शरीराची स्वच्छता आणि आपण | गुगल गृहिणी | Body Hygiene and You | Google Housewife

Published by गुगल गृहिणी on   May 3, 2021 in   2021Health Mantra

शरीराची स्वच्छता आणि आपण

दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही.

अशी राखा शरीराची स्वच्छता :
१. कान ठेवा साफ : कानात मळ जमणे ही सामान्य गोष्ट असली, तरी कान वेळोवेळी साफ करायला हवा. अन्यथा कानात खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कानामध्ये मळ साचायला सुरुवात झाली, की कान स्वच्छ करावा. आठवड्यातून दोनदा कान स्वच्छ केल्याने कानात दाह किंवा शुष्कपणाचा त्रास वाढू शकतो. कानाचा बाहेरील भाग सुती किंवा मऊ कापडाने स्वच्छ करावा तर आतील भाग बेबी ऑईल, इअर ड्रॉप किंवा मिनरल ऑइलचे थेंब टाकून स्वच्छता राखा.

कानामध्ये तीव्र वेदना जाणवल्यास, ऐकण्यात अडथळा येत असेल, कानामध्ये विशिष्ट आवाज वाजत राहत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा किंवा ENT स्पेशालिस्टचा सल्ला घ्या.

कानातला मळ साफ करण्यासाठी अनेक जण पिन किंवा इअर बडचा वापर करतात. टोकदार वस्तू कानात घालणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे कानाला इजा होण्याची शक्यता असते. तर कापसाच्या बोळ्याने मळ अधिक खाली ढकलला जातो. त्यामुळे ऐकू येण्याची क्षमता कमी होते. कानात मळ साचणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नसते. उलट यामुळे कान स्वच्छ होतात. मात्र वारंवार मळ जमा होत असल्यास किंवा एखादे तेल त्रासदायक ठरत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

इअर कँडल्सचा वापर करून कान स्वच्छ होतात, असा अनेकांचा समज आहे. पण हा सुरक्षित पर्याय नाही. कानातील केवळ अतिरिक्त मळ काढून टाकणे गरजेचे असते. कानातील संपूर्ण मळ निघून गेला तर कानात हवा जाऊन त्रास होऊ शकतो. अतिरिक्त मळ काढण्यासाठी ते विरघळवणारे काही इअर ड्रॉप्स बाजारात मिळतात. शक्यतो त्याचा वापर करावा.

२. नाकाची निगा : नाक नियमितपणे शिंकरावे, साफ करावे. नाक पाण्याने स्वच्छ करावे. नाकात काहीही घालू नये. काही व्यक्तींना सतत नाकात बोट घालण्याची सवय असते. यामुळे नाकाच्या आतल्या भागाला इजा होण्याची शक्यता असते. तसेच नाकातून रक्तही येऊ शकते. इतरांसमोर अशा कृती करणे म्हणजे गलिच्छपणा किंवा किळसवाणा प्रकार ठरू शकतो. अंघोळ करताना नाक स्वच्छ करायला हवे. चारचौघांत नाक साफ करताना रुमालाचा वापर करावा व लगेच हात धुऊन स्वच्छता राखा.

३. मानेचा ठेवा मान : मानेवर असणारे काळे डाग तुमच्या सौंदर्यात बाधा आणू शकतात.

कच्च्या पपईचे बारीक तुकडे करून त्यात थोडे गुलाबपाणी व एक चमचा दही घालून पेस्ट बनवा.

ही पेस्ट मानेला साधारण वीस मिनिटे लावून नंतर थंड पाण्याने साफ करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास मानेवरील काळेपणा निघून जाण्यासाठी मदत होईल.

उन्हातून बाहेर जाताना आपण हाताला व चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो. तसेच मानेवरही लावणे गरजेचे आहे. घराबाहेर पडण्याआधी साधारण वीस मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. याशिवाय ओटमिल स्क्रब, बेकिंग सोडा, लिंबू आणि मधाचे मिश्रण, मुलतानी माती (यात चंदन पावडर व चिमूटभर हळद व थोडे दूध घालून त्याची पेस्ट) यांचाही वापर करता येईल.

४. काळवंडलेल्या अंडर आर्म्सपासून मिळवा मुक्ती : हेअर रिमूव्हल क्रीमचा अति वापर, रेझरने काखेतील केस काढणे, घट्ट कपडे परिधान करणे, सतत घाम येणे, हार्मोन्समधील असंतुलन, डिओड्रंटचा वापर यामुळे काखेतील त्वचेवर दुष्परिणाम होऊन येथील त्वचा काळवंडते. अशा वेळी स्लीवलेस कपडे वापरणे किंवा चारचौघांत हात वर करणे खूप ओशाळवाणे ठरू शकते. आत्मविश्वास कमी करणारी ही समस्या दूर करण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येतात.

अंडर आर्मची त्वचा उजळण्या-साठी १ चमचा हळद, दूध व मध एकत्र करून १५ मिनिटे ही पेस्ट काखेत लावून ठेवा. सुकल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. कोरफडाचा गर १० ते १५ मिनिटांसाठी अंडर आर्म्सवर लावल्यानेही फरक पडतो. बदामाच्या तेलाचे काही थेंब काखेतील त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. ५ ते १० मिनिटांनंतर अंडर आर्म्स पाण्याने स्वच्छ धुवा. शक्य असल्यास हा उपाय नियमित करावा. काळवंडलेल्या अंडर आर्म्सच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी बटाटा किसून त्याचा रस लावता येईल.

५. चेहरा ठेवा तजेलदार : चेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तिमत्त्व उठून दिसत नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होते. चेहरा उजळ करण्याकरिता बेसन, हळद, गुलाबजल, लिंबूपाणी व थोडेसे कच्चे दूध यांचा पातळ लेप रोज अंघोळीच्या आधी चेहऱ्यावर साधारण अर्धा तास लावून ठेवावा व नंतर धुऊन टाकावा. अधिक चिंता, जागरण किंवा हार्मोनल बदल यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. यासाठी कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालीश करावी. चेहरा सतत तेलकट असल्यामुळे पिंपल्सची समस्या भेडसावते. चेहरा तेलकट असल्यास १ चमचा मध, लिंबाचा रस मिसळून १५-२० मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. तर चेहरा सतत कोरडा पडत असल्यास १ लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मालीश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा. याशिवाय संतुलित व पौष्टिक आहार घ्या.

६. केसांचे सौंदर्य जपा : अनेकदा आपण केसांची काळजी घेण्याच्या प्रयत्नात त्यांना नुकसान पोहोचवतो. केसांची काळजी घेताना गरम पाण्याने केस धुणे टाळा. केस सुकवण्यासाठी आणि अंग पुसण्यासाठी वेगवेगळ्या टॉवेलचा वापर करा. तसेच केसांसाठी टॉवेलऐवजी कॉटनच्या कापडाचा वापर करा. शक्य असल्यास मायक्रोफायबर टॉवेल वापरा. झोपताना अनेकांना उशी लागते. आपली उशीही केसांसाठी नुकसानदायी ठरते. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपताना नरम उशीचा वापर केल्यास केसांना नुकसान पोहोचत नाही.

केस खूप घट्ट बांधणे, एकाच ठिकाणी भांग पाडणे तसेच काटे, आकडे, पिना यांचा वारंवार वापर करणे टाळावे. यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळू लागतात व भांगाच्या अवतीभोवती टक्कल पडल्यासारखे दिसू लागतात.

वयाच्या तिशीनंतर हार्मोन्समध्ये होणारा बदल, मासिक पाळी तसेच गरोदरपणात घेतल्या गेलेल्या औषधांचा परिणाम सगळ्यात जास्त आपल्या केसांवर होत असतो. तसेच गंभीर आजार व त्यानंतर येणाऱ्या अशक्तपणामुळे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते. अशा वेळी जेवणात प्रथिने व जीवनसत्त्वयुक्त आहार घेणे केसांसाठी लाभदायक होईल. तसेच नियमितपणे हेडमसाज केल्यासही फायदा होईल.

७. टाचांकडे करू नका दुर्लक्षः थंडीत किंवा एरवीसुद्धा अनेकांच्या टाचांना भेगा पडतात. काही जणांना उष्म्यामुळे पायाला भेगा पडतात. त्यामुळे पायाची आग, जळजळ होत राहते. चारचौघांत भेगा पडलेले पाय लाजिरवाणे वाटण्याची वेळ आणतात. अशा वेळी पायांची नियमित काळजी घ्यायला हवी. पाय कायम स्वच्छ ठेवावेत, पाय कोमट पाण्याने धुवावेत, आठवड्यातून एकदा पायाला स्क्रब करा, नियमितपणे तेलाने पाय मालीश करा, क्रीम वापरा तसेच चांगल्या दर्जाची पादत्राणे वापरा.
(लेखात दिलेले कोणतेही उपाय आपल्या हाताच्या त्वचेवर आधी करून पाहा. जळजळ, खाज सुटल्यास उपाय करणे टाळावे. तसेच तज्ज्ञांचा सल्लादेखील घ्यावा.)

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गुगल गृहिणी