आवळा | organic india amalaki | fresh amla fruit | amla fruit | gooseberry amla | vitamins in amla | phyllanthus emblica | organic india amla | amla indian gooseberry

आवळ्याचे माहात्म्य | डॉ. वर्षा जोशी | The greatness of Amla | Dr. Varsha Joshi

आवळ्याचे(आवळा) माहात्म्य

आवळा दिसायला एवढासा, चवीला आंबट-तुरट पण आश्चर्यकारक अशी पोषणमूल्ये त्यात आहेत. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यातल्या औषधी गुणांमुळे त्याला ‘सुपरफ्रूट’ असे म्हटले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या च्यवनप्राशमध्ये मुख्यत्वे करून आवळ्याचा गर वापरला जातो. त्रिफळा चूर्ण या आयुर्वेदिक औषधात सावलीत वाळवलेला ताजा आवळा म्हणजे आवळकाठी असते.

आवळा ‘क’ जीवनसत्त्वाने इतका परिपूर्ण असतो, की साधारण १०० ग्रॅम आवळ्यात २० संत्र्यांएवढे ‘क’ जीवनसत्त्व असते. हे जीवनसत्त्व उच्च अँटीऑक्सिडंट असल्याने शरीराला त्याचा विविध प्रकारे उपयोग होतो‧ मुख्य म्हणजे यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्यामध्ये विरघळणारा आणि न विरघळणारा असा दोन्ही प्रकारचा चोथा असतो. विरघळणाऱ्या चोथ्यामुळे रक्तामध्ये साखरेचे शोषण हळूहळू होते आणि रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही. यासाठी आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिनचाही उपयोग होतो. यामुळे इन्सुलिनचे शोषण चांगले होते. याचा मधुमेहींना फार फायदा होतो. आवळ्यातील न विरघळणाऱ्या चोथ्याचा फायदा मलोत्सर्जनासाठी होतो. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर व्हायला मदत होते. आवळ्यामध्ये असणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाचा फायदा नेत्ररोग दूर होण्यास होतो. दृष्टी सुधारण्यास तसेच, वृद्धांमध्ये निर्माण होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास यामुळे मदत होते. आवळ्यामधील काही रसायनांमुळे मेंदूचे आरोग्य सुधारते, स्मरणशक्ती वाढते. काही संदर्भाप्रमाणे आवळ्यातील ‘क’ जीवनसत्त्वाचा फायदा विस्मरणाच्या व्याधीवर होऊ शकतो. तर दुसऱ्या एका संदर्भानुसार आवळ्यात प्रचंड प्रमाणात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट रसायनांमुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो. या रसायनांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. सर्दी, खोकला, ताप, ताण या समस्यांवर तसेच, केस आणि त्वचा यासाठीही त्यांचा उपयोग होतो.

आवळ्यामधील रसायने यकृताचे संरक्षण करतात आणि यकृताची हानी होऊ देत नाहीत. अंतर्दाह कमी करतात. कावीळ झालेल्या रुग्णांना आवळ्याच्या रसाबरोबर इतर काही औषधे दिल्यावर गुण आला, असे आढळून आले आहे. लोहाच्या  कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते आणि अॅनेमियासारखा आजार होतो‧ अशा वेळी लोहाच्या गोळ्या घेतल्या, तरी पुरेसे ‘क’ जीवनसत्त्व पोटात न गेल्याने लोहाचे पुरेसे शोषण शरीरात होत नाही. आवळ्यामधील भरपूर लोहाचा आणि ‘क’ जीवनसत्त्वाचा यासाठी फार उपयोग होतो. आवळ्याच्या रसामुळे शरीरात लोहाचे शोषण १९ पटीने वाढले, असे आढळले आहे. आवळ्याच्या फळांप्रमाणे त्याच्या बियांचा आणि फुलांचाही उपयोग औषधासाठी केला जातो. अस्थमा आणि ब्राँकायटीससारख्या दुखण्यांवर इलाज म्हणून आवळ्याच्या बिया वापरल्या जातात, तर फुलांचा उपयोग बद्धकोष्ठावर इलाज म्हणून केला जातो. आवळ्यामध्ये दोन प्रकार असतात. मोठा आवळा, जो औषधी असतो. त्याला डोंगरी आवळा असेही म्हणतात. तो चवीला तुरट लागतो. पण गंमत म्हणजे हा आवळा खाल्ल्यावर पाणी प्याले तर ते गोड लागते. दुसरा प्रकार म्हणजे रायआवळा. हा आकाराने लहान आणि चवीला अगदी आंबट असतो. याचा मुरांबा किंवा लोणचे बनवतात, पण तो औषधी म्हणून वापरला जात नाही.

शिजविणे किंवा वाळविणे या प्रक्रियेत पदार्थामधील ‘क’ जीवन-सत्त्वाचा नाश होतो, पण आवळा याला अपवाद आहे. कोणत्याही प्रक्रियेत त्याच्यातील ‘क’ जीवनसत्त्वाचा नाश होत नाही किंवा झालाच तरी अगदी कमी होतो. याला कारण त्यातील टॅनिन ही रसायने होय, जी ‘क’ जीवनसत्त्वाला बांधून ठेवून त्याचा नाश होऊ देत नाहीत. म्हणूनच मुरांबा, लोणचे, च्यवनप्राश या सर्वांमध्ये आवळा शिजवलेला किंवा उकडलेला असतो, आवळकाठीमध्ये तो सावलीत वाळवलेला असतो, आवळ्याच्या सुपारीत वाळवलेला असतो तरीही हे पदार्थ ‘क’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण असतात.

आवळ्याचा मोरावळा (मुरांबा) पित्तावर औषध म्हणून हितकारक आहे. आवळ्याची विविध प्रकारची लोणची आपल्या देशात सगळीकडे बनवली जातात. आवळ्याचा रस काढून तो सरबतात, स्मूदीमध्ये वापरला जातो. आवळा कँडी तर प्रसिद्ध आहेच. आवळा उकडून किसून त्यात तिखट, मीठ, आले, जिरेपूड, गूळ घालून सर्व साहित्य एकत्र करून त्यावर हिंगाची फोडणी घातली, की उत्तम चटणी तयार होते. आवळ्याच्या फोडी फोडणीला टाकून शिजवून तिखट, मीठ, गूळ घालून छान भाजी होते. आवळा किसून फोडणीला टाकून, परतून, शिजवून, तिखट, मीठ घालून शिजवलेल्या बासमती तांदळाच्या भातात एकत्र केला, की आवळाभात तयार होतो. आवळा किसून त्यात आले किसून व साखर घालून एक वेगळाच मुरांबा तयार केला जातो.

डॉ. शरदिनी डहाणूकर या नावाजलेल्या स्त्री-रोगतज्ज्ञ आणि आयुर्वेदात संशोधन केलेल्या डॉक्टर आता आपल्यात नाहीत, पण आवळ्याचे महत्त्व त्यांनी एका वाक्यात सांगितले आहे. त्या म्हणत असत, की ‘पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर जायचे असेल आणि एकच झाड बरोबर न्यायचे असेल, तर त्या आवळ्याचे झाड निवडतील.’

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. वर्षा जोशी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.