भल्या | A few Good Men | the prince niccolò Machiavelli | the prince Machiavelli | the prince Niccolo Machiavelli | Indian Diplomat | how to be a good human being 

भल्या माणसासाठी | ज्ञानेश्वर मुळे | For a Good Man | Dnyaneshwar Mulay

भल्या माणसासाठी

राजाराम जोशी… एक ‘भला माणूस’. कष्टाळू, प्रामाणिक व साधा, मध्यमवर्गीय नोकरदार. त्याच्याच चाळीतील संध्यावर त्याचे (विशेष करून मराठी मध्यमवर्गीयात असते तसे ‘गुप्त’) प्रेम होते. ‘सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची’ ही त्याची मानसिकता. दरम्यान बाशू हा छान राहणारा, सहज कोणत्याही विषयावर बोलणारा राजारामचा मित्र त्याला भेटायला येतो काय, आपला प्रभाव पाडतो काय आणि थोड्याच अवधीत संध्याला आपलेसे करतो काय! बाशू मग राजारामच्या कंपनीतही शिरकाव करतो. पुढे बाशूचे आणि संध्याचे लग्न होणार असते, त्याच दिवशी तो गायब होतो. कारण त्याच्या भानगडी उघड्या पडलेल्या असतात. इकडे भला माणूस राजाराम ‘मोठ्या’ मनाने संध्याला स्वीकारतो. सई परांजपे दिग्दर्शित ‘कथा’ या चित्रपटातील राजाराम आणि बाशू हे आधुनिक ससा आणि कासव. कासवाचा म्हणे शेवटी विजय होतो, पण हा विजय जीवनातील अनेक लढाया हरल्यानंतर, वैयक्तिक त्यागाची मोठी किंमत देऊन मिळालेला… एका अर्थाने पराजयापेक्षा फार वेगळा नाही!

अशीच काहीशी कथा आहे बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’तील संजय, दीपा आणि नवीन या त्रिकूटाची. मुंबईतील नवीनमुळे हातातून निसटून जाणारी दीपा सिनेमाच्या शेवटी संजयकडे पुन्हा येते. ‘भला माणूस’ संजयची मनोकामना पूर्ण होते, पण तडफडीनंतरच. अगदी असाच एक ‘भला माणूस’ बासूदांच्याच ‘छोटीसी बात’मध्ये अरुणच्या रूपात भेटतो. बासूदांच्या या चित्रपटांतील भल्या माणसाची थोडीशी का होईना प्रगती ‘छोटीसी बात’ मध्ये दिसते. प्रत्यक्ष जीवनात मात्र भली माणसे गोंधळलेली, दिशा बदलणारी, ‘भय इथले संपत नाही’चे गीत गुणगुणणारी, प्रत्येक विषयावरचे मत कुणी ऐकणार नाही अशा पद्धतीने बोलणारी, सावध, पापभीरू, बहुधा अयशस्वी किंवा काही अंशी माफक यशस्वी. अशी माणसे या जगात लाखोंनी भरलेली आहेत. ही माणसे सुशिक्षित-अशिक्षित, ग्रामीण- शहरी, देशी-विदेशी, गरीब-श्रीमंत अशा सर्व रूपांत सर्व ठिकाणी असतात. ‘दिसते तसेच असते,’ असा या माणसांचा समज. ही माणसे रांगेत थांबण्याचा प्रयास करतात. पण संधी मिळाली तर कुणी पकडणार नाही, अशी खात्री वाटल्यावर रांग बदलतात. शासन, राज्यकर्ते, रस्ते, भ्रष्टाचार, बॉस, घरगुती कटकटी, प्रदूषण सर्वांविषयी तक्रारी करतात. मात्र मोर्चे, दंगे, निषेध अशा गोष्टींपासून शक्यतो दूर राहतात. अधूनमधून समाजकार्याची हुक्की येते, पण ती फक्त हुक्कीच असते. परिवर्तनाच्या भावनेने पेटून कधीमधी मतदानाला जातात, एरवी मात्र मतदानाच्या दिवशी सहपरिवार सहलीला जातात.

या भल्या माणसाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ‘किलिंग इन्स्टिंक्ट’चा वा ‘तोडू किंवा फोडू’ या वृत्तीचा अभाव. प्रामाणिकपणाचा, शिस्तीचा व सचोटीचा ‘दंश’ ह्यांना आयुष्यभर पुरतो. अशा व्यक्ती सरसेनापती होऊ शकत नाहीत. पंतप्रधान, मुख्यमंत्री, सीईओ, उद्योजक, मीडिया बॅरन, स्टील टायकून, टोबॅको किंग, टेक जायंट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, क्रिकेटचे कप्तान, ऑईल मॅग्नेट, वाळू तस्कर, अंडरवर्ल्ड डॉन, किंगपिन, शोगून, बॅरन, सुल्तान, बादशाह, झार, फिल्म मोगूल एवढेच काय जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सरपंचही होऊ शकत नाही. ‘भले’ असणे आणि ‘यशस्वी’ असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच भल्या माणसाकडे थोडी तरी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही स्फूर्ती असली पाहिजे आणि लढाई म्हणजे डावपेच, व्यूहरचना, शह-काटशह-प्रतिशह, मागून वार, यशस्वी माघार, लूटमार, दहशत, खंडणी, कधी अचानक हल्ला तर कधी पूर्ण तयारीनिशी, तोडा व फोडा, साम-दाम-दंड-भेद, वाटाघाटी, राजनीती, ‘ध’ चा ‘मा’, सत्तापालट, कट, कडेलोट, अंधारकोठडी, फसवणूक, गनिमी युद्ध, घरभेदीपणा या व इतर अनेक संज्ञांचा परिचयच नव्हे तर त्यांच्या वापराचे सखोल ज्ञानही असायला हवे. या सर्वांचे अंतिम ध्येय सत्ताप्राप्ती व राज्यसूत्र हे असले पाहिजे.

निकोलो मॅकीवॅली या इटालियन राजनीतिज्ञानेद प्रिन्स’ नावाच्या सन १५१३ मध्ये लिहिलेल्या आपल्या पुस्तकात ‘राजा’ होऊ इच्छिणाऱ्या ‘भल्या’ लोकांना मार्गदर्शन करताना हेच आपल्या भाषेत सांगितले आहे. या पुस्तकाला ‘राजकीय तत्त्वज्ञानाचा पहिला आधुनिक प्रबंध’ मानला जातो. ‘मॅकीवॅलियन’ हा शब्दप्रयोग या लेखकामुळेच इंग्रजीत रूढ झाला. साधनांपेक्षा साध्य महत्त्वाचे, हा संदेश या पुस्तकात ठळकपणे मांडला आहे.
‘आपण जे करायला हवे त्या तुलनेत काय केले याकडे दुर्लक्ष करणारा माणूस संरक्षणाऐवजी विनाशाकडे जातो,’
हे तो प्रभावीपणे सांगतो. मॅकीवॅलीचे काही विचार भल्या माणसांनी चिंतन करावे असे आहेत :
१. इतरांना तुमच्याविषयी भीती आणि प्रेम दोन्ही वाटणार नसेल, तर भीती वाटणे चांगले.
२. राजकारण व राजनीतीचा नैतिकतेशी संबंध नाही.
३. आकांक्षा मोठ्या असतील, तर समस्या मोठ्या असू शकत नाहीत.
४. ज्याला अधिकार हवा असेल, त्याला अधिकार गाजवता आला पाहिजे.
५. राज्यकर्त्यांच्या बुद्धिमत्तेची पहिली कसोटी त्याच्या आजूबाजूच्या सल्लागारांवरून कळते.
६. एखाद्याला जखम करायची असेल तर इतकी गंभीर करा की ती व्यक्ती सूड घेईल, अशी भीती आपल्याला उरता कामा नये.
७. माणसे ‘भली’ असतात आणि दररोजच्या जीवनात एवढी गुंतलेली असतात की फसव्या माणसाला बळी पडू इच्छिणाऱ्यांची कधीच कमतरता नसते.
८. कोणतीही योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूपासून गुप्त ठेवली जाते.
९. सशस्त्र प्रेषित नेहमीच यशस्वी झाले आहेत आणि निःशस्त्र प्रेषित सदैव नष्ट झाले आहेत.
१०. कोणत्याही राजाला आश्वासनांची पूर्ती न करण्यासाठी किंवा वचन मोडण्यासाठी सबबींचा तुटवडा पडत नाही.

हा झाला मॅकीवॅलीचा भल्या माणसांना उपदेश. प्रत्यक्ष जीवनात अत्यंत मग्रूर, कावेबाज माणसे यशस्वी होताना आणि गुणी माणसे मागे पडताना आपण नेहमीच पाहतो. हे कालचे, आजचे आणि उद्याचेही ‘सत्य’ असणार आहे. मग प्रश्न असा पडतो की आपण सर्वांनी धूर्त, कावेबाज, धोरणी, चतुर झाले पाहिजे का? याचे उत्तर गांधीजींच्या जीवनात फार सुंदररीत्या सापडते. गांधीजींनी एका बाजूला सत्य, अहिंसा, जनसेवा, उपोषण, सत्याग्रह, खादीचा वापर, कपड्यांचा (पंचा सोडल्यास) त्याग या गोष्टींनी जनसामान्यात अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवली. दुसरीकडे राजकारणात नसतानाही काँग्रेसचे सर्वोच्च नेता आणि ‘किंगमेकर’ झाले. यानंतरचा खरा प्रश्न उठतो तो हा की, आजच्या या लोकशाहीच्या काळात भल्या माणसांनी काय करावे? त्यांनी असहाय्यपणे जगायचे की संवेदनशून्य व अप्पलपोट्या राजकारण्यांच्या भिक्षेवर जगायचे? परिवर्तनाचा काही सोपा मार्ग सर्वसामान्यांसाठी मोकळा आहे का? ही समग्र अनर्थाची लाट भल्या माणसाने कशी परतवायची? लोकशाही एका अर्थाने खूप समर्थ शस्त्र आहे, पण जगभरचा सध्याचा प्रवाह लोकशाहीतील लोकप्रियतेचा वापर करून एकाधिकार प्रस्थापित करण्याच्या बाजूचा आहे. लोकशाहीला अभिप्रेत असलेले उत्तम विधिमंडळ, न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ प्रत्यक्षात कसे आणायचे? कारण या तिन्ही संस्था स्वच्छ, कार्यक्षम, प्रामाणिक शिवाय सदसद्विवेक कायम ठेवून स्वतंत्र प्रज्ञेने काम करणाऱ्या नसतील, तर लोकशाहीचे अधःपतन अटळ आहे.

यावर एखाद्याच्या सदसद्विवेक बुद्धीतून आलेला विचार म्हणजे भलेपणा न सोडता विचारपूर्वक आपण एका नव्या सुधारक चळवळीचा पाया रचणे आवश्यक आहे. महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे यांनी तत्कालीन समाजात जागृती व नवचेतना आणली. आता या नव्या वैधीकरणाच्या युगात भल्या माणसांच्या दर पाच वर्षांनी मतदान करण्याच्या अधिकारातून एक नवी सर्वसमावेशक आणि सर्वंकष चळवळ उभी करता येईल – ‘चांगुलपणाची चळवळ’! प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणा हेच संपूर्ण समाजाचे खरे बळ आहे आणि या चांगुलपणाला प्रोत्साहन देऊन त्याला समाजपरिवर्तनाची ऊर्जा बनवणे शक्य आहे. हा विचार संपूर्णपणे संविधान संभव आणि लोकशाहीच्या संकल्पनेत व्यवस्थित बसणारा आहे. काय असेल या चांगुलपणाच्या चळवळीचा निष्कर्ष? एक उत्तम विधिमंडळ, न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ. उत्तम व्यक्तींना पक्षातीत विचार करून निवडून देणे, हे पहिले पाऊल. त्यानंतर न्यायिक आणि प्रशासकीय सुधारणांचा पाठपुरावा करणे. विधिमंडळ जर समाजातले जे जे ‘उत्तम’ लोक आहेत त्यांनी भरले, तर आपोआप कार्यकारी मंडळ आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी नोकरशाही देशाला एका वेगळ्या द्वेषरहित प्रागतिक रस्त्यावर नेऊ शकेल. परिणामी, ‘जे जे उत्तम, उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ ही सावरकरांची दृष्टी प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोरांच्या ‘निर्भय मन आणि उन्नत मान’ हे गीतांजलीतले
भारताचे चित्र प्रत्यक्षात जगायला मिळेल. भल्या माणसांनी धूर्त व्हायची गरज नाही, पण ‘शहाणे’ नक्कीच व्हायला हवे. मग राज्य तुमचेच आहे !

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्ञानेश्वर मुळे
[लेखक माजी राजदूत, निवृत्त सचिव (भारत सरकार) आणि विचारवंत आहेत.]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.