मांडणी | kitchen makeover

किचनची सुबक मांडणी | रश्मी वीरेन | Neat layout of the kitchen | Rashmi Viren

किचनची सुबक मांडणी

सकाळची अतिशय गडबडीची वेळ… मुलांना शाळा आणि आपल्याला ऑफिसला जाण्याची घाई. घरातील ज्येष्ठांना मॉर्निंग वॉकला जायचे असते अशा वेळी चहाचे आधण गॅसवर ठेवले, पण नेहमीच्या डब्यातील साखर संपलेली असते. साखर काढायला जावे तर ती नेमक्या कोणत्या डब्यात ठेवली आहे तो डबाच सापडत नाही. किती चिडचिड होते अशा वेळी. असे खूपदा होते, की आपण स्वयंपाकघरात कुठल्या तरी डब्यात, कुठल्यातरी कोपऱ्यात एखादी वस्तू ठेवतो आणि ऐन वेळी ती सापडत नाही किंवा अनेकदा एखादे जिन्नस संपले म्हणून आणावे, तर डबे धुंडाळताना ते जिन्नस सापडतात. किचनची योग्य मांडणी केल्यास हा सर्व गोंधळ नक्कीच टाळता येऊ शकतो. त्यासाठी किचनची मांडणी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

गॅसची मांडणी:

* स्वयंपाकघर किंवा किचनची मांडणी करताना महत्त्वाचे असते, ती गॅसची जागा. ओट्याला खिडकी असेल, तर शक्यतो गॅसला हवा लागणार नाही, पण फोडणी किंवा धूर खिडकीद्वारे निघून जाईल, अशा पद्धतीने गॅस ठेवावा.

* ओट्यापासून खिडकी दूर असल्यास गॅस चिमणीचा वापर करावा. जेणेकरून धूर, वास, वाफ शोषली जाऊन प्रकाशाची सोय होते.

* आजकाल एल, सी शेप किंवा समांतर ओट्यांची रचना किचनमध्ये केलेली असते. त्यामुळे शक्य असल्यास गॅस आणि सिंक एकमेकांपासून दूर किंवा विरुद्ध दिशेला राहतील, अशी रचना करावी. त्यामुळे घाईच्या वेळी सिंकमधील, नळाचे पाणी गॅसवरील भांड्यात उडून होणारे अपघात टाळता येतील. (तळताना, फोडणी देताना पाणी उडून भाजले जाण्याची शक्यता असते.) पिण्याच्या पाण्याचे फिल्टर अथवा प्युरिफायर सिंकजवळच असावे.

* मिक्सर, ओव्हन, बीटर, कॉफी मशिन किंवा अन्य विद्युत उपकरणे
ही गॅस व पाण्यापासून दूर राहतील, अशी मांडणी असावी. शक्यतो ही उपकरणे ओट्याजवळ, सॉकेटसह फिक्स केलेली असल्यास सहज वापरता येतात. लहान उपकरणे जसे की बीटर प्रत्येक वेळी कपाटातून काढण्याचा खटाटोप करावा लागत नाही.

* मिक्सर, ओव्हनची भांडी, ओट्यावर जिथे ओव्हन, मिक्सर आहे तेथेच खाली ड्रॉवरमध्ये ठेवलेली असावी. त्याच्या खालच्या ड्रॉवरमध्ये ओव्हनमध्ये करायच्या पदार्थांचे सामान (इसेन्स, फूड कलर, बेकिंग सोडा, चॉकलेट पावडर वगैरे) ठेवावे.

* लहान किसणी, लायटर, भाजी धुण्यासाठीची चाळणी हे ओट्याच्या वरती हूक फिक्स करून अडकवून ठेवल्यास सहज काढता येतात.

* सर्विंग प्लॅटफॉर्म नसल्यास गॅसच्या आजूबाजूची जागा रिकामी असावी जेणेकरून तयार पदार्थांची भांडी उतरवून ठेवता येतील.

ड्रॉवर, वॉल युनिटचा वापर:

* मॉड्युलर किचनमध्ये महत्त्वाचे असतात, ते ड्रॉवर, टॉल आणि वॉल युनिट. गॅसच्या खालच्या जागेत असणाऱ्या ड्रॉवरमध्ये सतत लागणाऱ्या वस्तू ठेवू नये. जसे की ताटे, वाट्या, पातेले, मसाल्याचे डबे. नाहीतर प्रत्येक वेळेला वस्तू घेण्यासाठी गृहिणीला गॅस समोरून बाजूला व्हावे लागते. स्वयंपाकासाठी लागणारी भांडी गॅस खालची जागा सोडून ओट्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये ठेवावीत. जेणेकरून स्वयंपाक करताना गॅससमोरून न हलता ती सहज घेता येतात.

* मसाल्याच्या डब्यासाठी स्वतंत्र ड्रॉवर असावे. त्यातच हिंगाची डबी, दाण्याचा कूट, चिरून ठेवलेल्या गुळाची बरणी, धणे-जिरेपूड, वेलचीपूड किंवा अख्ख्या खड्या मसाल्यांच्या लहान बरण्या, पोळ्या लाटताना लागतो तो पिठाचा लहान डबा ठेवता येतो. तसेच चहा-साखरेचे लहान डबेही ठेवता येतात.

* चमचे, सुऱ्या, डाव, कटर, गाळणी यासारखी कटलरी शक्यतो वरच्या बाजूला म्हणजे तीन किंवा चार ड्रॉवरच्या ओळीतील पहिल्या ड्रॉवरमध्ये ठेवावी. त्याखाली कप, वाट्या, ग्लास, बाऊल यासाठीचे ड्रॉवर असावेत.

* अॅप्रन, भांडी पुसण्याचे नॅपकीन, हात कोरडे करण्यासाठीचे नॅपकीन, टिश्यू पेपर, ओव्हनचे ग्लोव्हज, अॅल्युमिनियम फॉइल, प्लॅस्टिक रॅप यासाठीही स्वतंत्र ड्रॉवर असावा.

* पातेले, कुकरचे डबे, मोठे बाऊल हे एका ड्रॉवरमध्ये ठेवावे. ताट, लहान प्लेट्स,  झाकण्यांची व्यवस्था वेगळी असावी. काचेच्या प्लेट स्टीलच्या ताटांमध्ये ठेवू नयेत.

* ओट्याखालील सर्वात तळाला ट्रॉलीऐवजी कॅबिनेट करून त्यात पिठाचे डबे, मोठ्या प्रमाणात साठवणूक करायचे धान्याचे (उदा. तांदूळ, डाळ, साखर, गहू इत्यादी) डबे, तेलाचा मोठा कॅन, साठवणीचे पापड, शेवया आदींचे डबे ठेवावेत.

* गॅस सिलेंडरच्या कॅबिनेटमध्ये कांदे-बटाट्याची प्लास्टिकची ट्रॉली ठेवता येऊ शकते.

* किचन छोटे असले, तरी गॅसच्या वरच्या बाजूला कधीही वॉल युनिट करू नये, ती जागा कायम मोकळीच असावी. (घाईगडबडीत वस्तू घेताना भाजणे, कपडे पेट घेणे असे अपघात होऊ शकतात.)

* वॉल युनिट करताना गृहिणीच्या उंचीचा विचार अवश्य करावा. क्रोकरीसाठीचे काचेचे वॉल युनिट गृहिणीला त्यातून वस्तू सहज काढता येतील, अशाच उंचीवर असावे. त्यातही वेगवेगळे मग, काचेचे ग्लास, लहान बाऊल अशा नेहमी लागणाऱ्या वस्तू खालच्या कप्प्यात आणि डिनर सेट वगैरे क्वचित लागणाऱ्या वस्तू वरच्या कप्प्यात ठेवाव्या.

* शक्यतो साठवण करायचे जिन्नस किंवा नेहमी न लागणाऱ्या वस्तू जसे इडली पात्र, मोठी पातेली किंवा जास्तीची भांडी, पूजेसाठी लागणारी भांडी, सामान, ज्युसर, सँडविच मेकरसारखी उपकरणे वॉल युनिट किंवा टॉल युनिटमध्ये वरच्या कप्प्यात ठेवावी. क्वचित लागणारी भांडी मागच्या बाजूला आणि आठवडा-पंधरा दिवसांतून लागणारी भांडी समोर ठेवावीत.

* डाळ, तांदूळ, रवा, पोहे, चहा-साखर, मीठ (जास्तीचे) हे शक्यतो पारदर्शक बरण्यांमध्ये ठेवावे. म्हणजे शोधाशोध करावी लागत नाही आणि ते जिन्नस किती शिल्लक आहे, हेही समजते. या जिन्नसांच्या बरण्या शक्यतो ड्रॉवरमध्ये ठेवाव्या. तर क्वचित लागणारी कडधान्ये, खोबरे, शेंगदाणे आदी वॉल युनिटमध्ये पारदर्शक बरण्यांमधून ठेवावे.

* साठवणीचे मसाले, चिंच, आमसूल हे काचेच्या बरण्यांमध्ये आणि पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.

* जड वस्तूंचे ड्रॉवर जसे की कूकर, खलबत्ता, जड कढया, पोळपाट हे शक्यतो सर्वात खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवावेत.

* बेसिनखाली जागा असेल तर तिथे प्लास्टिकची ट्रॉली ठेवून त्यात साबण, लिक्विड सोप, गार्बेज बॅग ठेवता येतात.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रश्मी वीरेन

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.