September 15, 2024
गुंतवणूक | Retirement Planning | Pension Plan | Retirement Tips | Pension Planning | Financial Planning | Top Retirement Tips | Retirement Investment Plan | Pension savings

निवृत्ती योजनांच्या नावाखाली होणारी लूट | तृप्ती राणे | Financial Planning

निवृत्ती योजनांच्या नावाखाली होणारी लूट

सर्वसाधारणपणे नोकरदार वर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा येतो, तो रिटायरमेंटच्या वेळी. अचानक जास्त पैसा हातात आल्यामुळे आणि पुढचा नियमित पगार बंद होणार या भीतीने ग्रासल्यामुळे अशा निवृत्त व्यक्तींना योग्य गुंतवणूक मार्गदर्शनाची खरी गरज असते. परंतु नेमक्या याच व्यक्ती चुकीच्या सल्ल्यामुळे फसवल्या जाण्याची शक्यता असते.

निवृत्तीनंतर नियमित पगार येणे बंद होते किंवा खर्चाला साजेशी पेन्शन नसते. शिवाय, कधी कधी निवृत्तीनंतर मोठे खर्च असतात, जसे की मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्नकार्य, घरातील मोठी डागडूजी इत्यादी. त्यात बऱ्याचदा जोखीम घ्यायची मानसिक किंवा आर्थिक क्षमतासुद्धा कमी झालेली असते. अशा वेळी काही वरिष्ठ गुंतवणूकदार हमीचे परतावे हवे असा हट्ट धरतात. मग त्यांना जास्त जोखीम असलेले बाँड विकले जातात. अजून एक गोष्ट अशा गुंतवणूकदारांच्या डोक्यात असते आणि ती म्हणजे कर वाचवणे. म्हणून असे गुंतवणूकदार मग ‘युलिप’ आणि ‘विमा’ घेतात. आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना ‘मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स’, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर काहींना म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भुरळ पाडतात. त्यात जर एजंट, वितरक किंवा सल्लागार हा परिचयाचा किंवा नात्यातला असेल, तर मग ‘नाही’ म्हणणे जड होते. या सगळ्यामुळे निवृत्तीपश्चात चुकीचे पर्याय निवडले जातात. बरेच कमी वरिष्ठ गुंतवणूकदार माहिती काढून, कागदपत्रे वाचून, चार लोकांकडे चौकशी करून आणि गुंतवणुकीतील खाचखळगे समजून पैसे घालतात. बाकीच्यांच्या बाबतीत मात्र सगळा ‘‘विश्वासाचा’’ खेळ होतो – आधी एजंटवर आणि मग देवावर! ही लूट जर थांबवायची असेल, तर खालील नमूद केलेले नियम नेहमी ध्यानात ठेवा :

१. तुमचा पैसा ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे तुमचे निर्णय जाणीवपूर्वक घ्यायला हवे. मनात शंका असल्यास तिचे संपूर्ण निरसन झाल्याशिवाय गुंतवणूक करू नका.

२. निवृत्तीच्या आधीच आपला आर्थिक आराखडा तयार करा. आज आयुर्मान वाढत आहे आणि त्याबरोबर आरोग्य व राहणीमानाचे खर्चसुद्धा. पुढच्या तीस-पस्तीस वर्षांमधील मिळकत आणि खर्चाचा हिशोब आधीच घाला आणि त्यानुसार कोणती गुंतवणूक करायची हे ठरवा.

३. ध्येयाच्या कालावधीनुसार गुंतवणूक करा. सगळेच पैसे सुरक्षित हवे, असे म्हणून बँकेत किंवा पोस्टात ठेवू नका. याउलट म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात परतावे जास्त मिळतील, या अपेक्षेने सगळेच पैसे तिथेही नको.

४. गुंतवणुकीचा पर्याय निवडताना चार मापदंड लक्षात ठेवा : रोकड सुलभता (द्यद्बह्नह्वद्बस्रद्बह्ल४), परतावे (ह्म्द्गह्लह्वह्म्ठ्ठह्य), जोखीम (ह्म्द्बह्यद्म) आणि कर कार्यक्षमता (ह्लड्ड३ द्गद्धद्धद्बष्द्बद्गठ्ठष्४). यातील कुठल्याही एकाच गोष्टीवर भर देऊ नका.

५. फक्त कर लागत नाही म्हणून युलिप किंवा महागडी विमा पॉलिसी काढू नका.

६. निवृत्तीच्या आधी दहा वर्षे आणि निवृत्तीनंतर कोणतेही मोठे कर्ज घेऊ नका.

७. एक चांगले आरोग्य विमा कव्हर घ्या. आपल्या देशात आरोग्यासाठी होणारा खर्च इतर खर्चांपेक्षा अधिक पटीने वाढत आहे. बेस पॉलिसी आणि सुपर टॉप-अपची नीट सांगड घालून वाजवी प्रीमियममध्ये तुमच्या गरजा भागतील, याकडे लक्ष असू द्या.

८. आपली जोखीम समजून त्यानुसार निवृत्ती नियोजन गुंतवणूक करा. दुसऱ्याने केली म्हणून नको.

९. कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याच्या विशेष गरजा असतील, तर तुमचे आणि तुमच्या पश्चात त्या व्यक्तीचे आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे.

१०. निवृत्तीच्या आसपासचा काळ भावनिक असतो आणि म्हणून कधीतरी व्यवहाराचा विसर पडून तोटा होण्याची शक्यता असते. तेव्हा तुमची खरी गरज ओळखा. मुलांसाठी संपत्ती ठेवण्याआधी तुमच्या गरजा भागवा.

११. एखादा चांगला, अनुभवी आणि प्रमाणित सल्लागार जवळ बाळगा. तुमचा निर्णय योग्य का अयोग्य, हे तो तुम्हाला पटवून देऊ शकतो.

१२. तुमच्या गुंतवणुकींचा आढावा वेळोवेळी घेऊन गरजेनुसार त्यात बदल करा. जवळ असलेल्या ध्येयासाठी जास्त जोखमीची गुंतवणूक बंद करून, दुसरा कमी जोखमीचा पर्याय निवडा.

१३. वाचा, चौकशी करा, प्रश्न विचारा, गुंतवणुकीतील खाचखळगे नीट समजून घ्या आणि पूर्ण समाधान झाल्यावरच पैसे गुंतवा.

१४. एवढे करूनही जर एखाद्याने तुम्हाला फसवले, तर योग्य ठिकाणी तक्रार करा. गुंतवणूक करताना ही चौकशी आधी करायची असते.

१५. तुमच्या सगळ्या गुंतवणुकींचा तपशील व्यवस्थित ठेवा आणि एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे त्याची माहिती असू द्या.

१६. इच्छापत्र आणि नामनिर्देशन करायलाच हवे. तसे न केल्यास, नंतर कौटुंबिक वाद होण्याची शक्यता वाढते.

आपल्याकडे निवृत्ती नियोजन नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात किंवा निवृत्त झाल्यानंतर करण्याची पद्धत पाहायला मिळते. मग अशा वेळी सुरू होते, ती हातात असणाऱ्या पैशांची भविष्यात होणाऱ्या खर्चांबरोबर जुळवाजुळव. त्यात जर पुरेसा आरोग्य विमा नसेल, तर मग खर्च भागवणे खूपच कठीण होते. यामुळे बऱ्याच जणांसाठी निवृत्ती म्हणजे आर्थिक आणि भावनिक तडजोड हेच समीकरण होऊन बसते! तथापि निवृत्ती नियोजन हे साठी (६०) जवळ आल्यावर करायची गोष्ट नसून त्याची तयारी विशी-तिशीपासूनच सुरू करावी. साधारणपणे एवढा दीर्घ काळ जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही तुमच्या गरजांना आणि राहणीमानाला साजेशी अशी संपत्ती घडवू शकता. आर्थिक नियोजन विशी-तिशीपासून केल्याने तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त वेळ असतो आणि कमी वयात जोखीम झेलायची क्षमतासुद्धा जास्त असते. मग तुम्हाला रोखे, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता, समभाग व इतर पर्यायांची योग्य पद्धतीने सांगड घालता येईल. अशा प्रकारे एक चांगला पोर्टफोलिओ तयार झाला, तर त्याचा आनंद तुम्ही चिरकाल घेऊ शकाल. शेवटी पैसा तुमचा, खर्च तुमचे, जोखीम तुमची, निर्णय तुमचे आणि आनंदसुद्धा तुमचाच!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


तृप्ती राणे (सीए)

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.