ग्रेव्ही | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis

डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा | अलका फडणीस | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis

डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा

डबल बीन्स ग्रेव्ही

डबल बीन्सचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला. याचे दोन प्रकार आहेत एक वेलीवर वाढणारी तर दुसरी झुडूपवजा. आसाम, प.बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब येथे या पिकाची प्रामुख्याने लागवड होते. यात प्रथिने, लोह, कॅल्शियम व क्षार मुबलक प्रमाणात आढळून येतात.

साहित्यः  २०० ग्रॅम डबल बीन्स (ताजी किंवा सुकवलेली.), २ बारीक चिरलेले कांदे, एका मोठ्या टोमॅटोची प्युरी, आले-लसूण-मिरची पेस्ट (४-५ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ मिरची), १/४ चमचा गरम  मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा काश्मिरी तिखट, १/४ वाटी तेल, १ चमचा साजूक तूप, १/२ चमचा छोले मसाला, १/२ चमचा कसूरी मेथी, १/४ चमचा साखर, १/४ चमचा हिंग, १ कप गरम पाणी, आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ.

कृती: सर्वप्रथम डबल बीन्सचे दाणे मीठ घालून शिजवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तूप, हिंग व बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेस्तोवर चांगले परतवून घ्या. त्यानंतर आले-लसूण-मिरची पेस्ट घाला. आता यात तिखट, काश्मिरी तिखट, हळद, गरम मसाला, छोले मसाला, मीठ व साखर घालून चांगले परतवा.शिजवलेले डबल बीन्स घालून मिश्रण चांगले एकजीव करा. नंतर एक कप गरम पाणी घालून उकळी आल्यावर कसूरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. पुन्हा उकळी काढा. लच्छा पराठ्याबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

टीप: वाळवलेली डबल बीन्स वापरत असल्यास १० ते १२ तास पाण्यात भिजवून घ्या. कसूरी मेथी चुरून मिश्रणात घातल्यास चवीला छान लागते.

उत्तर भारतात गव्हाच्या पिठाचा तर दक्षिण भारतात मैद्याचा पराठा बनवला जातो. विविध भाज्या भरूनही पराठा बनवला जातो. लच्छा पराठ्याला अनेक पदर असतात.

साहित्य: २ कप गव्हाचे पीठ, १/२ चमचा मीठ, १ मोठा चमचा तेल, आवश्यकतेनुसार तूप, कोमट दूध किंवा पाणी.

कृती: एका भांड्यात गव्हाचे पीठ व मीठ घालून एकत्र करा. त्यात तेल किंवा तूप व आवश्यकतेनुसार कोमट दूध किंवा पाणी घालून घट्ट मळून घ्या. तयार कणीक १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. तयार कणकेचे सारख्या आकाराचे गोळे बनवा. गोळ्यांना पीठ लावून साधारणतः ७-८ इंचाइतकी पोळी लाटून घ्या. पोळीवर तूप किंवा तेल पसरवून पिठाने भुरभुरवा. पोळीच्या साधारण १/२ इंच रुंदीच्या निऱ्यांप्रमाणे घडी घाला. त्याची उभी गुंडाळी करा. गुंडाळी आडवी करून पुन्हा त्याची पोळी लाटा. निऱ्यामुळे पराठ्याला पापुद्रे तयार होतील. मध्यम आचेवर तवा गरम करून तेल लावून घ्या. यावर पराठा नीट भाजून तेल किंवा तूप लावून २० सेकंद चांगला परतून घ्या. रंग बदलेस्तोवर नीट भाजा. भाजून झाल्यावर हाताने थोडासा दाबून त्याचे पापुदे्र उघडा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अलका फडणीस

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.