मराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर

Published by जयराज साळगावकर on   December 27, 2019 in   2019मराठी लेखणी

 

कोणताही समाज उद्योगधंद्याशिवाय मोठा होऊ शकत नाही‧ ‘साहसे श्री वसति’ ह्या उक्तीनुसार व्यापार-उद्योगाच्या जगात साहस (जोखीम) म्हणजे ‘रिस्क’, ही ‘रिस्क जेवढी अधिक तेवढा नफा अधिक’ हे साधे गणित! मराठी माणूस एक वेळ जीवावरचे धाडस सहज करील, पण पैशाच्या बाबतीत रिस्क-जोखीम घेऊन ह्या जोखमीची योग्य ती आखणी करून मोठा उद्योग उभारेल, असे कमी दिसते‧ त्यापुढे जाऊन मोठा केलेला उद्योग दोन पिढ्यांच्या पलीकडे चाललेला दिसणे (अपवाद वगळता) तर महाकठीण. मराठी माणसाची जनुकीय (जेनेटिक) वाढ ही सैनिकी पेशासाठी किंवा नोकरीसाठी अधिक योग्य अशी झाली आहे, असे इतिहासाकडे नजर टाकता दिसते‧ आजच्या नव्या भांडवलशाहीत जी आर्थिक, व्यावसायिक जोखीम निभावण्याची मानसिकता आणि समाजवृत्ती आवश्यक असते, ती मराठी माणसामध्ये खूप अभावाने दिसते‧ भारताबाहेर जाऊन मात्र वेगळ्या प्रकारे व्यवस्थापित असलेल्या समाज अर्थव्यवस्थांमध्ये, त्यामानाने मराठी माणसाच्या उद्योजकतेचा निर्देशांक अधिक उंच दिसतो, ही एक आशेची बाजू झाली‧

मराठी माणूस शेतीउद्योगात तर वर्षानुवर्षे हुशार आहेच‧ नोकरी-धंद्यातही आपल्यापरीने बस्तान बसवून आहे‧ शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर, संशोधक अशा व्यवसायांमध्येसुद्धा मोठमोठ्या पदांवर मराठी माणसे जगभर दिसतात‧ सेवा देणाऱ्या उद्योगांतही मराठी माणूस दिसतो‧ (उदाहरणार्थ- बँका, विमा कंपन्यांत उच्चाधिकारी मराठी माणसे दिसतात‧) मराठी माणसांच्या ट्रॅव्हल एजन्सीसारख्या सेवा चांगल्या चालतात‧ कुरिअर क्षेत्रातही ‘विचारे’ नावाचे मराठी नाव चमकू लागले आहे‧ मराठी माणसाने बऱ्याच नावारूपाला आलेल्या मोठ्या कंपन्या सुरू केल्या‧ परंतु कालांतराने या कंपन्या त्यांच्या हातातून निसटून गेल्या‧ तोंडावर अशी वीस-पंचवीस मोठ्या कंपन्यांची नावे आहेत‧ म्हणजे वास्तवात याच्या दसपट तरी अशा कंपन्या असाव्यात असा अंदाज आहे‧ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उद्योगधंद्यात यश मिळाल्यावर एका मर्यादेपलीकडे धंद्याची कमर्शिअल बाजू, व्यापारी अंग हे महत्त्वाचे ठरते‧ त्यासाठी धंद्यात पैसा कसा खेळवावा, शेअर मार्केटचा फायदा कसा घ्यावा, आणि अर्थबळाच्या जोरावर आहे तो धंदा वाढवून शिवाय नवीन धंदा कसा सुरू करावा, ही धमक मराठी माणसाकडे फारशी नाही‧

संतवाङ्मयाच्या संस्कारामुळे म्हणा किंवा भौगोलिक मानसिक जडणघडणीमुळे म्हणा, धंदा करताना जी आर्थिक चालूगिरी (कायदा सांभाळून) करावी लागते ती मराठी माणसाला जमत नाही‧ या चालूगिरीमुळे व्यापार-उदिमामध्ये (ट्रेडिंग) लवकर प्रगती साधता येते‧ मराठी माणूस हा व्यापार-ट्रेडिंगमध्ये मागे राहिलेला आहे. शिवाजी महाराजांनीसुद्धा किल्ल्यावर वसाहत वसवली, की व्यापार-उदीम करण्यास गुजराला निमंत्रित करावे अशी आज्ञा दिल्याचे पुरावे सापडतात‧ मराठेशाही, पेशवाईमधील राजा-महाराजांचे फायनान्सर हे नेहमीच अमराठी राहिलेले आहेत‧ याचे कारण शेती, नोकरी, शिपाईगिरी आणि फौजदारी या क्षेत्रांतच मराठी माणूस कौशल्य दाखवू शकला आहे‧ परंतु त्याने पैशाच्या जोरावर सत्ता, अधिकार गाजविल्याचे अभावानेच दिसते‧ हे शतकानुशतके दिसत आहे‧ यात अचानक बदल घडवून येण्यासारखे सध्या तरी काही दिसत नाही‧ अमेरिकेसारख्या देशात कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भांडवलातील हिस्सा स्टॉक (शेअर्स) म्हणून देण्याची सोय आहे‧ इथे मात्र आपल्या निसर्गदत्त इमानदारीने, नोकरी करणाऱ्यांच्या कौशल्यातून मराठी माणसे श्रीमंत झालेली दिसतात‧ पण आर्थिक बळाच्या जोरावर अंबानीच्या एक-शतांशसुद्धा भरेल इतका कोणी मराठी उद्योजक आज तरी दिसत नाही‧

आपली मराठी मंडळी श्रमाने मिळविलेला पैसा काटकसरीने वापरून गुंतवितात कोठे? तर कुणा ‘मोतेवार’ किंवा ‘शेरेगर’सारख्या एखाद्या झटपट दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या बोगस (खोका) कंपनीत! मराठी माणसाला ‘भीड भिकेची बहीण’ हे कळते, पण वळत नाही‧ अपमान झाल्यावर समोरच्याची कॉलर पकडणारा हा मराठी गडी गोड बोलण्याला मात्र भुलून जातो आणि भिडेपोटी स्वतःचे नुकसान करून घेतो‧ शेरेगर किंवा मोतेवार अशा प्रकरणात पैसे गेले ते मराठी माणसांचेच! अशी अनेक ‘भुदरगड’ (सांगली जिल्ह्यातील पतपेढीप्रवण असे एक गाव) मॉडेलची बोगस उदाहरणे आपण पाहतो‧ पण तरीसुद्धा मराठी माणसांची फसवणूक थांबलेली काही दिसत नाही‧ स्वतःच्या श्रमाचे, बचतीचे पैसे त्याला योग्य ठिकाणी गुंतविता येत नाहीत, तो माणूस उद्योग काय करणार? शेअर बाजारातसुद्धा २०-२५ वर्षांपूर्वी नाबर-पंडित अशी एक-दोन मराठी नावे होती‧ आज एकही नाही, सी‧आर‧बी‧ तसेच सागाची झाडे लावणाऱ्या अनेक कंपन्यांनी अनेक मराठीजनांना अक्षरशः रस्त्यावर आणले‧ भले बँकांमध्ये अगदी चेअरमनपदापर्यंत मराठी माणसे गेलेली असली आणि भारताच्या अर्थमंत्रीपदी सी‧ डी‧ देशमुख, नियोजन मंडळाचे प्रमुख धनंजयराव गाडगीळ होऊन गेले असले, तरी सर्वसामान्य मराठी माणसाला दुर्दैवाने आर्थिक व्यवहारात गती असल्याचे दिसत नाही‧

येणारा काळ हा सेवा उद्योग आणि जागतिक आर्थिक उलाढाली यांचा आहे‧ मराठी माणसांच्या ताकदीच्या आणि कमजोरीच्या बाजू लक्षात घेतल्या, तर भविष्यात संधी घेण्यासाठी त्याला आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल‧ कारण येणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी जे फायनान्सचे अंग लागेल, ते नसल्यामुळे तो समाजाच्या आर्थिक प्रवाहातून फेकला जाण्याची भीती आहे‧ सेवा क्षेत्रात जो संयम लागतो, जी गोड जीभ लागते, लवचिकतेने वाकण्याची जी तयारी लागते, ती ‘मोडेन पण वाकणार नाही’ म्हणणाऱ्या मराठी माणसात अभावानेच आढळून येते‧ ‘सर्वायव्हल’ म्हणजे जीवनप्रवाहात कोणत्याही भीषण (आर्थिक) परिस्थितीत तगून जाण्याची क्षमता मराठी माणसात दिसत नाही‧ त्यामुळे बहुतेक वेळी कचकड्याच्या बाहुलीप्रमाणे तो मोडून पडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे‧ न्यूनगंडातून निर्माण झालेला अहंगंड जपताना तो मराठेशाहीत आणि पेशवाईत इतका रमतो की, त्याला आजचे भान राहत नाही‧ तिथे उद्याची बात ती कशाला?  पिढ्यान्पिढ्या सदैव अस्थिरतेत राहिलेल्या आणि त्यामुळे अत्यंत लवचिक मूल्ये जपणाऱ्या मारवाडी, सिंधी, पंजाबी आणि कच्छी संस्कृतींनी त्याला पैशाच्या क्षेत्रात अगोदरच खूप मागे टाकले आहे तर दाक्षिणात्य मंडळींसारख्या बंदिस्त वातावरणात राहून आपले हित तेवढे जपण्याचा संकुचित विचारही (गुण) मराठी माणसात नाही‧ देशाबद्दल बोलायचे झाले, तर उत्तरेकडील लोक आम्हाला दाक्षिणात्य समजतात आणि दाक्षिणात्य लोक आम्हाला उत्तरेकडील समजतात‧ अशा विचित्र भू-राजकीय परिस्थितीत (जिओ-पॉलिटिकल) मराठी माणसांतून आजपर्यंत एकही पंतप्रधान निर्माण झाला नाही, याचे नवल वाटू नये‧ ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-दलित, मराठा-ओबीसी, मराठा-मराठेतर, भट-परभट, बौद्ध-दलित, कुणबी-मराठा, ब्राह्मण-कायस्थ, लिंगायत-

ओ‧बी‧सी‧, गुजर-मारवाडी अशा अनेक परस्परविरोधी गटांमध्ये हा समाज एकमेकांच्या विरोधातच उभा आहे‧ त्यामुळे उद्याचा आर्थिक-औद्योगिक जगातला मराठी माणूस हा ‘मुका बिचारा कुणी हाका!’ अशा परिस्थितीत असण्याची शक्यता दुर्दैवाने अधिक वाटते आणि उद्योगाविना ‘अर्थहीन’ अशा अवस्थेत तो राहील की काय, अशी भीती वाटते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जयराज साळगावकर