शेवळा | Araceae | Titan Arum | Shevala | Shevla

शेवळाची शाकाहारी भाजी | संगीता खरात | रानभाज्या

शेवळा ची शाकाहारी भाजी

मराठी नाव : शेवळं

इंग्रजी नाव :  Dragon stalk yam

शास्त्रीय नाव : Amorphophallus Commutatus

आढळ : ओसाड माळराने, जंगले

कालावधी : जून ते जुलै

वर्णन : पहिला पाऊस पडल्या-बरोबर उगवून येणारी ही रानभाजी आहे. एक ते दीड फूट उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला एक जाड जांभळट रंगाचे पान आणि भरीव लांब देठ असतो. त्याच्यावर काळसर हिरवे ठिपके असतात. मधल्या दांड्यावर गुलाबी, पांढरट ठिपके असतात. शेवळं उन्हात किंवा सावलीतही सुकवली जातात आणि नंतर पाण्यात भिजवून वापरता येतात.

टीप : शेवळं ही खाजरी भाजी असल्याने स्वच्छ करताना हातांना तेल लावून घ्या. तसेच भाजी करताना त्यासोबत मिळणाऱ्या काकडाच्या आंबट फळांचा रस, कोकम, चिंच यांचा वापर करावा म्हणजे घशाला खवखवणार नाही. शेवळं स्वच्छ करताना वरील मोठे जांभळट पान काढून टाकावे. आतील मऊ पांढरा भाग तसेच कोवळ्या पानांचा गुलाबी  भाग भाजी करण्यासाठी वापरावा. चिरलेली भाजी काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावी.

साहित्य : ३ जुड्या शेवळा ची भाजी, १ वाटी मोड आणून सोललेले गोडे वाल, २ कांदे, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, २ चमचे फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ आणि गूळ, आवडीनुसार खोवलेले खोबरे.

कृती : शेवळं स्वच्छ धुऊन चिरून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावीत. काकडाची फळे ठेचून त्याचा रस काढून घ्यावा. तेल गरम करून त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतावा. परतलेल्या कांद्यात सोललेले वाल आणि चिरलेली शेवळाची भाजी घालून चांगली परतावी. त्यात हळद, तिखट, वाटलेला मसाला घालावा. काकडाच्या फळांचा रस, मीठ घालून भाजी शिजू द्यावी. शेवटी गूळ आणि एक चमचा गरम मसाला घालून एक वाफ येऊ द्यावी.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– संगीता खरात

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.