ऑफिससाठी ड्रेसकोड

Published by Kalnirnay on   November 4, 2019 in   2019FashionArtReaders Choice

 

ऑफिससाठी ड्रेसकोड


१‧ ऑफिससाठी योग्य अशी वेशभूषा कशी निवडावी?

औपचारिक वेशभूषेसाठी नेव्ही ब्लू, काळा, तपकिरी (ब्राउन) रंगातील व्यवस्थित कट असलेली पँट किंवा स्कर्ट आणि त्यावर पांढरा कॉलर असणारा शर्ट खुलून दिसेल‧ तर कॅज्युअल प्रकारातील वेशभूषा ही आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी करणे योग्य ठरते‧ कॉटन स्कर्ट्स, स्लॅक्स आणि त्यावर व्यवस्थित फिटिंग असणारा टॉप / ब्लाऊज, तसेच कट ऑफ किंवा फ्लेअर जीन्स व त्यावर शॉर्ट टॉप, क्रॉप टॉप किंवा टी-शर्टसुद्धा चांगला दिसेल‧

२‧ आपली शरीरयष्टी कशी ओळखावी? त्यानुसार कपड्यांची निवड कशी करावी?

साधारणपणे शरीरयष्टींचे चार प्रकार असतात ः एक म्हणजे सफरचंदाप्रमाणे शरीरयष्टी असणाऱ्या व्यक्ती शरीराच्या वरच्या (कंबरेपर्यंत) बाजूने जाड असून त्यांच्या शरीराची खालची बाजू बारीक चणीची असते‧ खांदे मात्र रुंद असतात‧ अशा व्यक्तींना ‘व्ही’ गळा असणारे शर्ट्स, ब्लाऊजेस, टॉप्स आणि ड्रेसेस खुलून दिसतात‧ पाय बारीक असल्यामुळे अशा व्यक्तींनी टाइट फिटिंग पँटपेक्षा घेरदार पँट, स्कर्ट्सना पसंती देणे योग्य ठरेल‧ पट्टा असणारे ड्रेसेस घालणे अशा व्यक्तींनी टाळायला हवे‧ मुख्य म्हणजे गडद रंगांच्या कपड्यांना पसंती द्या‧

दुसऱ्या प्रकारची शरीरयष्टी असते, ती पेअर या फळाप्रमाणे किंवा त्रिकोणाकृती‧ या व्यक्तींच्या शरीराचा कंबरेखालील भाग जाड असतो, तर खांदे अरुंद असतात‧ खांदे रुंद वाटतील, अशा प्रकारच्या कपड्यांची निवड या व्यक्तींनी करायला हवी‧ ऑफशोल्डर किंवा सध्याचा ट्रेंड असणारा कोल्ड शोल्डर टॉप्सचा पर्याय या व्यक्तींना चांगला शोभून दिसतो‧ पायांना घट्ट बसणारी (फिटेड) पँट, जीन्स, लेगिंग्ज टाळून स्ट्रेट लेग्ड् म्हणजे स्ट्रेट फिटिंगच्या पँट्स किंवा थोडा घेर असणाऱ्या पँट, पलाझो, स्कर्ट या व्यक्तींना अधिक चांगले दिसतात‧ कपड्यांना साजेशा हील्स

घातल्यास व्यक्तिमत्त्व उठून दिसेल‧

तिसरा प्रकार येतो, तो म्हणजे चौकोनी शरीरयष्टी असणाऱ्या व्यक्ती‧ कंबर, नितंब हे साधारण एकाच आकाराचे असून छातीचा आकार उठावदार असतो‧ टाइट फिटेड (स्किनी) जीन्स, मिनी स्कर्ट्स हे वेशभूषेचे प्रकार आणि भडक रंगाचे कपडे अशा व्यक्तींना शोभून दिसतात‧ अवरग्लास शेप्ड किंवा परफेक्ट शेप असणाऱ्या व्यक्तींचा नितंबांचा आणि छातीचा भाग हा बहुतांश एकाच प्रमाणात असतो, तर कंबर बारीक असते‧ कंबरेचा बारीक भाग उठून दिसावा, यासाठी कंबरेकडे घट्ट आणि पायाकडे सैल असणारे पँट्स, ड्रेसेस अशा व्यक्तींना शोभून दिसतात‧

आपली शरीरयष्टी कोणती आणि आपण कोणते कपडे घालावे, याबाबत अजूनही गोंधळ उडत असेल, तर छानशी साडी किंवा पंजाबी ड्रेसेसचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे‧ कोणतीही वेशभूषा करताना आपण ऑफिसच्या ठिकाणी वावरणार आहोत, याचे भान सर्वांनीच राखायला हवे आणि त्यानुसार कपडे व ज्वेलरी वापरायला हवी‧

३‧ आपली वेशभूषा करताना रंग, प्रिंट, कापड (फॅब्रिक) यांची निवड कशी करावी?

फॉर्मल कपड्यांसाठी तुम्ही काळा, गडद निळा, निळा, राखाडी, तपकिरी अशा रंगांची निवड करू शकता‧ फॉर्मल कपडे हे बहुतांश ‘प्लेन’ असतात, त्यामुळे प्रिंटचा प्रश्न येत नाही‧ पण काही वेळेस प्लेन कपड्यांवर एखादे प्रिंटेड जॅकेट / ब्लेझर तुम्ही घालून थोडा हटके लुक मिळवू शकता‧ मात्र हे प्रिंट खूप बोल्ड नसेल, याची काळजी घ्या‧

फॅब्रिकमध्ये परंपरागत चालत आलेले कॉटन आणि लिननचे पर्याय आहेत‧ कॅज्युअलमध्ये जॉर्जेट, शिफॉन, कॉटन, सिंथेटिक आदी पर्याय आहेत‧ फ्लोरल, जॉमेट्रिकल डिझाइन्स हे सध्या इन ट्रेंड आहेत‧

४‧ वेशभूषेला साजेशी आभूषणे (अॅक्सेसरीज) कशी निवडाल?

फॉर्मल प्रकारातील वेशभूषेवर न्यूट्रल शेड्समधील बंद प्रकाराचे हील्स / उंच टाचांचे शूज, सँडल्स शोभून दिसतात‧ हिऱ्यांचे कानातले किंवा छोटे टॉप्स आणि गळ्यात पेंडंट असणारी चेन ही अॅक्सेसरीज सर्वच प्रकारच्या फॉर्मल अटायरवर खुलून दिसते‧

कॅज्युअल प्रकारातील कपड्यांवर स्नीकर्स, फ्लिपफ्लॉप, स्पोट्र्स शूज, बेली चांगले दिसतात‧ यावर एखादा स्कार्फ, हातात अंगठी व ब्रेसलेट आणि कानातले शोभून दिसतात‧ थोडासा मेकअप, हेअरस्टाइल आणि ब्राइट नेलपेंटने रंगविलेली नखे तुमचा लुक रुबाबदार करून जाईल‧

पंजाबी ड्रेसेसवर चपला, कानात टॉप्स किंवा शँडेलीअर्स / रिंगा, हातात एखाददुसरी बांगडी किंवा ब्रेसलेट, छानशी हेअरस्टाइल आणि लाइट मेकअप करायला विसरू नका.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 शायना एन‧ सी‧