फलाहार कधी व कसा करावा?

Published by प्राजक्ता धर्माधिकारी on   January 14, 2017 in   Health Mantra

An apple a day keep a doctor away…असे नेहमी म्हटले जाते पण हे तितकेच खरे आहे. फलाहार हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र फलाहार हा नेमका किती घ्यावा आणि कधी घ्यावा, याबद्दल मतमतांतरे आहेत. याच फलाहाराबद्दल थोडेसे जाणून घेऊयात.

फळे खाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण साधारणपणे दिवसातून तीन वेळा जेवण घेतो. सकाळी भरपेट नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. या व्यतिरिक्त मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत. पण मग ती कधी खावीत? तर जेव्हा तुमचे पोट रिकामे असेल तेव्हा फलाहार घ्यावा. जेवण, नाश्ताच्या बरोबर कधीही फळे खाऊ नयेत. १ ते २ तास आधी किंवा नंतर फळे खावीत. आपल्याकडे असलेल्या फळांमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि असे बरेच महत्त्वाचे घटक असल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेले सगळे पदार्थ यामधून मिळतात.

    You may also like : What’s Your Breakfast Plan?

फळे खाण्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल, आरोग्य उत्तम राहते. तुम्हाला अपचनाचा त्रास होत नाही. सगळ्या प्रकारची फळे खाण्यामुळे शरीराला आवश्यक असलेली साखर नैसर्गिक घटकांमधून मिळते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी हलका आहार म्हणूनही आपण फलाहाराला प्राधान्य देऊ शकतो.

दूध आणि फळे असे एकत्र कधीच खाऊ नये. हे दोन पदार्थ एकत्र आल्याने जी रासायनिक प्रक्रिया होते त्याने तयार होणारे अॅसिड शरीराला घातक असते. पण अगदीच जर हे खाण्याची इच्छा झालीच तर ते ताजे खावे. फ्रीजमध्ये ठेवलेले खाऊ नये.

फळे खाण्याची उत्तम वेळ:

  • सकाळी उठल्यानंतर, दुपारी १२ च्या सुमारास, सायंकाळी ४ ते ५ यावेळेत रोज फळे खावीत.
  • दिवसभरात फळांच्या माध्यमातून साखर तुमच्या पोटात गेल्यास तुमची एनर्जी लेव्हल मेंटेन राहील.

फळे कधी खाऊ नयेत:

  • जेवणानंतर किंवा जेवणाआधी लगेचच फळे खाऊ नयेत.
  • रात्री झोपण्याच्या आधी फळे खाऊ नयेत.
  • रात्री फळे खाल्याने एनर्जी वाढते आणि झोप शांत लागत नाही.

लक्षात ठेवा! प्रत्येक सिझनची सगळी फळे खावीत. गोड, आंबट, तुरट हे सगळे रस शरीराला आवश्यक आहेत. गरोदर स्त्रियांनीही सगळी फळे खावीत. फक्त काही उष्ण फळांचे सेवन प्रमाणात करावे. कारण सर्व फळांचा रस बाळासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

फळांचा राजा आंबा असला तरी सर्व फळांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. फलाहार हा हलका आणि पोषक आहार आहे. त्याने सुदृढ आयुष्य लाभते.

(सौजन्य : प्राजक्ता धर्माधिकारी)

अधिक माहितीसाठी कालनिर्णय फेसबुक पेज लाईक करा किंवा ट्विटर वर फॉलो करा.