भांडी | kitchen | utensils | kitchen accessories | kitchen utensils | cooking utensils

भांड्यांच्या दुनियेत | शुभा प्रभू साटम | In the world of Utensils | Shubha Prabhu Satam

भांड्यांच्या दुनियेत

भांडी’ हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. माणसांच्या गरजेनुसार या भांड्यांमध्ये विविधता येत गेली. प्राचीन काळी भाजलेली मातीची भांडी वापरली जात. हळूहळू त्यांची जागा तांबा, पितळ, बिड, लोखंड या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांनी घेतली. कालांतराने या धातूच्या भांड्यांची निगा राखणे कटकटीचे ठरू लागल्याने हळूहळू ही भांडी अडगळीत गेली आणि त्यांची जागा स्टील, प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांड्यांनी घेतली. मात्र, गेल्या काही वर्षांत आहारातून तेल बाद न करण्याचे संशोधन समोर आले. तूप, खोबरे, कच्च्या घाणीचे तेल यांना जागतिक स्तरावर आरोग्यदायी मानले गेले. दुसरीकडे प्लास्टिक वापरामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती झाली. याचा परिणाम म्हणून अडगळीत गेलेली जुनी भांडी स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळवू लागली. ही भांडी खरेदी करताना आणि त्यांची निगा राखताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

मातीची भांडी

* बाजारात अनेक दुकानांमध्ये मातीची भांडी, तवे, कढई विक्रीसाठी उपलब्ध असतात. पण, खात्रीच्या ठिकाणाहूनच अशा भांड्यांची खरेदी करावी. मातीची भांडी सच्छिद्र असल्याने त्यात अन्न अथवा खरकटे अडकून राहू शकते. त्यामुळे फार बारीक नक्षीची भांडी घेऊ नयेत.

* अन्न शिजवण्यासाठी मातीचे भांडे प्रथम सिद्ध करावे लागते. त्यासाठी भांडे जवळपास २४ ते ३० तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवावे. काही ठिकाणी तांदळाच्या / भाताच्या पाण्यात ही भांडी बुडवून ठेवली जातात. भांडे पाण्याबाहेर काढल्यानंतर पूर्ण कोरडे होऊ द्यावे. खडखडीत सुकायला हवे, त्यासाठी भांडे साध्या कागदात पूर्ण लपेटून ठेवावे (वर्तमानपत्राचा कागद वापरू नये) अथवा साध्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवावे.

* मातीच्या भांड्यात तेल किंवा तूप घालून मगच गॅस सुरू करावा, अन्यथा भांडे तडकू शकते.

* अन्य भांड्यांच्या तुलनेत मातीची भांडी नाजूक असल्याने अन्न शिजवताना आच प्रखर ठेवू नये.

* मातीचे भांडे धुताना साबणाच्या कोमट पाण्यात बुडवून मग हलक्या हाताने साफ करावे.

* मातीच्या वाडग्यात दही लावत असाल तर ते भांडे धुताना गरम पाण्याचा वापर करा.

* मातीच्या भांड्यात केलेली आमटी किंवा कालवण अतिशय चवदार लागते.

लोखंडाची भांडी

* आजकाल बाजारात प्री-सिजन्ड (pre seasoned) केलेली लोखंडी भांडी मिळतात. त्यामुळे दुकानातून आणल्यावर थेट त्यांचा वापर करता येतो.

* लोखंडी भांडे घेतले, की ते कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन मगच वापरावे.

* लोखंडी भांडी खरखरीत काथ्याने घासून स्वच्छ धुवावीत.

* कोणतेही अन्नपदार्थ शिजवण्या-आधी त्यात थोडे पाणी गरम करावे, जेणेकरून अन्नाचे कण चिकटले असतील तर ते निघून जातील.

* तुम्ही समुद्रकिनारपट्टीजवळ अथवा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी राहत असाल तर वापरात नसणाऱ्या भांड्यांना थोड्या तेलाचा हात लावून, भांडे कागदात लपेटून ठेवावे, म्हणजे त्यावर गंज चढणार नाही.

* किंचित खोलगट तवा असल्यास त्यात भाकरी, चपाती भाजून झाल्यावर भाजी, पिठले वगैरे करता येईल.

* या तव्यावर केलेले डोसे, उत्तप्पे चविष्ट होतात. पहिले काही दिवस डोसे चिकटतात, पण एकदा का भांडे ‘सेट’ झाले, की डोसे चिकटणे बंद होतात. आजकाल लोखंडाचे तवे विविध आकारात मिळतात. असे तवे डोसे, घावन आणि मासे फ्राय करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

दगडी भांडी

* दगडी भांडी दगडातून घडवली जातात. त्यामुळे वजनाला जड आणि महाग असतात, म्हणून ती जपून वापरावी लागतात.

* दक्षिण भारतात सांबर, रस्सम बनविण्यासाठी या भांड्यांचा वापर केला जातो. यात अन्न खूप वेळेपर्यंत गरम राहते.

* दगडी भांडी विकत घेतल्यावर २४ तास पाण्यात बुडवून, कोरडे करून मगच वापरायला सुरुवात करा.

* ह्या भांड्यात तेल किंवा तूप घालून मगच गॅस सुरू करावा. गॅसची आच प्रखर ठेवू नये अन्यथा भांडे तडकू शकते.

* भांडे धुताना कोमट पाणी आणि साबण घालून काही वेळ ठेवून द्यावे. मग स्वच्छ धुवून, कोरडे करावे.

बिडाची भांडी

* बिडाचा तवा प्रथम सिद्ध करून घ्यावा लागतो. त्यासाठी तव्यावर थोड्या तेलावर कांदा परतून घ्या. मग तवा वापरण्यासाठी तयार होतो.

* बिडाची भांडी घासताना काथ्या किंवा लोखंडी चोथा वापरावा.

* तवा वापरात नसल्यास भांड्याला थोडेसे तेल लावून कोरड्या जागेत ठेवावे.

तांब्या-‍पितळेची भांडी

* तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई अतिशय गरजेची असते.

* बाजारात उत्तम दर्जाची आणि भक्कम कल्हई असणारी भांडी मिळतात. एकदाच खर्च करून ही भांडी खरेदी करावीत.

* खूप धूर येईपर्यंत ही भांडी तापवू नये.

* तांब्या-पितळेच्या भांड्यांमध्ये शक्यतो आंबट पदार्थ बनवू नका.

* ही भांडी धुताना फार घासू नयेत, नाहीतर कल्हईचा थर पातळ होऊ शकतो.

* पितळेची कढई अवश्य घ्यावी. रवा, बेसन, शेंगदाणे यांसारखे पदार्थ भाजणे, तूप कढवणे, पुरी-वडे व दिवाळीचा फराळ तळणे यासाठी ही कढई उत्तम.

* बिर्याणी, खिचडी असे मंद आचेवर शिजवावे लागणारे पदार्थ बनवण्यासाठी पितळी भांडी योग्य ठरतात. चहासाठी छोटा पितळी टोप घ्यावा. दूध तापवायला पितळी भांडी चांगली असतात. दूध मंद आचेवर खरपूस तापून निघते.


* लाकडी पळी, उलथणे यामुळे भांड्याला चरे पडत नाहीत. कणीक मळण्यासाठी काठवठ किंवा लाकडी परात घ्यावी. परवडत असेल तर जेवणासाठी तांबे, पितळ, कासे यांच्या थाळ्या, पाणी पिण्यासाठी तांब्या, पेला, पाण्याची बाटली घ्यावी. 

* स्टील हा धातू अधिक टिकाऊ असतो. त्यामुळे घरातील साठवणीचे डबे, टिफीन शक्यतो स्टीलचे घ्यावेत. त्याचा दूरगामी फायदा होतो. खास करून लंच बॉक्स स्टीलचेच घ्यावेत. कोणताही वास अथवा मसाला त्याला चिकटून राहत नाही. ही भांडी कडकडीत गरम पाण्याने धुतल्यास स्वच्छ होतात. 

* नॉनस्टिक अथवा तेल अजिबात लागणार नाही, अशी भांडी अनेक रासायनिक प्रक्रियेने तयार होतात. ही भांडी महाग असतात.

* अॅल्युमिनियमचे भांडे सतत वापरात आले, की गरम झाल्यावर त्यातील घातक रसायने शरीरात जाण्याचा धोका वाढतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– शुभा प्रभू साटम

(लेखिका खाद्यसंस्कृती अञ्जयासक आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.