September 12, 2024
श्रीगणपती | Shri Ganpati | Mahotkat Vinayak | Mahotkat Ganesh

गणेश जयंती आणि महोत्कट विनायक | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | Ganesh Jayanti and Mahotkat Vinayak

गणपती हा ‘ गण–पती ’ कसा झाला? तो लोकांमध्ये इतका प्रिय का आणि कसा झाला? ज्याला वि-नायक किवा  लोक-नायक व्हावयाचे आहे. त्याने सर्व समाजासाठी सुखकर्ता, दु:खहर्ता होणे आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसून त्यांच्या ओठांवर थोडे हसू उमटविण्याची ज्याची प्रवृत्ती तोच लोकनेता लोकप्रिय होऊ शकतो.

एक साधी गोष्ट पाहा. कुठल्याही सभा-समारंभात गेलात तर तिथे जी थोरामोठ्यांची मांदियाळी जमलेली असते. जमत असते त्यात मंत्री- संत्री वगळून इतरेजनांपैकी ज्यांना लोक नमस्कार करतात; ते अशा प्रकारे दुसऱ्यांसाठी कष्टणारे, परोपकार करणारे असतात. अशा लोकांना नमस्कार करताना, त्यांच्यासमोर वाकताना वाकणाऱ्याच्याही चेहऱ्यावर एक आनंद आणि समाधान विलसत असते. समाजाला जो काही देऊ शकतो, समाजासमोर काही आदर्श निर्माण करू शकतो, त्याचेच समाज कौतुक करीत असतो.

तुम्ही इतरांच्या सुखदु:खात सहभागी झालात की लोकही तुमच्या सुखदु:खात सहभागी होण्याची इच्छा बाळगतात. तुमचे दु:ख तुमच्या चिंताविवंचना या आपल्याच आहेत, अशा भावनेने आणि श्रद्धेने वागू लागतात. आजकाल मंदिरात, देवळात गर्दी बऱ्यापैकी असते. सहज गंमत म्हणून एक गोष्ट ध्यानात घेतलीत तर असे आढळून येईल की, जी दैवते लोकभावनेनुसार जागृत असतात त्यांच्यासमोरच भक्तांच्या रांगा लागतात. आता ‘ जागृत ’ या शब्दाचा तरी दुसरा अर्थ काय?

देव-दैवतांची जागृती ही त्यांच्या भक्तमंडळींना चिंतामुक्त करण्याच्या स्वभावावर आणि सामर्थ्यावर अवलंबून असते. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकासमोर फर्लांग -फर्लांग रांगा लावणारे सगळेच लोक भोळेभाबडे, अंधश्रद्ध असतात, असे नव्हे. काही ना काही प्रचीती आल्याशिवाय वर्षानुवर्षे लोक एवढे देहकष्ट सोसून रांगेत उभे राहण्याची तपश्चर्या करणार नाहीत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीला लाखो भक्त तहानभूक विसरून अगदी नियमाने जात असतात. ते का जातात? त्यांना तसे जाण्यासाठी कोणी कायद्याने, सक्तीने भाग पाडलेले नाही. तसे जात राहिल्याबद्दल सभासमारंभामधून त्यांना मानाची पदके वा प्रशस्तिपत्रे दिली जात नाहीत. ते स्वत:च्या आनंदासाठी जातात. पंढरपूरचा विठूराया हे त्यांचे परमदैवत आहे. त्याच्याबद्दलचा भक्तिभाव त्यांना तिथे ओढून नेत असतो. तसेच ज्या देवासमोर दर्शनासाठी रांगा लावतात, त्या देव -दैवतांबद्दल भक्तांच्या मनात भक्तिभाव नांदत असतो आणि या भक्तिभावाला काही पार्श्वभूमी जरूर लागते.

“ सत्कृत्य करणाऱ्यांचे पुतळे उभारले जातात. चोर-दरोडेखोरांचे पुतळे उभारले जात नाहीत. ज्यांना आपली संस्कृती देवपदी बसवते, त्यांनीसुद्धा आपापल्या कार्यक्षेत्रात काही मोठी सत्कृत्ये केलेली असतात. ”

दृष्ट-दुर्जनांच्या छळवणूकीपासून साधुसंतांची मुक्तता केलेली असते. गोरगरिबांना सुखाने कसे जगता येईल त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले असते. श्रीगणपतीचे, विनायकाचे चरित्र या दृष्टीने मोठे आदर्श असे आहे आज माघी चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंती. विनायक चतुर्थी. गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत. एक शिव -पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि अदिती यांचा मुलगा विनायक, महोत्कट विनायक या विनायकाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसतांना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशांना निर्वेधपणे जगता येईल, अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेली शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. तो साजरा करीत असतानाच त्याच्या चरित्रापासून ‘ सुखकर्ता दु:खहर्ता ’ होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( ज्ञानाचा उद्गार, देवाचिये व्दारी – भाग ५ वा मधून )

One comment

  1. Mahashivaratri | महाशिवरात्री | Written by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar

    […] जाणून घ्या : गणेश जयंती आणि महोत्कट विनायक […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.