article image marathi june 03

मूर्ख माणूस ! | व. पु. काळे | Stupid Man | Va Pu Kale

मूर्ख माणूस !

“मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय करावं?” हा माझा प्रश्न

“त्याला टाळावं.”

“त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.”

“मूर्ख म्हणून सोडून द्यावं.”

“एक झापड मारावी.”

“अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवावं आणि त्याच्या मूर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात. म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.”

प्रश्न एक.

उत्तरं अनेक. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे, ‘एक साधा प्रश्न माझा. लाख येत उत्तरे, हे खरे, की हे खरे, की हे खरे, की हे खरे.’

सगळी उत्तरं खरी असली तरी आणखी एक वेगळं उत्तर उरतंच. ते उत्तर माझं. ते माझं उत्तर म्हणून वेगळं आहे, असं मला म्हणायचं नाही. तर या सर्व उत्तरात हे उत्तर अपवादच ठरणार आहे. याचं कारण मूर्खामूर्खातही अपवाद असतात.

‘टीटी’ म्हणून एक अपवाद आहे.

‘टीटी म्हणजे त्र्यंबक टिळक. ‘

टीटी इतका मूर्ख माणूस मी सध्याच्या जगात पाहिला नाही. मी तो कधी भेटेल याची वाट बघतो. कारण हा मूर्ख, येडपट माणूस मला आवडतो.

कोणत्या कामाच्या संदर्भात हा प्राणी मला प्रथम भेटला ते आता आठवत नाही. पण ठरवलेलं काम संपल्यावर जाताना त्यानं आपलं व्हिजिटिंग कार्ड मला दिलं आणि तो म्हणाला,

“हे कार्ड तुम्ही नक्की सांभाळून ठेवाल.”

तो गेला. जाताना तो असं का म्हणाला असेल याचा मी विचार करू लागलो. मग त्याचं कार्ड मी बारकाईनं पाहायला सुरुवात केली. चारचौघांसारखंच त्यानं आपलं नाव कार्डावर छापलं होतं. अगदी सहज म्हणून मी त्या कार्डाची मागची बाजू पाहिली. त्याबरोबर त्याच्या बोलण्याचा उलगडा झाला. कार्डाच्या मागच्या बाजूला त्यानं अत्यावश्यक असे महत्त्वाचे दहा-पंधरा फोन नंबर्स छापलेले होते. महापालिकेची मुख्य हॉस्पिटल्स, अॅम्ब्युलन्स,शववाहिका, फायर ब्रिगेड, रक्तदान केंद्रांबरोबरच काही ब्लड बँक्स असे अनेक नंबर त्यात होते.

मी खरोखरच ते कार्ड हाताशी येईल अशा ठिकाणी ठेवलं. एखाद्या व्यक्तीची आणि आपली गट्टी जमली की त्याचं व्हिजिटिंग कार्ड आपण सांभाळतोच असं नाही. पण त्र्यंबक टिळकचं कार्ड मी सांभाळलं ते दर्शनी भागापेक्षाही मागच्या बाजूसाठीच. टीटी वेगळाच होता.

केव्हातरी तो आणि मी एका हॉटेलात गेलो. चहापाण्यापेक्षा गप्पा महत्त्वाच्या होत्या. बाहेर पडताना टीटीनं काऊंटरवर पाचाची नोट टाकली.

“साहेब, ही नोट खोटी आहे.”

कॅशिअरनं असं सांगताच आम्ही चक्रावूनच गेलो. वादविवाद करण्यात काही अर्थच नव्हता. टीटीनं दुसरी नोट पुढे केली.

आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. टीटी क्षणभर थांबला. त्यानं खिशातून लाईटर काढला आणि ती नोट चक्क जाळून टाकली.

“तू हे काय करतोस ?” असं मी मध्येच म्हणालोही. टीटी म्हणाला,

“मी ही नोट सहज कुठंही खपवू शकलो असतो. एखादा मोरू सहज भेटला असता.”

“मग?”

“ही नोट अशीच सर्क्युलेशनमध्ये राहिली असती आणि कदाचित एखाद्या अतिशय नाडलेल्या माणसाच्या हातात गेली असती. कदाचित त्या नोटेसहित तो एखाद्या केमिस्टकडे गेला असता आणि केमिस्टनं औषध नाकारलं असतं तर ?”

“पण टीटी…”

“पाच रुपयाची नोट जाळण्याइतपत परमेश्वरानं मला ऐपत दिली आहे.”

“मी तेच विचारणार होतो, ही नोट शंभराची असती तर?”

टीटी म्हणाला,

“जो परमेश्वर मला पाचाची नोट जाळायची ऐपत देतो तोच मला शंभराची नोट जाळण्याचीही

ऐपत देईल. भविष्यकाळात मी सत्कृत्य करू शकेन की नाही याच्याशी मला आज कर्तव्य नाही. मी जर आज चांगली गोष्ट करू शकत असेन, तर का करायची नाही ?”

माझ्याजवळ उत्तर नव्हतं.

टीटीनं असंच एकदा मला चक्रावून टाकलं. आम्ही टॅक्सीसाठी थांबलो होतो. दोघांनाही हव्या असलेल्या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता. आम्ही ठरवून दांड्या मारल्या होत्या आणि नाटकाला गेलो होतो. प्रयोग सुटला होता. पोट भुकेनं कडाडलं होतं. वाहनाची नितांत गरज होती आणि मुंबईचे टॅक्सीवाले बेपर्वाईनं न थांबता जात होते.

थिएटरपासून हॉटेलात चालत गेलो तर लांब, पण टॅक्सीवाल्यानं अकारण नकार द्यावा अशा अंतरावर आणि तेवढ्यात एक कोरी करकरीत टॅक्सी इशारा करताच थांबली.

आम्ही टॅक्सीत बसलो.

टॅक्सी चालू केल्यावर टॅक्सीवाला गाऊ लागला. यानं ऐन दुपारी चढवली की काय असं वाटलं. गाता गाता स्टिअरिंग गच्च धरून तो जागच्या जागी नाचू लागला. येणाऱ्या-जाणाऱ्या इतर टॅक्सीवाल्यांना मध्येच अभिवादन करीत राहिला. मग गाणं थांबवून तो समोरच्या आरशातनं आमच्याकडे पाहून बोलू लागला,

“साब, भगवान देता है तब छप्पर फाडके देता है ?”

“आज बहुत खूष दिखते हो?”

“ऐसाही.”

हॉटेलजवळ टॅक्सी उभी राहिली तोपर्यंत त्यानं आनंदाचं कारण सांगितलं नाही. गाडीतून आम्ही उतरण्यापूर्वी त्यानं, ‘साब, जरा ठहरो’ असं म्हणत आमच्या दोघांच्या हातावर दोन-दोन पेढे ठेवले आणि आम्ही पेढ्याचं कारण विचारण्याच्या आत तो आतून फुलून येत म्हणाला, “आज इस गाडीकी डिलीव्हरी मिल गयी. आर. टी. ओ. पासिंग किया. और पहला पॅसेंजर आप है, मुँह मिठा करो.”

टीटी क्षणभर थबकला आणि टॅक्सीवाल्याला म्हणाला, “हम अभी आयेंगे, जरा ठेहरना.”

टीटीनं समोरच्या दुकानातून सहा-सहा रुपयाचे दोन रुमाल विकत घेतले आणि ते टॅक्सीवाल्याला देत तो म्हणाला,

“हमारी तरफसे इस खुशीके अवसर पर.”

जेवताना मी त्याला विचारलं, “हा टॅक्सीवाला तुला पुन्हा भेटेल का?”

“न भेटण्यातच मजा आहे आणि भेटला तर तो मला ओळखणार नाही.”

“तू ओळखशील ?”

“नक्कीच अर्थात नंबरावरून. एमएमक्यू ५३०८. अर्थात मी ओळख देणार नाही.”

“का?”

“त्यातच गंमत आहे.”

टीटीच्या घरी आमचं एकदा टोळकं जमलेलं. गप्पाटप्पा आणि वगैरे वगैरे चाललेलं. एवढ्यात फोन वाजला.

टीटीनं फोन उचलला.

“हॅलो, नो, नो. आय अॅम टिळक.”

फोन खाली ठेवत तो म्हणाला, “डॉ. सप्तर्षींची चौकशी करीत होता बिचारा.”

मग फोन आणि राँग नंबरवर न संपणारी निष्फळ चर्चा झाली. कोणीतरी मुंबईच्या फोनची नवी व्याख्या ऐकवली. “हाफ द प्यूपल आर वेटिंग फॉर न्यू कनेक्शन्स् अॅण्ड रिमेनिंग फॉर डायल टोन.”

तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. टीटीनं सांगितलं, “नो सर, धीस इज नॉट डॉ. सप्तर्षीज् नंबर, व्हिच नंबर यू आर डायलिंग ? ओ. के.”

आमच्यापैकी एकानं गप्पागोष्टीत व्यत्यय नको म्हणून रिसिव्हर उचलून ठेवला. टीटीनं तो लगेच हातात घेतला आणि एकशे सत्त्याण्णव नंबर फिरवला. मग त्यानं ऑपरेटरला डॉ. सप्तर्षींचा जुना नंबर बदललाय का ते विचारलं, “थँक्यू” म्हणत त्यानं फोन ठेवून दिला. टीटीने फोन ठेवताक्षणी परत बेल वाजली. पुन्हा राँग नंबरवरच फोन आला होता. या वेळेला मात्र टीटी म्हणाला,

“जस्ट अ मिनीट सर, मी टिळकच बोलतोय, पण तुम्हाला मी डॉक्टर सप्तर्षींचा बदललेला नंबर सांगतो, लिहून घ्या.”

फोन खाली ठेवत टीटी म्हणाला, ” त्या बिचाऱ्यावर चिडण्यात काय मतलब ? हवा तो नंबर मिळाला नाही की फोन करणारा आपल्यापेक्षा जास्त परेशान असतो. एकतर त्याचे पैसे जातात, त्यात आपण खेकसल्याच्या यातना.”

तर असा हा एक मूर्ख माणूस या युगात न शोभणारा.

काही ना काही स्वतःला पेलतील अशी माणसाची मूल्यं जपणारा. टीटीचं मूर्खपण तुम्हाला जर आवडत असेल तर त्याची ओळख करून घेणार का ? फोन नंबर सांगू ?

नक्कीच, पण समजा राँग नंबर लागला तर ? तर सगळेच काही टीटीसारखे नसतात.

पैसे जातात आणि एखाद्या अज्ञात माणसाच्या अकारण शिव्या.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


व. पु. काळे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.