भीती | overcoming fear | fear and anxiety | I feel fear

कवचकुंडले ही भीतीची | संजीव लाटकर | Armour of Fear | Sanjeev Latkar

कवचकुंडले ही भीती ची

भीती या भावनेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. एका अर्थाने भीती ही माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात आल्यापासून त्याच्यामागे पडछायेसारखी वावरते आहे. प्राण्यांमध्ये आजही आदिम अवस्थेतील अस्तित्वाची भीती टिकून आहे. माणूस प्रगत झाला, आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न झाला, तरी भीती काही त्याची पाठ सोडायला तयार नाही. भीतीसारखी निरपेक्ष दुसरी भावना नसेल कदाचित. देश, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, वर्ण, वर्ग, जात, लिंग, वय, विचारसरणी… सर्वांना जी सारख्याच तीव्रतेने छळत असते, ती भीती! भीती ही साम्यवादी किंवा कम्युनिस्ट आहे म्हणावी तर ती कम्युनिस्टांना तेवढीच छळते, जेवढी भांडवलवादी मंडळींना छळते. किंबहुना भांडवल वाढले, की भीती वाढतेच. साम्यवादी भीती तर थंडीपेक्षा जास्त रक्त गोठविणारी असते.

लक्षात घ्या, भीती ही हिंसक नसते. ती तुम्हाला रक्तबंबाळ करत नाही. ती एका रात्रीत उद्ध्वस्त नाही करत त्सुनामीसारखी. पण आपण झोपेत असताना कालच्याप्रमाणे आज रात्री पुन्हा त्सुनामी आली आणि झोपेतच तिने आपल्याला गाठले तर? या विचारांच्या काहुराने जेव्हा कित्येक रात्री डोळ्याला डोळा लागत नाही तेव्हा समजावे, की लाखो घरे उद्ध्वस्त करणाऱ्या त्सुनामीने परत समुद्राकडे जाता जाता तुमच्या मनात भीतीचे घर बांधले आहे.

होय! भीतीचे घर मनात असते! आणि मनाच्या अगदी तळाशी ती राहते.

काळोख्या, कुबट तळघरात काय चाललेय, याचा आपल्याला वरच्या आलिशान गुबगुबीत दिवाणखान्यात काय थांग लागणार? लग्नघरातले पै-पाहुणे पांगल्यावर घर जसे खायला उठते, तसे आपले प्रियजन आसपास नसले की अशा एकांतात… विशेषतः नीरव शांततेत भीती आपल्याला भेटण्यासाठी आतुर होते. तुम्ही तिला भेटायचे ठरवले, तरी ती तुम्हाला भेटत नाही. ती भयपटातल्या भुतासारखी फक्त जाणवत राहते… समाजातली लहानथोर माणसे सहजपणे आपल्या करकच्च तावडीत पकडून ठेवणारी ही भीती आपल्याला समजून घेता येईल का?

आपण आपली किंवा अन्य कुणाची भीती घालवू शकत नसलो, तरी ती समजून घेणे हे आपल्या हिताचे नक्कीच आहे. कारण भीती ही आपल्याला झालेली आपल्याच अज्ञात व्यक्तिमत्त्वाची ओळख असू शकते.

आपल्या आणि आप्तांच्या अस्तित्वाला काल्पनिक किंवा प्रत्यक्ष धोका पोहोचवणारे प्रत्येक कारण हे भीतीचे मूळ असू शकते. या अस्तित्वात आपला जीव, आरोग्य, आपली ओळख, आपले कुटुंब, आपले छोटे मोठे विजय, मानापमान, ‘अचिव्हमेंट्स’ (कामगिऱ्या), संपत्ती, प्रतिष्ठा, खुशाली, प्रेम… ज्या-ज्याविषयी आपल्याला मालकीची भावना असते, त्या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे माणसाला मरेपर्यंत ग्रासणारी महत्त्वाची भीती म्हणजे मृत्यूच असते. या भीतीमधील फोलपणा भारतीय अध्यात्म प्रभावीपणे सांगते खरे, पण तरीही ही भीती काही केल्या दूर होऊ शकत नाही.

भीती म्हणजे ज्ञानाचा अभाव. त्या अर्थाने भीती म्हणजे अंधकार. अंधार हा प्रकाशानेच दूर होऊ शकतो. तशी भीती केवळ ज्ञानानेच दूर होऊ शकते. ज्ञानाच्या हर हत्याराने भीतीचे विच्छेदन अगदी सहजपणे करता येते. तरीही सर्वसाधारण ज्ञानी माणसाकडे भीती बाकी उरतेच! ज्या माणसाला भीतीने ग्रासले आहे, अशा माणसाचा शेवट शतकानुशतके अपरिहार्यपणे होत आला आहे, पण भीतीचा मृत्यू झालेला नाही.

भीती अमर आहे की काय? की भीतीच्या अस्तित्वाचेही काही प्रयोजन आहे?

संगणकात अंगभूत समाविष्ट असलेल्या ‘इंटेल इनसाइड’प्रमाणे आपल्या मनातसुद्धा ‘फीयर इनसाइड’ नामक चीप लावूनच आपण या जगात अवतरले आहोत?

भीती जर अंगभूत असेल, तर तिचाही उत्क्रांतीदरम्यान विकास झाला असेल का? भीतीमुळे माणसे अजूनही समाजाच्या अधीन – म्हणून मर्यादशील आहेत का? भीती हे माणसाचे संरक्षक कवच आहे का? थोडक्यात, भीती ही आपल्याकरिता उपकारक आहे का?

चिंता ही बहुधा भीतीची धाकटी बहीण असावी. ती भीतीइतकी मोठी नसते आणि सतावतेही अधूनमधून. चिंता मोठी झाली, की तिची भीती होत असावी. समोर आपल्यापेक्षा ताकदवान काहीही दिसले तर जीव खाऊन पळायचे आणि स्वतःची सुटका करून घ्यायची, ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. भीती ही स्वतःला सुरक्षित ठेवणारी चिवट आणि प्रतिक्षिप्त क्रिया आहे. ती खूपच नैसर्गिक आहे. समोर अचानक आव्हान किंवा संकट उभे ठाकले, की माणसाचा मेंदू आणि मेंदूतील स्राव हे सगळे आपल्या अवयवांमार्फत आपोआप घडवून आणतात, हे आपण शिकलोय. हे कित्येक शतके सुरूच आहे.

पण भीतीच्या आकलनात गफलत झाली तर?

म्हणजे भीतीचे आकारमान मोजण्यात चूक झाली तर?

तुम्हाला सराव नसताना तुम्ही खूप उंचावर पोहोचला आणि खाली डोकावून बघितले, तर अनेकांच्या पोटात गोळा येतो. वाट चिंचोळी असते, बरोबरचा सराईत सहजपणे पुढे जाता जाता कुणीतरी तोल जाऊन खाली पडल्याचा किस्सा सांगतो. अशा वेळी पाय लटपटायला लागतात. घशाला कोरड पडते. काही जण मटकन बसकण मारतात. त्यांचा धीर भीतीमुळे इतका खचलेला असतो, की ते धीर गोळाच करू शकत नाहीत. कारण त्यांनी असा ठाम समज करून घेतलेला असतो, की आपणसुद्धा दरीत कोसळू! (जशी खूप माणसे बुडण्याच्या भीतीने पोहायला कधीच उतरत नाहीत!) भीतीने सारासार भाव ओलांडला, की त्याचा भयगंड होतो… समजा, याच व्यक्तीला सापाची भीती वाटतेय आणि डोंगरावर साप आला तर तो इतक्या सहजपणे पळून दूर जाईल आणि सापापासून सुटका करून घेईल, की उंची आणि खोली याचे त्याला फारसे भय वाटणार नाही.

भीती मानसिक तणाव निर्माण करते. हा तणाव आपल्याला एकापरीने विचारशील आणि कृतिशील करतो. तणाव आपल्याला जीवनाची उंची वाढविण्यासाठी उद्युक्त करतो. फार कमी विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आल्याचा आनंद होतो. बाकी बहुतेकांच्या मनात तणावाची भावना असते. नापास झालो तर..? कमी गुण मिळाले तर..? या तणावातून ते अभ्यासाला लागतात. परिणामी, त्यांची प्रगती होते. जी गत विद्यार्थ्यांची, तीच त्यांच्या आई-बाबांची. घर, वाहन, कर्ज, हप्ते, बचत, संगोपन, शिक्षण, करियर, मुलांची लग्ने, प्रमोशन, आजारपण, पापपुण्य या आणि यासारख्या रोजच्या नि छोट्यामोठ्या ताणतणावाच्या परिस्थितीतून त्यांचा प्रपंच सुरू असतो आणि वर म्हटल्याप्रमाणे ताणतणावाच्या मुळाशी भीती असते… कधी सुप्त, तर कधी स्पष्ट!!!

गरज जशी ‘शोधाची जननी’ म्हणतात, तसाच ‘तणाव हा प्रगतीचा पिता’ म्हणावा लागेल. तणावामुळे काही करण्याची आच निर्माण होते. सर्व प्राणीपक्षी जगताप्रमाणे माणसाच्या धावण्यात आणि उडण्यात त्याचे स्वतःचे हित आहे, हे निसर्गाचे सूत्र आहे. मागे रेंगाळलो तर अपरिहार्य ऱ्हास, पुढे धावलो तर सतत खुणावणारी अनेकविध आकर्षणाची रास अशा अवस्थेत माणूस आपले जीवन व्यतीत करत आला आहे. म्हणजे एक तर आपला कुणीतरी घास घेईल ही भीती आणि दुसरीकडे आपल्या तोंडचा घास जाईल हा तणाव, अशा स्थितीत माणूस गेली कित्येक शतके जगत आला आहे. त्याने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

भीती ही एक भावनेची अप्रकट तटबंदी आहे. प्रतिकूल परिस्थिती, संकटात माणसाला ती आपल्यात सामावून घेते. सगळे शमले, की माणूस आपसूकच या तटबंदीच्या बाहेर पडतो.

अजून एक गंमत आहे.

एकाच स्वरूपाच्या तणावाला वेगवेगळ्या माणसांकडून मिळणारा प्रतिसादही भिन्न असतो. म्हणजे सरसकट नियम असा काही नाहीच. मृत्यूला न घाबरणाऱ्या लोकांची संख्याही प्रचंड आहे आणि तणावाला किंमत न देणारेही पुष्कळ आहेत. म्हणजे भीती किंवा तणाव हे संस्कार, स्वभाव, अनुभव, विचारांची बैठक, वातावरण यावर ठरण्याचीही शक्यता अधिक असते. काही जणांच्या अंगभूत मर्यादांमुळे भयाचा भयगंड होतो किंवा न्यूनगंड तरी! भयगंड त्याचे आयुष्य विचलित करू शकतो. उदा. यात दुर्घटनेच्या भीतीने लोकलप्रवास टाळणारे लोक येतात किंवा दुसरीकडे न्यूनगंड बाळगणारे आणि जीवाची किंमत न समजल्याने लोकल गाडीच्या टपावरून प्रवास करणारे स्टंटबाजही येतात… कधी तरी त्यांच्या तथाकथित निर्भय वृत्तीचा कोळसा होतोच! अशा परिस्थितीत टिकतो कोण? तर स्वतःची काळजी घेणारा, आपल्या भीतीचे निरीक्षण व अनुभवाच्या आधारे व्यवस्थापन करणारा, नाइलाजाने लोकलच्या दरवाजात लटकावे लागूनही जीव मुठीत धरून ‘गंतव्य स्थळी’ सुखरूप पोहोचणारा कुटुंबवत्सल सामान्य माणूस…

सामान्य माणूस सुरक्षित आहे, तो भीती आणि तणावाची प्रमाणबद्ध कवचकुंडले आजन्म परिधान केल्यामुळेच!

म्हणून… अनिर्बंधपणे रांगणाऱ्या लहान बाळाला  ‘बुवा येईल!’ असे सांगून त्याचे पालक त्याच्या आयुष्यातल्या भीतीचा श्रीगणेशा स्वतःहून करतात! ही भीतीची लस अगदी लहानपणी टोचण्याची पद्धत आजही अबाधित आहे.

असो..!

माणसाची गरज आहे म्हणून भीतीची कवचकुंडले त्यानेच टिकवून ठेवली आहेत एवढे तर आपल्याला कळले! गरज नसती, तर शेपटीसारखी तीही केव्हाच गळून पडली नसती का?

अजून काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


संजीव लाटकर

(लेखक लाईफ स्किल-पेरेंटिंग मार्गदर्शक, लेखक व वक्ते आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.