September 18, 2024
Matrimony | Marriage Beuro | Shaadi Matrimony | Best Matrimonial Site | Hindu Matrimony | Marriage Matrimony | जोडीदार

शुभमंगल, पण सावधान ! करुणा गोखले

 

पूर्वीच्या काळी आतेभाऊ आणि मामेबहीण हे हक्काचे जोडीदार समजले जायचे‧ शिवाय, आप्तस्वकीय पंचक्रोशीतील स्थळ सुचवायचे कालपरत्वे जोडीदार निवडीचे पर्याय पंचक्रोशी ओलांडून दूरदूरपर्यंत पसरू लागले‧ वधू-वर सूचक मासिके, वृत्तपत्रांमधील छोट्या जाहिराती आणि गावोगावी उघडलेली वधू-वर मंडळे दूरदेशींच्या जोडीदारांची स्वप्ने दाखवू लागली‧ शहरांमध्ये जातीनिहाय ‘वधू-वर मेळावे’ भरू लागले‧ तंत्रज्ञानाने झेप घेतली, तशी जोडीदार निवडीच्या पर्यायांनीसुद्धा गगनभरारी घेतली‧ ‘वर्ल्ड वाइड वेब’ची संकेतस्थळे उपलब्ध झाली आणि जोडीदार निवडीचे क्षेत्रसुद्धा शब्दशः ‘वर्ल्ड वाइड’ झाले‧ लग्नजुळवणी व्यवसायाला वाहिलेल्या अनेक अनेक डॉट कॉम कंपन्या उदयास आल्या‧ पूर्वी केवळ ‘दहा जणांत उठून दिसेल’ असा जोडीदार मिळवणे शक्य होते‧ वधू-वर सूचक मंडळांनी तो ‘हजारांत एक’ मिळविण्याचे स्वप्न दाखवले‧ आता इंटरनेटवरील संकेतस्थळे लग्नेच्छुंना ‘एक लाख नव्वद हजारांतील एक’ शोधून देण्याची हमी देऊ लागले आहेत‧ खूप पर्याय उपलब्ध असणे केव्हाही चांगलेच, परंतु जोडीदार निवडीसाठी जग धुंडाळायला निघण्याआधी स्वतःच्या आंतरिक ऊर्मीचा धांडोळा घेणे अगत्याचे असते‧

कसा मी? असा मी!

प्रत्येक व्यक्तीचा एक नैसर्गिक पिंड असतो‧ कुणी स्वभावतःच बेडर, तर कुणी संकोची‧ कुणी हसतमुख, तर कुणी गंभीर‧ आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती, वाट्याला आलेले कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण यांनुसार प्रत्येक व्यक्ती आपला जीवनक्रम आखते; काही स्वप्ने उराशी बाळगते, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडते, त्या बदल्यात दुसऱ्या कशावर तरी पाणी सोडते‧ मात्र प्रत्येकालाच स्वतःच्या आंतरिक ऊर्मीची सजग जाणीव असते, असे नाही‧ ती प्रयत्नपूर्वक विकसित करावी लागते, तेव्हा कुठे माणसाला स्वतःची खरी ओळख होते‧ त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवावी लागतात‧ आयुष्यात मला काय कमवायचे आहे? त्यासाठी काय गमवायची माझी तयारी आहे? माझे उदरनिर्वाहाचे साधन काय असेल? माझे आवडते छंद कोणते? मला शहरात राहायचे आहे, गावी जायचे आहे, की परदेशी नशीब आजमावायचे आहे? कशा प्रकारच्या लोकांबरोबर माझे चांगले पटते आणि माणसातील कोणत्या स्वभाववैशिष्ट्यांचा मला तिटकारा वाटतो?

नीती-अनीती, योग्य-अयोग्य, चूक-बरोबर यांविषयीच्या आपल्या कल्पना, आपल्या श्रद्धा म्हणजे आपली मूल्यव्यवस्था असते‧ तीविषयीची स्पष्टता म्हणजे ‘स्व’ची ओळख‧ एकदा ती पुरेशा प्रमाणात झाली, की जोडीदारात काय हवेच, काय चालू शकेल, आणि काय अजिबात नको हे ठरवणे सोपे जाते‧

जोडीदार निवडीचे निकष

जोडीदाराची निवड करताना बहुसंख्य लोक धर्म, जात, भाषा, पत्रिका या निकषांना प्राधान्य देतात‧ त्यांना किती महत्त्व द्यायचे याविषयीचा निर्णय वैयक्तिक असल्याने त्याबद्दल सरसकट काही विधान करणे शक्य नाही‧ परंतु या निकषांवर अडून राहिल्यास जोडीदार निवडीवर मर्यादा येऊ शकतात, एवढे नक्की‧

जोडीदार निवडताना दोघांची मूल्यव्यवस्था मिळतीजुळती आहे का, हे तपासणे आवश्यक असते‧ आयुष्यातील पैशाचे स्थान, स्त्रीचे शिक्षण व अर्थार्जन याविषयीचे विचार, दैनंदिन गरजा आणि चैन याविषयीची मते, देवधर्माबद्दलच्या भूमिका यामधून व्यक्तीची मूल्यव्यवस्था डोकावत असते‧ तिची वर्तणूक त्या मूल्यांना अनुसरून असते‧ विवाहबंधन स्वीकारणाऱ्या दोन व्यक्तींच्या मूल्यांमध्ये साधर्म्य असेल, तर त्यांच्यामधील अनुरूपता वाढते‧ बहुसंख्य तरुण-तरुणी वजन, उंची, रंग-रूप, वय, औपचारिक शिक्षण यांना खूप महत्त्व देतात, परंतु आपल्याला आयुष्यात जे करायचे वा टाळायचे आहे, त्याला संभाव्य जोडीदाराचे विचार पूरक आहेत का, हे तपासून बघत नाहीत‧ मग अनेकदा कष्टाने शिकून आवडीचे काम करणाऱ्या मुलीला सासरच्यांच्या मर्जीखातर नोकरी सोडण्याचे दुःख भोगावे लागते किंवा विज्ञाननिष्ठ तरुणाला पत्नीच्या अंधविश्वासांपुढे मान तुकवावी लागते‧

तंत्रज्ञान येई कामा

संभाव्य जोडीदाराची मानसिकता, चूक-बरोबरच्या कल्पना जाणून घ्यायच्या, तर दोघांत मनमोकळा संवाद होणे गरजेचे असते‧ मात्र अनेक कुटुंबांत तरुण-तरुणीने केवळ एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी वरचेवर भेटणे मान्य नसते‧ अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या विवाहविषयक संकेतस्थळांचा उत्तम उपयोग होतो‧ तेथे प्रत्यक्ष न भेटता हवे तितके वेळा तरुण-तरुणी एकमेकांशी संपर्क साधू शकतात‧ संकेतस्थळावर लग्नेच्छु तरुण-तरुणींची प्राथमिक माहिती व फोटो दिलेला असतो‧ एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी विवाहविषयक संकेतस्थळ हे सर्वोत्तम माध्यम आहे‧ मात्र ते दूरस्थ माध्यम असल्याने त्यात काही धोके दडलेले आहेत त्यांची प्रत्येकाला पुरेशी जाणीव हवी‧

संकेतस्थळे ः संभाव्य धोके

विवाहोत्सुक व्यक्तीने संकेतस्थळावर चुकीची माहिती पुरवणे, संपर्क सुरू केल्यानंतर अश्लील मजकूर लिहिणे यांसारखे गैरप्रकार होऊ शकतात‧ पुरेसा विश्वास प्रस्थापित झाल्यानंतर आजारपण, अपघात अशा सबबी सांगून समोरच्या व्यक्तीची सहानुभूती मिळवणे व त्यानंतर तिच्याकडे पैशाची मदत मागणे असेही फसवणुकीचे प्रयत्न होतात‧ कधी तरुणीला भेटण्यासाठी बोलवून लुबाडणे, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे छायाचित्रण करणे, ते समाज माध्यमांवर प्रसृत करणे किंवा तशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात‧ ते टाळण्यासाठी विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करताना खालील पथ्ये कटाक्षाने पाळावीत ः

द्य आपल्या घरचा वा कार्यालयाचा पत्ता, पॅनकार्ड, आधार, बँक खाते, क्रेडिट / डेबिट कार्ड यांचे क्रमांक कदापि देऊ नयेत‧

द्य दूरध्वनीवर संपर्क साधण्यास ठराविक वेळच द्यावी‧ रात्री / अपरात्री केलेल्या फोनला प्रतिसाद देऊ नये‧

द्य समोरील व्यक्तीने संकेतस्थळावर असभ्य भाषेत संवाद सुरू केल्यास तत्काळ संकेतस्थळाकडे व पोलिसांकडे तक्रार नोंदवावी‧

द्य आपल्या छायाचित्रांची देवाण-

घेवाण करू नये‧

द्य पुरेशा संवादानंतर ठरविलेली प्रत्यक्ष भेट दिवसा, गर्दीच्या हॉटेलमध्ये ठेवावी‧ त्यावेळी कुटुंबातील विश्वासू व प्रौढ व्यक्ती बरोबर असावी‧

द्य हॉटेलमध्ये मागवलेले खाद्यपदार्थ वा पेय टेबलवर ठेवून फोन करण्यास वा प्रसाधनगृहात जाऊ नये‧ समोरील व्यक्ती त्यात गुंगीचे औषध मिसळण्याचा धोका असतो‧

द्य स्थळ पसंत पडल्यास एकमेकांच्या कुटुंबीयांमध्ये भेट घडवून आणावी‧

द्य पुरेसा विश्वास निर्माण झाल्या-शिवाय एकट्याने एकमेकांच्या घरी जाऊ नये, तसेच आपली छायाचित्रे काढू देऊ नयेत‧

एवढी काळजी घेऊनही फसवणूक झालीच, तर जिल्हा स्तरावर पोलीस उपआयुक्त, सायबर क्राइम ब्रँच यांच्याकडे तक्रार करावी‧ शिवाय, ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा‧ या दोन्ही प्रक्रियांचे संपूर्ण तपशील गुगलवर सहजी उपलब्ध आहेत‧

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


करुणा गोखले

One comment

  1. आज जेव्हा सगळे झन हनुमान जन्मोत्सव म्हणत आहे तेव्हा तुम्ही का बर जयंती म्हणून छापता?

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.