आमरस श्रीखंड पुरी मिनी कप

Published by सुजाता परब on   May 2, 2019 in   2019Food Corner

 

आमरस श्रीखंड पुरी मिनी कप


साहित्य: पुरी कपसाठी:

१ कप गव्हाचे पीठ, /४ कप मैदा, १ मोठा चमचा बारीक रवा, १ मोठा चमचा तेल (पीठ मळण्यासाठी) व २ मोठे चमचे तेल (पुरी लाटण्यासाठी), /४ छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ, पीठ मळण्यासाठी आवश्यक पाणी.

श्रीखंडासाठी:

६ कप गोड घट्ट दही, /४ कप पिठीसाखर, /१ मोठा चमचा केसर, १ मोठा चमचा कोमट दूध, १ छोटा चमचा वेलची पूड, /२ छोटा चमचा जायफळ पावडर, २ मोठे चमचे बारीक केलेला सुका मेवा. (श्रीखंड घरी करायचे नसल्यास बाजारातून तयार श्रीखंड आणू शकता.)

आमरस:

२ मोठे पिकलेले गोड आंबे (शक्यतो हापूस), ३ मोठे चमचे साखर (आंब्याचा गोडपणा पाहून कमीजास्त करू शकता), २ मोठे चमचे पाणी किंवा दूध.

कृती: पुरी कपसाठी:

एका खोल बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा,बारीक रवा,मीठ आणि तेल एकत्र करा. हळूहळू पाणी घालून पीठ चांगले घट्ट मळून घ्या. मग भिजवलेले हे पीठ तीस मिनिटांसाठी बाजूला ठेवा. तयार पिठाचे तेरा चौदा समान गोळे करून घ्या.या गोळ्यांची थोडी जाडसर पुरी लाटून घ्या. टाट साचा घ्या किंवा वाटीसुद्धा चालेल. त्यात सगळ्या बाजूंनी थोडे तेल लावून घ्या. त्यात तयार केलेली पुरी व्यवस्थित पसरवून बसवा आणि दाबून त्याला कपचा आकार द्या. फोकच्या मदतीने सगळ्या बाजूंनी त्याला टोचून घ्या.साच्यासकट ही पुरी गरम तेलामध्ये सावकाश सोडा. दहाबारा सेकंदानी कप साच्यातून बाहेर येतील. ते व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लालसर आणि थोडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

श्रीखंड:

दह्यातील जास्तीचे पाणी काढून टाका आणि मलमल कापडात घट्ट बांधून घ्या. दह्याचे हे कापड रात्रभर किंवा चारपाच तास टांगून ठेवा. निचरा केलेल्या पाण्याला गोळा करण्यासाठी वाडगा वापरा.दुसऱ्या दिवशी ते एका मोठ्या वाडग्यात काढा. या तयार चक्क्यात पिठीसाखर,जायफळ पावडर आणि वेलची पूड घालून चांगले एकत्र करावे. पाचदहा मिनिटांनी दूधात केशर घालून ते दूध सुका मेवा चक्क्याच्या मिश्रणात घाला. तयार श्रीखंड फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्या.

आमरस:

आंब्याचा गर काढून घ्या. साखर आणि हा गर मिक्सरमध्ये घालून प्युरी करून घ्या. तयार आमरस फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

सर्व्हिंगकरिता:

एका प्लेटमध्ये तयार केलेले पुरी कप व्यवस्थित मांडून घ्या. कप अर्धा किंवा पाव आमरसाने भरून घ्या. स्टार नोजल पाइपिंग बॅगमध्ये थंडगार श्रीखंड भरा आणि गोलाकार आकारात आमरस भरलेल्या पुरी कपमध्ये पाइप करून घ्या. थंडगार आमरस श्रीखंड पुरी सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


सुजाता परब