सुख | The Joy of Happiness | Art of Happiness | Happy Thoughts | Spark Joy | Happy Life |

आनंदाचे डोही आनंद तरंग | जयराज साळगावकर | The Joy of Happiness | Jayraj Salgaokar

मनाची आनंदी अवस्था (Happi-ness)कायमची कशी साधता येईल, यावर आतापर्यंत बरेच संशोधन व विचारमंथन झाले आहे.जवळजवळ दरवर्षी ‘टाईम’, ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘न्यूयॉर्कर’ अशा अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांकडून ह्या विषयावर कवर स्टोरी केली जाते. गेल्या २०-२५ वर्षांतील या कवर स्टोरीज वाचल्यावर म्हटले तर हाताला बरेच काही लागते, म्हटले तर काहीच लागत नाही आणि म्हणूनच वर्षानुवर्षे (जगातील सर्व भाषा-देशांतून) (Happi-ness) किंवा आनंद हा पुन्हा पुन्हा चर्चिला जाणारा विषय आहे. माणसाला होणारा आनंद मोजण्यासाठी विविध निर्देशकांचा विचार जगात होतो आहे. फ्रेंच अर्थ-तज्ज्ञांच्या मते, ह्या ‘हॅपीनेस इंडेक्स’ मध्ये सिक्कीम आघाडीवर आहे, तर दुसऱ्या एका निर्देशांक पद्धतीनुसार स्वीडन हा युरोपीय देश पहिल्या क्रमांकावर आहे.

सुख म्हणजे नक्की काय असते?आनंद ही सकारात्मक, सुख पावलेली मनाची एक अवस्था असते. बरे वाटणे, आनंदी असणे, भरून पावणे, समाधान मिळणे या सर्वांचे मूळ हे या आनंदावस्थेत दडलेले असते. जिथे दुःख नाही तिथे सुख असते असे आपल्याला वाटते खरे, पण एकाच वेळी सुख आणि दुःख या दोन्ही भावनांची वस्ती आपल्या मनात कायम असते. पूर्ण सुखी किंवा पूर्ण दुःखी असे कुणीही नसते. समाधानी माणसाला सुखाचा शोध लवकर लागतो व तो टिकून राहतो. असमाधानी माणसे मात्र काल्पनिक सुखाच्या मृगजळामागे धावत राहतात. समाधान पावल्याने कर्तृत्वाला मर्यादा पडतात. माणसे ‘कंटेन्डेड’ होतात (आहे त्यातच समाधान पावतात),अशी टीका होते. त्यांना अल्पसंतुष्ट म्हणून हिणवले जाते. परंतु वास्तवाचा, जीवनाचा आणि भवतालाचा साकल्याने विचार करून आपल्याला जे मिळाले आहे, त्याचा जास्तीत जास्त ‘आनंद’ घेणे, त्यात समाधानी असणे हेच श्रेयस्कर. आता हे समाधान न मिळणे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण इतरांशी केलेली आपली तुलना. अशा प्रकारची तुलना आपले आप्त, स्वकीय, शेजारीपाजारी, मित्र, सहकारी किंवा प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच होत असते. अनोळखी माणसाबरोबर तुलना कशी होईल ?

‘अंबानीने आप्या मने नथी आप्या’ अशी तुलना जेव्हा माणूस करतो तेव्हा तो स्वतःकडे कष्टाने, नशिबाने आणि परिस्थितीने जे काही चांगले म्हणून पदरात माप दिले आहे, ते गृहीत धरून चालतो आणि म्हणून त्यातून मिळणाऱ्या आनंदाला मुकतो. जे अप्राप्य आहे किंवा जे प्राप्त करण्यासाठी आवाक्यापलीकडची किंमत आपल्याला मोजावी लागेल अशा दुर्गम गोष्टींकडे धावून स्वतःलाच दुःखी करून घेतो. असे लोक जरी वरवर महत्त्वाकांक्षी वाटले, तरी ते मुळात पराकोटीच्या अहंगडाने किंवा न्यूनगंडाने पछाडलेले असतात. त्यांना भरलेला अर्धा ग्लास कधी दिसत नाही आणि मोकळ्या अर्ध्या ग्लासाच्या – जे नाही त्याच्या मागे लागतात. स्वार्थापायी स्वतःला दीनवाणे करून घेताना दिसतात. इंग्रजीत याला Keeping up with the Joneses (श्रीमंत अशा शेजारच्या कुटुंबाशी आवाक्याबाहेरची स्पर्धा करू पाहणे) असे म्हणतात. अर्थशास्त्रामध्ये याला demonstration effect असे म्हटले जाते, म्हणजे दुसऱ्यांचे अनुकरण करून आपला जीवनस्तर उंचावल्याचे भासवणे.जाहिरात क्षेत्रात याचा वापर ‘टेस्टीमोनी अॅड’ म्हणून केला जातो. उदा.विराट कोहली ‘प्युमा’चे महागडे बूट वापरतो म्हणून देशभरातले दारिद्र्यरेषेखाली जगणारे लोकसुद्धा आपल्याकडे ‘प्युमा’ नाही, याचे दुःख बाळगून राहतात. (डुप्लिकेटवर समाधान मानून शहाणे होणारेही असतात.)

अनेक उच्चभ्रू स्त्रिया क्लब्ज, भिशी पार्टी, किटी पार्टी अशा ठिकाणी जाऊन गॉसिप करताना आपण नवीन महागडे दागिने, कपडे, परफ्यूम्स कसे घेतले हे सांगून इतरांना जळवण्यात धन्यता मानतात. तर काही आठ दिवसांत सात देश दाखविणारी फॉरेन टूर करून, तिथले टीशर्ट घालून आपण किती श्रीमंत आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. शहाण्या स्त्रिया अशा ठिकाणी जात नाहीत. मूर्ख स्त्रिया याला बळी पडतात आणि घरातील सौख्याचे रूपांतर कलहात करतात. नवऱ्याला गैरमार्गाने पैसे मिळवायला उद्युक्त करतात. कालांतराने संसाराची सुखी घडी विस्कटते आणि हाती असलेलेही निघून जाते.

सुख सुख म्हणता हें दुःख ठाकूनि आलें। भजन सकळ गेलें चित्त दुश्चीत जालें।।

भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना। परम कठीण देहीं देहबुद्धी वळेना।। (करुणाष्टके: संत रामदास)

पैशाचा आणि संपत्तीचा दुसऱ्या बाजूने विचार केला असता, श्रीमंती ही बँक खात्यात असणाऱ्या रकमेवर मोजण्याची गफलत निष्कारण होते. मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे पैसा असला तर आपण सुखी होऊ, जितकी संपत्ती जास्त तेवढे सुख जास्त, हा आपला समजही बरोबर नाही. काही महागड्या वस्तूंची मालकी असणे म्हणजे श्रीमंती नव्हे. जे मिळते, त्याने तृप्ती होत नाही. अधिक हवेसे वाटते. गरज, सुविधा, सुख, अहंकार, सुरक्षितता, कशाचे तरी वाटणारे भय यासाठी पैसा हवा असे वाटणे रास्त असले तरी तो किती हवा, याचे काही गणित मांडता येत नाही. श्रीमंती ही एक मानसिक जाणीव असते, एक भावना असते. श्रीमंती म्हणजे तुमच्याजवळ किती संपत्ती आहे याचा हिशेब नव्हे, तर तुमच्याजवळ जे आहे त्याबद्दलची तुमची ‘सकारात्मक’ भावना म्हणजे श्रीमंती होय.

बहुतेक लोकांचा समज पैशाने आनंद विकत घेता येतो, असा असतो. एका मर्यादेपर्यंतच हा समज खरा असतो. पण पैसा, संपत्ती, स्थावर मालमत्ता, सोने, हिरे, माणके यांच्या मोहाला अंत नसतो. ह्या सगळ्यामागे धावताना तुमच्या ड्डह्यह्यद्गह्लचे द्यद्बड्डड्ढद्बद्यद्बह्ल४मध्ये कधी रूपांतर झाले, हे तुमचे तुम्हालाच कळत नाही. अशा भौतिक वस्तूंच्या / सुखाच्या मागे धावण्यापेक्षा व्यायाम, योग, संगीत, वाचन, कला यामध्ये काळ व्यतीत करणारी माणसे अधिक आनंदी व सुखी, समाधानी असतात. आपण आयुष्यात मिळवायचे ते मिळवले आहे, आता उरलेले आयुष्य समाजातील वंचितांसाठी खर्ची करू असा विचार करून गोरगरीब, आजारी, पीडित, शोषित अशा दुःखाने व्यथित असलेल्या लोकांसाठी आपला वेळ देणारी माणसे अधिक सुखी-समाधानी असतात. परंतु कधीकधी अशा सेवाभावी आस्थापनांमधून सत्तेचे जे राजकारण चालते, त्यात निष्कारण गुंतून ही माणसे पुन्हा दुःखी झालेली दिसतात.तात्पर्याने स्वतःचे स्वत्व, स्वाभिमान, बांधिलकी आणि प्रामाणिकपणा सांभाळून इतरांशी कुठल्याही प्रकारची तुलना टाळणे जमले तर समाधान मिळू शकते आणि ते समाधान मिळणे हीच आनंदाची अवस्था होय. कधीकधी हा आनंद चहाच्या एका पेल्यातून येतो, भज्यांच्या एका बशीमधून येतो, कधी एखाद्या कवितेतून मिळतो, तर कधी एखाद्या नाटक किंवा सिनेमातून मिळतो, एखादे चांगले चित्र पाहून मिळतो. खरे तर आनंदाची अवस्था कायमस्वरूपी टिकणारी नसते, ती तात्पुरती असते. कायम परिधान करण्यासाठी सुखी माणसाचा सदरा कुठेही मिळत नाही.

एक विवक्षित उच्च स्तराची जीवन-शैली गाठण्याचे ‘दिवास्वप्न’ बाळगणे कधी कधी अंगाशी येते. काय वाट्टेल ते होवो (come what may), पण अशी जीवनशैली मिळालीच पाहिजे, ती जीवनशैली उपभोगणाऱ्या समाजाचे लवकरात लवकर आपण भाग बनून गेले पाहिजे असे वाटणे हे स्वाभाविक आहे, पण ह्यातून अधिक आनंद मिळण्याऐवजी बहुधा हे दुःखकारकही ठरू शकते.

अजून पाहिजे, अजून पाहिजे या ‘मनी गो राऊंड’ मधून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर आयुष्यात योग्य वेळ येताच ‘आता बस झाले. जेवढे मिळाले आहे तेवढे पुरे झाले’ अशी मनोधारणा अंगी बाळगणे आनंदी राहण्यासाठी आवश्यक ठरते.

इतरांचे अनुकरण करताना फक्त शोरूममधल्या मॅनिक्वीनचे (पुतळीचे) कपडे न्याहाळण्यासारखे असते.गोदामात काय काय कचरा भरलाय, हे दिसत नसते. एखाद्या रविवारी दुपारी कुटुंबाबरोबर एकत्रित बसून घेतलेल्या जेवणामध्ये खूप आनंद असतो, पण जोपर्यंत त्या टेबलावर सकारात्मक गोष्टींची चर्र्चा होत असते तोपर्यंतच. Health is wealth या वचनाप्रमाणे सर्व बाजूने कोणताही अतिरेक टाळून तब्येतीची काळजी घेतली व सकारात्मक वृत्ती मनात बाळगली तर तुकोबा म्हणतात तसे ‘आनंदाचे डोही आनंदतरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।’ या अवस्थेपर्यंत काही प्रमाणात तरी नक्कीच पोहोचता येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जयराज साळगावकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.