट घ्या. दुकानात मिळणारी ‘ल्युब्रिकंट्स’ किंवा ‘आयस्पा कूलिंग’साठीचे आयड्रॉप वापरता येतील, पण स्टेरॉइडसारखे काही ड्रॉप्स डोळ्यात घालणे हानिकारक ठरू शकतात.

डोळ्यांच्या समस्या आणि घरगुती उपाय:

घरगुती उपाय हे साध्या आणि दैनंदिन समस्यांसाठी असतात, गंभीर स्वरुपाच्या समस्यांसाठी नाही. डोळ्यांवर काकडी ठेवणे, डोळ्यात गुलाबपाणी घालणे असे घरगुती उपाय डोळ्यांना आराम देण्यासाठी करता येतील. पण यासाठी वापरण्यात येणारे साहित्य निर्जंतुक असावे. मात्र डोळ्यात कोणत्याही वनस्पतींचा अर्क, दूध किंवा इतर कसले रस घालण्यामुळे डोळ्यांना अपाय होऊ शकतो. काहीजण कापसाचे बोळे ग्रीन टीमध्ये बुडवून डोळ्यांवर ठेवतात. जोपर्यंत डोळ्यांच्या वरच्या भागाचा संबंध आहे, तोपर्यंत ठीक असते. पण डोळ्यांच्या आत काहीही घालताना विचार करायला हवा.

असा द्या डोळ्यांना आराम:

काहीजण म्हणतात, डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम करायला पाहिजेत. उलट, तुमच्या डोळ्यांना आराम द्या, रिलॅक्स करा. हे म्हणजे, दिवसभर जिममध्ये व्यायाम केल्यावर वॉर्मअपसाठी काय करू, असे विचारण्यासारखे आहे. त्यामुळे डोळे बंद करून आरामात बसा. दिवसात ५-७ मिनिटे तरी अशाप्रकारे शांत, काहीही न करता बसायला हवे.डोळ्यांना थकवा आला असेल, तर थंड पाण्यात बोटे बुडवा आणि या बोटांनी डोळ्यांना हलका मसाज द्या. याशिवाय, स्क्रीन टाइम कमी करावा. दिवसाला आपल्याला साधारण सहा तास कम्प्युटरसमोर बसावे लागत असेल तर सलग सहा तास बसण्याऐवजी दर ४०-४५ मिनिटांनी एक ब्रेक घ्यावा. झोपसुद्धा डोळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

मुले आणि डोळ्यांचे आरोग्यः

आजकाल दोन-तीन वर्षांच्या मुलांना चष्मा लागल्याचे दिसून येते. ज्यांना नंबर येणार त्यांना तो येणारच आहे. एखाद्या व्यक्तीला / जोडप्याला नंबर असू शकतो, पण मुलांना नाही. नंबर येणे हे बहुधा बुबुळाच्या आकारावर अवलंबून असते. ०.५ मिमीचा फरक झाला तरी नंबर लागतो. नंबर लागला तर चष्मा घालायचा ज्यामुळे स्पष्ट दिसण्यास मदत होते. लहानपणी नंबर लागला असेल तरी मोठा झाल्यावर लेझर शस्त्रक्रिया करून हा नंबर घालवता येतो. एखाद्या मुलाला चष्म्याची आवश्यकता असेल, पण त्याच्या पालकांनी दुर्लक्ष केले असेल तर ‘लेझी आय’सारखी परिस्थिती मुलांच्या बाबतीत उद्भवू शकते. यात पाहण्याची क्षमता उत्तरोत्तर कमकुवत होत जाते. त्यामुळे नंतरच्या काळात चष्मा लावला तरी पाहण्याची क्षमता राहत नाही.‘लेझी आयमुळे’ काही वेळा डोळे तिरळेसुद्धा होतात. आता पालक सजग झालेले असल्यामुळे मुलांच्या डोळ्यांची काळजी आपण नियमितपणे करायला हवी.

काही मुलांना डोळ्यांत सतत संसर्ग (रांजणवाडी वा तत्सम) होतो. याचे कारण म्हणजे त्यांच्या डोळ्यांना नंबर असू शकतो किंवा मळलेल्या हातांनी डोळे चोळले असण्याची शक्यता.त्यामुळे मूलभूत स्वच्छता राखायला हवी.

मुलांचे डोळे व्यवस्थित आहेत की नाहीत, याची काही लक्षणे असतात. एक म्हणजे तुमचे मूल डोळ्यात डोळे घालून पाहू शकते का? दुसरे म्हणजे काही मुलांच्या डोळ्यांची सतत थोडी थोडी हालचाल होत असते. मूल डोळ्यात थेट पाहून बोलू शकत नसेल तर काहीतरी समस्या आहे, असे समजावे. याची खातरजमा करण्यासाठी आधी एखादी मोठ्या आकाराची वस्तू खाली टाकून ती मुलाला उचलायला सांगा, मग त्याहून लहान, मग त्याहून लहान.

सर्वात बारीक वस्तू (तांदळाचा दाणा वगैरे) तो उचलू शकला तर ठीक आहे अन्यथा त्याला डॉक्टरांकडे न्यायची गरज असल्याचे समजावे. तिसरी गोष्ट म्हणजे मंडला आर्टसारखी छोटी छोटी चित्रे देऊन ती रंगविण्यास सांगणे. हे काम त्यांना अगदी व्यवस्थित जमले नाही, तरी वयानुसार ही मुले त्यातील छोटे छोटे भाग नञ्चकीच रंगवू शकतील. चौथे म्हणजे मूल खूप वेळा धडपडत असेल, तर त्याची काळजी घ्यायला हवी.

लक्षात ठेवा:

वयाच्या साधारण १८-१९ व्या वर्षी तुमचा नंबर निश्चित झालेला असतो. त्यानंतर दर पाच वर्षांनी डोळ्यांची तपासणी करावी.

कम्प्युटरच्या वापरानुसार डोळ्यांवर ताण येऊ शकतो.

चष्मा दर अडीच-तीन वर्षांनी बदलावा. कारण त्यावरील यूव्ही कोटिंग खराब होते.

चाळिशीनंतर डोळ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्या असतात. तुमच्या पालकांना ग्लाउकोमा, प्रेशर किंवा मोतिबिंदू असेल तर तुमच्या डोळ्यांमध्ये तो कदाचित दहा वर्षे आधी येऊ शकतो. त्यामुळे स्वतःहून तपासणी करणे हितावह असते.

याशिवाय जीवनशैलीशी निगडित (मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड आणि काहीवेळा गरोदरपणानंतर संप्रेरकांमध्ये होणारे बदल, डोळे शुष्क होणे) व आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्याचाही परिणाम डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे डोळ्यांची तपासणी करावी.

डोळ्यात कचरा गेल्यास सर्वप्रथम डोळे बंद करून स्थिर बसावे. त्यानंतर एका कपात पाणी घेऊन त्यात डोळा उघडावा. डोळ्यात गेलेला कण निघून जाईल. त्यानंतर थोडा वेळ शांत बसा आणि बरे वाटत आहे का ते पाहा. त्यातूनही बरे वाटत नसल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.

कारच्या सनरूफमधून उघड्या डोळ्यांनी बाहेर येऊ नये. कारण वातावरणातील कण डोळ्यात जाण्याचा धोका असतो.

झोपून वाचन करू नये. मोबाइल, टॅद्ब्रलेट किंवा टीव्ही डोळ्यांपासून १ ते ३ फुटाच्या अंतरावर असावे. मुलांना स्क्रीन टाइम द्यायचा असेल तर तो टीव्हीचा द्यावा. मोबाइल किंवा टॅब्लेट शक्यतो टाळावे.

सकाळी उठल्या-उठल्या तसेच झोपेपर्यंत मोबाइल पाहू नये. डोळ्यांना आराम द्यायचा असेल तर पानांकडे, हिरवळीकडे पाहावे. हिरवा रंग डोळ्यांना शांत करतो.

डोळ्यांसाठी विशेष आहार घ्यायची गरज नसली, तरी एकूण आहारापैकी ८० टक्के आहार सकस असावा.

आपली मूलभूत जीवनशैली आरोग्यदायी ठेवावी. वेळेत झोपावे, दररोज ३० मिनिटे व्यायाम करावा. चहा-कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. निखिल नास्ता

(लेखक अनुभवी आयसर्जन आहेत.)

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.