व्यायाम | exercise and nutrition | nutrition and diet | best exercises for losing weight | fast lose weight exercise | diet and exercise plan | regular balanced diet and exercise

आहाराएवढेच व्यायामाचे महत्व | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Exercise is as important as diet | Prachi Rege, Dietitian

आहाराएवढेच व्यायाम(चे) महत्व

अनेक आरोग्य समस्यांवर व्यायाम हा एक किफायतशीर आणि उत्तम असा उपाय आहे. पण आपल्यापैकी बहुतेक जण व्यायाम करण्याबाबत एकतर उदासीन असतात किंवा व्यायाम न करण्यासाठी ढीगभर कारणे शोधत असतात. या सगळ्यांनाच वाटत असते, की आपल्याकडे व्यायामासाठी वेळ नाही.पण आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चांगल्या/सुदृढ आरोग्यासाठी आपण दररोज किमान २० मिनिटे (आठवड्याला १५० मिनिटे) तरी व्यायाम केला पाहिजे. दररोज फक्त २० मिनिटे व्यायाम केल्याने वजन कमी करण्याचे ध्येय तुम्ही गाठू शकत नसलात, तरी निश्चितच ही एक सकारात्मक सुरुवात असेल. सुरुवातीला हलका व्यायाम केला तरी चालेल. पण नियमित व्यायाम करा, जे महत्त्वाचे आहे!

आपण अजिबातच व्यायाम केला नाही, तर काय होऊ शकते?

* तर वजन वाढते, पोटापाशी चरबी साठते. परिणामी, फॅटी लिव्हर, मधुमेह, उच्च रक्तदाब, काही प्रकारचे कर्करोग, संप्रेरकांशी तसेच, हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित समस्या इत्यादी आजार उद्भवतात.

* स्नायू अशक्त होतात, हाडे कमकुवत होतात, अनेक अवयव दुखू लागतात, वेदना होतात.

* वेळेआधीच वय वाढल्यासारखे दिसते.

* डिटॉक्सिफिकेशन (विषारी पदार्थांचे उत्सर्जन) मध्ये घामाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र शारीरिक हालचालींच्या अभावी शरीरात विष तयार होत राहते. हे विष बाहेर पडण्यासाठी (उत्सर्जनासाठी) व्यायाम होत नसल्याने ते शरीरातच साचत जाते.

* पचनक्रिया बिघडते, आतड्यां-मध्ये अडथळा निर्माण होतो आणि पोषणाच्या समस्या निर्माण होतात.

* थकवा जाणवतो, चिंतातुरता, नैराश्य आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

खरेतर नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करावा. प्रत्येक प्रकारच्या व्यायामाचे स्वतःचे असे फायदे असतात. तुम्ही कार्डियो (धावणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, पायऱ्या चढणे, झुम्बा, अॅरोबिक्स) व स्ट्रेंग्थ – वेट ट्रेनिंग, योग (१२ ते २४ सूर्यनमस्कार) किंवा पायलेट्स अशा विविध प्रकारच्या व्यायामांचे संतुलन साधायला हवे. तुम्ही यापैकी नियमितपणे जो व्यायामप्रकार करू शकणार असाल तो करावा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल, उत्साह जाणवेल आणि ज्यामुळे तुमच्या शरीराला घाम येईल. तुमचे शरीर घामाघूम होते, असा व्यायाम ‌नक्कीच चांगला. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या व्यायामाने सुरुवात करा आणि हळूहळू व्यायामाची तीव्रता व कालावधी वाढवा. दररोज कमाल ४५-६० मिनिटे व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवा. हा कालावधी तुमच्या आरोग्याच्या ध्येयानुसार निश्चित करा. अती व्यायाम (६० मिनिटांपेक्षा अधिक व्यायाम) गरजेचा नाही.

सध्याच्या काळात सर्वांना सतावणारी समस्या कोणती असेल, तर ती म्हणजे पोटावर साठणारी चरबी. बैठी जीवनशैली आणि तासन्तास बसून काम करणे याचा थेट संबंध पोटावर जमणाऱ्या चरबीशी आहे. तुमचे एकूण वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात असले, तरी पोटावरची चरबी अहितकारक आहे.

व्यायाम न करण्यासाठी वेळेचा अभाव हे खरे कारण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही पुढे दिलेल्या सोप्या टिप्स अवलंबू शकता. याला ‘नॉनएक्सरसाइझ अॅक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस’ म्हणतात. यामुळे प्रत्येक क्षणी फिटनेसचा विचार करणे शक्य होईल.

* शक्य असेल तिथे लिफ्टचा वापर टाळा.

* तुमची गाडी जरा दूर पार्क करा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने जाताना एक स्टॉप आधी उतरा आणि इच्छित स्थळी थोडे चालत जा.

* अंघोळ करताना उठबस करा.

* घरातील कामे करा. स्नायूंची शक्य तेवढी हालचाल करा.

* दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करा.

* बसण्याऐवजी उभे राहिल्याने खूप कॅलरी बर्न होतात.

* तुमच्या मुलांसोबत खेळा, घरात फेऱ्या मारा.

* उत्तम बळकटीसाठी तुमचे किराणा सामान हातातून आणा.

* दररोज १०,००० पावले चालण्याचे नियोजन करा, मित्र/जोडीदार किंवा सहकाऱ्यांसमवेत चालण्याची निकोप स्पर्धा करा आणि परस्परांना प्रोत्साहित करा.

या सोप्या सवयी अंगी बाणविल्याने तुम्हाला कॅलरी बर्न करण्यासाठी उपयोग होईलच, त्याचप्रमाणे तुमचे शरीर लवचीक होईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल, तुम्हाला अधिक उत्साही वाटेल आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल!

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्राची रेगे, आहारतज्ज्ञ

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.