म्युच्युअल फंड | Mutual Fund | Mutual Funds | Types of Mutual Funds | What is Investment Product | What is Mutual Fund Investment | What Mutual Funds to Invest in

म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?| निमेश केनिया | What is Mutual Fund?

 

म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?

गेल्या काही वर्षांत गुंतवणूक-दारांसाठी आकर्षक परतावा देणारा आणि दीर्घ काळात भांडवलाची वाढ करून देणारा एक आकर्षक पर्याय म्हणून म्युच्युअल फंड समोर येत आहे. उदारीकरणानंतर म्युच्युअल फंड व्यवसायात सरकारी मालकीच्या यू.टी.आय.बरोबर खाजगी कंपन्यांनीसुद्धा आपला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू केला. गेल्या दहा वर्षांत या व्यवसायाला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. याचविषयी थोडक्यात माहिती :

म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन नेमके असते तरी कसे?

ही एक त्रिस्तरीय रचना आहे. यामध्ये पहिल्या स्तरावर स्पॉन्सर्स, दुसऱ्या स्तरावर अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि ट्रस्टी कंपनी असते, तर तिसऱ्या स्थानावर गुंतवणूकदार असतात. फंड स्पॉन्सर : एखादा म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्याच्या आधी स्पॉन्सर्सनी सेबीकडे नोंदणी करायची असते. यासंदर्भात सेबीने नियमावली दिलेली आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ अर्थकारणात व आर्थिक व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपन्यांनाच हा व्यवसाय सुरू करता येतो.

ट्रस्टी (विश्वस्त) : सेबीने परवानगी दिल्यानंतर चार विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. यापैकी दोन तृतीयांश हे स्वायत्त असतात. म्हणजेच त्यांचा स्पॉन्सरशी संबंध नसतो. म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ट्रस्टीची नेमणूक केलेली असते.

अॅसेट मॅनेजमेंट कंपनी : सेबीने हिरवा कंदील दिल्यानंतर अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आपले प्रत्यक्ष काम सुरू करते आणि फंड मॅनेजर किंवा निधी व्यवस्थापकाची नेमणूक करते आणि व्यवसायाला सुरुवात होते.

कस्टोडियन : म्युच्युअल फंडाने विकत घेतलेल्या सिक्युरिटी व समभाग सांभाळण्याचे काम यांचे असते. त्यांचा निधी व्यवस्थापनात सहभाग नसतो.

फंड मॅनेजर (निधी व्यवस्थापक) : एखाद्या म्युच्युअल फंडाच्या यशासाठी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे फंड मॅनेजर. सनदी लेखापाल, व्यवस्थापनातील तज्ज्ञ किंवा बाजाराचा दीर्घ काळ अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींकडे फंडाची जबाबदारी दिलेली असते. त्यांच्या दिमतीला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सल्लागारही असतात. हे सल्लागार अर्थव्यवस्था, कंपन्यांचे निकाल, गुंतवणूक करण्यास अनुकूल क्षेत्र, संभाव्य धोके यांचा अभ्यास करून निधी व्यवस्थापनाविषयी सल्ला देतात. कोणत्या योजनेमध्ये किती आणि कसे पैसे गुंतवायचे, याचा अंतिम निर्णय फंड मॅनेजरचा असतो.

ट्रान्सफर एजंट : म्युच्युअल फंड कंपनी आणि गुंतवणूकदार यांचा संबंध ट्रान्सफर एजंटच्या मार्फत येतो. म्हणजेच गुंतवणूकदारांनी भरलेले फॉर्म स्वीकारण्यापासून त्यांची स्टेटमेंट तयार करणे, के.वाय.सी. (Know Your Client) डेटा सांभाळणे, गुंतवणूकदाराला त्याच्या सर्व गुंतवणुकी विषयीची माहिती देणे हे काम यांचे असते.

ऑडिटर्स (लेखापरीक्षक) : म्युच्युअल फंड ज्या ज्या योजना लोकांना खुल्या करतो, त्यातील सर्व संबंधित खात्यांची माहिती सेबी (SEBI) आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार आहे की नाही, याची छाननी लेखापाल करतात.

म्युच्युअल फंडाचे प्रकार : सध्या दीड हजारांपेक्षा अधिक म्युच्युअल फंडाच्या योजना आपल्याकडे अस्तित्वात आहेत. त्यांचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे –

ओपन एन्डेड योजना : गुंतवणूकदार या योजनेत केव्हाही पैसे गुंतवू शकतो व केव्हाही त्याच्या गरजेनुसार फंडातील युनिट्स विकून आपले पैसे काढून घेऊ शकतो.

डेब्ट फंड : सरकारी कर्जरोखे, कंपन्यांचे बॉन्ड्स अशा कमी जोखीम असलेल्या व कमी परतावा असलेल्या पर्यायांमध्ये डेब्ट फंड किंवा इन्कम फंड पैसे गुंतवतात.

हायब्रीड फंड : इक्विटी फंडातून मिळणारी परताव्याची शक्यता अधिक असते, पण धोकासुद्धा त्यामानाने अधिक असतो. तर डेब्ट फंडातून परतावा कमी मिळतो व धोकासुद्धा कमी असतो. या दोघांचे फायदे एकत्र करून जी योजना बनते, ती हायब्रीड योजना म्हणजेच ६० टक्‍क्‍यांपर्यंत पैसे इक्विटी शेअर्समध्ये आणि उरलेले पैसे डेब्ट किंवा रोख्यात गुंतवले जातात.

हे लक्षात ठेवा :
म्युच्युअल फंड इक्विटी प्रकारचा असेल तर त्यात कमीत कमी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे गुंतवणूक करत राहा, तरच त्यात समाधानकारक परतावा मिळेल. ज्यांनी १५ ते २० वर्षे सतत इक्विटी फंडात गुंतवणूक केलेली आहे, त्यांचे पैसे कित्येक पटींनी वाढलेले आपल्याला दिसतात. दीर्घ काळात संपत्ती निर्मितीसाठी इक्विटी फंड आदर्श ठरतात. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर डेब्ट किंवा हायब्रीड फंडात पैसे गुंतवा, यामध्ये परतावा जरी कमी असला तरी जोखमीची तीव्रतासुद्धा कमी असते. Net Asset Value (NAV) जास्त म्हणजे फंड महाग आणि Net Asset Value (NAV) कमी म्हणजे फंड स्वस्त असे नाही. जर तुमची एनएव्ही कमी असेल तर तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात व जसे येणे वाढेल तशी तुमची गुंतवलेली रक्कमसुद्धा वाढते. तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता, त्यात पैसे गुंतवण्याचे नियम सेबीने आखून दिलेले असतात. त्यामुळे फंड मॅनेजर त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार नियम डावलून गुंतवणूक करू शकत नाहीत. तुमचे गुंतवलेले पैसे व त्याच्याशी संबंधित जोखीम ही शेअर बाजारात आणि रोखे बाजारात होणारी उलाढाल यांच्याशी संबंधित असते. म्युच्युअल फंडात कधीही परताव्याची हमी दिली जात नाही, त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील उद्भवणाऱ्या जोखमीच्या (Risk) अधीन असते. तुम्ही जी म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीसाठी निवडणार आहात, त्याचा मागच्या तीन ते पाच वर्षांतील इतिहास कसा आहे, त्याने कसा परतावा दिला आहे आणि आणि तो फंड कोण सांभाळत आहे, त्या फंड मॅनेजरचा मागील योजना सांभाळण्याचा अनुभव कसा आहे, तो सांभाळत असलेल्या दुसऱ्या योजनांनी कसा परतावा दिला आहे याची माहिती तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून घेऊन मग गुंतवणूक करायला हरकत नाही. शेवटी आपलाच पैसा असल्याने विचारही आपणच करायला हवा! पोस्ट ऑफिस, बँका इथे पैसे ठेवण्याने आपल्याला जितका परताव्याचा दर मिळतो त्यापेक्षा बराच चांगला परतावा मागच्या दहा ते पंधरा वर्षांत फंडांनी दिला आहे. पण म्हणून सगळी गुंतवणूक एकाच म्युच्युअल फंडाच्या योजनेत करणे हे योग्य नाही. तुमचा पोर्टफोलिओ विविध योजना तसेच पारंपरिक व आधुनिक स्वरूपाच्या गुंतवणुकीचा हवा, मात्र त्यात म्युच्युअल फंड महत्त्वाची भूमिका नक्कीच बजावेल!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


निमेश केनिया

(लेखक अनुभवी गुंतवणूक सल्लागार आहेत.)
रूपांतर : कौस्तुभ जोशी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.