माणूस | human life

माणूस जगतो कशावरी? | जयराज साळगावकर | What does man live on? | Jayraj Salgaokar

माणूस जगतो कशावरी?

लोकार्थाने पाहता आपण चार-चौघांसारखे आयुष्य जगलो, म्हणजेच कृतार्थ झालो, असे समजले जाते. पण ह्यापलीकडे जाऊन आपण नक्की कशासाठी जगलो, ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडणे कठीण. एकदा परदेशी जाऊन येईन, हिमालयात जाऊन येईन, चारधाम यात्रा करेन, डिस्नेलँड, नायगारा वॉटरफॉल किंवा इजिप्तचे पिरॅमिड पाहून येईन अशी ध्येये समोर ठेवून ती पुरी झाली अथवा न झाली तरी नक्की कशासाठी जगलो? या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे मनात जी पोकळी निर्माण होते, ती भरून काढायचा प्रयत्न होतो. सामान्य सरधोपट जीवन जगत असतानासुद्धा जे प्रश्न, जो संघर्ष, जी अनिश्चितता अपरिहार्यपणे निर्माण होत असते, त्याच्या मागे आस-आशा ही खरेतर हे सगळे उपद्व्याप चालवणारे इंजिन आणि इंधन असते. माणूस आशेवर जगतो. यशाचे पारडे कायम आपल्या पदरात पडेल ह्या आशेवर तो जगतो. आयुष्यात आपत्ती, विघ्ने, संकटे, कज्जेखटले अंगावर पडणार नाहीत या आशेवर तो जगतो. बरे न होणारे आजार आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना होऊ नयेत या आशेवर तो जगतो. शेअर्स, जमीनजुमला आणि इतरत्र केलेल्या गुंतवणुकीत आपल्याला खोट येणार नाही या आशेवर तो जगतो. आपली इज्जत, प्रतिमा कोणी घालवणार नाही या आशेवर तो जगतो. आजूबाजूच्या आणि जवळच्या लोकांना झालेली पीडा आपल्याला होणार नाही या आशेवर तो जगतो.

 ‘माणूस जगतो कशावरी?’ हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. कारण रोटी, कपडा, मकान आणि इतर तत्सम मूलभूत गरजा भागल्यानंतर आता पुढे काय? उदरनिर्वाह, निवास, वाहन, तीर्थस्थाने, देश-परदेशवारी अशा पायऱ्यांनी चढत जाणाऱ्या गरजा भागवण्यासाठी पैसे तर मिळवावेच लागतात आणि पैसे काही घरबसल्या मिळत नाहीत. त्यासाठी आपल्यापरीने का होईना पण काम हे करावेच लागते. मग उद्योगधंदा, नोकरी, गुंतवणूक किंवा इतर काही प्रकारचे काम असो; त्यात गुंतवून घ्यावे लागते. त्यासाठी चढत्या पायऱ्यांनी श्रम करावे लागतात. जोखीम पत्करावी लागते. ओघाने घर, लग्न-संसार थाटावा लागतो. पुढे मुलेबाळे त्यांचे संगोपन, शिक्षण या गोष्टी आल्याच तर कधी आईवडिलांची जबाबदारीही (पूर्ण किंवा काही अंशी) घ्यावी लागते.

ही सगळी उठाठेव करण्यात बरेचसे आयुष्य निघून जाते आणि आपण फक्त ह्याच गोष्टी करण्यासाठी जगत राहिलो का, असे वाटू लागते. कालांतराने ह्या पारंपरिक जबाबदाऱ्या कमीकमी होऊ लागतात. (त्यासुद्धा सर्व गोष्टी निर्विघ्नपणे झाल्या तर..!) आयुष्य जगताना प्रत्येक पायरीवर छोटा-मोठा संघर्ष हा करावाच लागतो. कधीकधी तो अनाठायीसुद्धा असतो, पण ते नंतर लक्षात येते. गरजेला गरज वाढते, तशीच ईर्ष्येला ईर्ष्या भिडते. त्यात वेळ फुकट जातो. काही काळानंतर आपण त्या क्षुल्लक कारणासाठी किती ताकद खर्च केली याचे वैषम्यसुद्धा वाटते. हातून निसटलेल्या गोष्टींविषयी रुखरुख वाटत राहते. राहून गेलेल्या गोष्टींची यादी (बकेट लिस्ट) करावयास गेलो, तर बकेटला बुडच (तळ) नसल्याचे लक्षात येते.

इथे भगवान बुद्धांची एक झेन कथा नमूद करावीशी वाटते. बुद्धांचा एक शिष्य बुद्धांकडे गेला, त्याच्या हातात एक पेला होता. तो बुद्धांना शरण गेला.बुद्धांनी त्याला विचारले, ‘‘तुला काय हवे?’’ तो म्हणाला, ‘‘हा माझा पेला अर्धा भरलेला आहे; तो काही केल्या पूर्ण भरत नाही. हा पूर्ण कसा भरायचा त्याचे कृपा करून मार्गदर्शन करा.’’ बुद्धांनी त्याला शांतपणे सांगितले, ‘‘आधी अर्धा भरलेला पेला रिता कर; मग तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपसूकच मिळेल.’’ वर उल्लेख केल्याप्रमाणे बकेट लिस्टच्या बकेटला तळ हा नसतो. ह्या दोन पाश्चिमात्य आणि पौर्वात्य झेन कथांमध्ये गमतीदार साम्य दिसते.

अर्थशास्त्राची साधीसोपी व्याख्या म्हणजे ‘वस्तू व सेवांचा मर्यादित पुरवठा आणि माणसांची कधीही न भागणारी मागण्यांची तहान’ अशी थोडक्यात सांगता येईल. त्यामुळे पेला भरणे किंवा बकेट भरणे हे अशक्य असले तरी भरणारा भरणे सोडत नाही, उलट त्यालाच जगणे समजतो, अस्तित्व समजतो, ध्येय समजतो आणि हा खेळ दुर्दैवाने अपंगत्व किंवा मरण आल्याशिवाय थांबत नाही, हे कटू सत्य आहे !

मागण्यांचा, भुकेचा जाळ हा अविरत सुरू असतो. त्याला अंत नाही. तो थांबला तर इंजिन बंद पडते. हा जाळ जोपर्यंत पेटत असतो तोपर्यंत देह सक्षम असतो. इंग्रजीत ज्याला ‘फायर इन बेली’ म्हणतात आणि मराठीत ज्याला ‘जठराग्नी’ म्हणतात, तो हाच. ह्यालाच अन्नाचे इंधन लागते आणि इंधन संपले, की भुकेचा अग्नी प्रदीप्त होतो व अनावर भूक लागते. अशा भूक न भागलेल्या माणसाला भुकेकंगाल म्हणतात. शरीराचे चलनवलन, चयापचय, पचन, निःसारण हे या अग्निरूपी इंधनावर चालू असते आणि हा अग्नी, जसे विषाने विष मरते, तसा मंद पडल्यावर चितेवरच्या अग्नीने संपूर्ण देहाला प्रज्वलित करून त्याची राख करून टाकतो.

इंग्रजी ‘बेगर्स ऑपेरा’मधील ‘व्हाय डू आय लिव्ह ?’ या जॉन गे यांनी लिहिलेल्या (जर्मन रूपांतर : थ्रीपेनी ऑपेरा, लेखक : बर्टोल्ट ब्रेख्त) गीताचे रूपांतर पु. ल.नी ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकात केले आहे. ते म्हणतात,

माणूस जगतो कशावरी? माणूस जगतो कशावरी?

दीड वितीच्या खळगीला ह्या देवाने नच बूड दिले

जाळ भुकेचा पेटत ठेवित देहाचे हे धूड दिले

ज्या जाळाला विझणे ठाऊक फक्त एकदा चितेवरी

माणूस जगतो कशावरी?

आशा-निराशेच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणसाला वेळ नसला काय किंवा निवृत्तीसारख्या काही कारणाने वेळ असला काय; त्याचे मन भीतीची भुते सतत उभी करून आशा-आकांक्षांना खीळ घालत असते. पण त्याच वेळी जगण्याला अर्थही देत असते. हातात जपमाळ धरली तरी मनाचे डोळे हे मल्टिप्लेक्सच्या दुसऱ्या पडद्यावर चालू असलेले चलच्चित्र बघत असतात, ते मनाला एकाग्र होऊ देत नाही.

या सगळ्यावर कहर असतो, तो म्हणजे ‘मृत्यूची भीती’ आणि त्यावर शक्यतो मात करण्याची दुर्दम्य आशा! मरण या अंतिम सत्याची माणसाला सर्वात मोठी भीती असते. मृत्यूच्या या भीतीला आवर घालू शकते, ती फक्त आशा, आशा आणि आशा! जसा मृत्यू अटळ आहे तशी आशाही अटळ आहे आणि आशा सोडणे म्हणजे जणू प्राण सोडणे होय. पु. ल. पुढे लिहितात,

संत महात्मे सांगून गेले प्रसन्न ठेवा प्रथम मना

राम स्मरा, हरिनाम स्मरा, दिनरात करा नामस्मरणा

भरल्या पोटी भजन रंगते रतिसुख भोगुनि मग मुक्ती

देव असे धनिकांचा वाली परवडते त्यांना भक्ती

नामाने का कुणा लाभला भाकरीचा चतकोर तरी?

हे  जळजळीत  सत्य  पु. ल. उलगडतात, ते माणूस जगतो कशावरी हे शोधण्यासाठी. जीवनाचा अर्थ शोधणारी असंख्य पुस्तके आतापर्यंत लिहिली गेली, पण कोणासही ठोस असा अर्थ सापडल्याचे दिसत नाही. काही तत्त्वज्ञ तर जीवन निरर्थक आहे अशा टोकाच्या निष्कर्षापर्यंत आले. खरोखरच माणूस कशासाठी जगतो हे कोडे कुणाला उलगडले आहे का?

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जयराज साळगावकर

(लेखक अर्थतज्ज्ञ व साहित्यिक आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.