समाजभानाचे नऊ सोपान!
या नऊ गोष्टी आयुष्यात आधीच कळल्या असत्या तर किती बरे झाले असते.
समाजात वावरताना आपल्याला अनेक प्रकारचे लोक कामधंद्याच्या निमित्ताने भेटत असतात. त्यांच्यामुळे आपले समाजीकरण-Socialisation होत असते. आपल्यावर त्याचे बरेवाईट परिणामही होत असतात. या प्रक्रियेमध्ये वावरताना आपण इतरांशी कसे वागावे, बोलावे, चालावे ह्याचे नेमके भान अनेकदा येत नाही. अनुभवातून शिकणे महाग पडते. अशा वेळी दुसऱ्यांच्या अनुभवातून अप्रत्यक्ष अनुभव घेतल्यास ते सोयीचे ठरते.
१. दुसऱ्याचा हेवा करणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे!
आपण आपल्या स्वतःच्या जगात, करियरमध्ये, संसारात, छंदात रमलेले असावे. त्यातून मिळेल तेवढा आनंद घ्यावा. जवळच्या व्यक्ती, मित्रांसाठी देता येईल तेवढा वेळ द्यावा, खर्च करावा. ते आनंदी असले तर आपण आनंदी असतो. उगाच नवनवीन असंबद्ध ओळखी वाढवून त्यात वेळ, पैसा दवडणे हे क्वचितच शहाणपणाचे ठरते. आपल्यापेक्षा सधन, समृद्ध व्यक्तींबाबत आपल्याला जे आदर्श असे वाटते, त्याची दुसरी बाजू कदाचित पूर्णपणे भिन्न असू शकते. ती आपल्याला दिसू शकत नाही आणि दिसली तर मग त्या व्यक्तीची कीव करावीशी वाटते, म्हणजेच काळाचा अपव्यय.
२. पार्ट्या, पब्ज, मौज-मजा-मस्ती करणे ह्यात काही सकारात्मक उद्देश नसतो!
पार्ट्या, मौज-मजा-मस्ती म्हणजे फक्त मनोरंजन! अशा निमित्ताने भेटलेले लोक क्वचितच नंतर ओळख ठेवतात. त्यांचे जर आपल्याकडे काही काम असेल तरच त्याचा पाठपुरावा ते करतात आणि पर्यायाने त्यांचे ते काम करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर येऊन पडते. काम न झाल्यास संबंध निष्कारण दुरावतात. पार्टी, पिकनिकमध्ये आपला तोल चुकून थोडा जरी ढळला तरी तिखटमीठ लावून आपल्या पाठीमागे त्याची चर्चा होते. असे नेहमीच होते असे नव्हे, पण होण्याची शक्यता मात्र असते. साधारणतः अशा पार्ट्या, संमेलने हे ‘रात गई, बात गई’ अशातले प्रकरण असते. त्या गंभीरपणे घेऊही नये. कारण यामुळे एकमेकांचे अनुकरण करणे आणि इतरांशी तुलना करणे अशा गोष्टींची वाईट सवय लागते.
३. करियर हीच आपली ओळख समजणे धोकादायक ठरू शकते.
खासकरून मोठ्या कंपन्या, ब्रॅण्डमध्ये गरजेपेक्षा जास्त मन लावून काम करणाऱ्या व्यञ्चतींमध्येही ‘आपण स्वतः आणि आपले करियर’ यात गल्लत करण्याची सवय दिसून येते. पूर्वी दाक्षिणात्य सज्जन, नोकरदार यांच्या मृत्यूच्या जाहिरातीतसुद्धा त्यांचा उल्लेख ‘स्टेट बँक सुंदरम’ अशा प्रकारे व्हायचा. स्टेट बँक आहे तिथेच आहे मात्र जाहिरात / नोटीस सुंदरमच्या मृत्यूची (obituary) असते. तो गेला, बँक राहिली. पूर्वी लोक आयुष्यभर नोकरी बदलतही नसत, आयुष्यभर एकच नोकरी! त्यामुळे जीवन कंपनीमय होऊन जात असे. तेव्हा अशा प्रकारच्या ओळखीचा चुकामुकीचा प्रसंग यायचा. शक्तिशाली संघटनेत, वजनदार किंवा उच्चपदावर बसणाऱ्या व्यक्तींना आपला उल्लेख अशा प्रकारे कंपनी, संघटनेच्या नावाशी जोडलेला आवडतो, कारण यात त्यांना गर्वाचा बुलंद गहिरा गंध हुंगता येत असतो. स्वतःची करियर आणि आपण स्वतः ह्या वेगळ्या गोष्टी असतात, त्याची गल्लत टाळावी.
४. सगळेच मित्रमैत्रिणी हे कायम स्वरूपाचे नसतात. काही काळाच्या ओघात आपोआप गळून पडतात, तर काहींना विनयाने हळूहळू दूर करावे लागते.
लहान वयात किंवा शाळा-कॉलेजमध्ये होणारी मैत्री ही तशी निर्मळ असते. कारण त्यात व्यावहारिक बाजू नसते. पण नंतर कामानिमित्ताने होणारी मैत्री ही बहुधा त्या कामाच्या संदर्भात झालेली असते. काम झाले की ती संपते. मैत्रीचे अतूट संबंध टिकवणे ही दोन्ही बाजूंची जबाबदारी असते. दुसऱ्यांच्या चांगल्या मैत्रीसंबंधांवर जळणारे लोकही असतात. कान भरून मैत्रीला तडे देण्याचा प्रयत्न अशा व्यक्ती करतात.त्यांना ओळखून दूर ठेवणे हेसुद्धा चांगली मैत्री टिकवण्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दोघांच्या मैत्रीत-आयुष्यात आर्थिक-सामाजिक स्वरूपाचे टोकाचे फरक पडले तरीही टिकून राहते, ती खरी मैत्री! जसे की, श्रीकृष्ण-सुदाम्याची मैत्री!
५. आयुष्यात होणारे बदल समजूतदारपणे स्वीकारा किंवा नैराश्याला सामोरे जा.
‘बदल’ या एकाच गोष्टीत सातत्य आहे, असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. बदलाचा स्वीकार केला तर बदल तुमचा स्वीकार करतो, तुम्ही काळाच्या ओघात टिकून राहता अन्यथा तुम्ही कालबाह्य होता.
६. आयुष्यात होणाऱ्या चुका अनेकदा अनिवार्य असतात. जो/जी काही करण्याचा प्रयत्न करतो तो/ती चुकल्याशिवाय ते कसे साध्य करू शकेल? चुकण्यात काही चूक नाही.
माणूस हा चुकांमधून शिकत असतो. आतापर्यंत लागलेले अनेक वैज्ञानिक शोध हे योगायोगाने लागले आहेत. या योगायोगाच्या मुळाशी असते ती चूक, विसराळूपणा किंवा धांदल. हे अनावधनाने होत असते, मुद्दामहून कोणी चूक करायला जात नाही. पण चूक ही अनेक गोष्टींची जननी असते. त्यातून फायदा होऊ शकतो किंवा कधी नुकसानही सोसावे लागते. म्हणून चूक होण्याच्या भीतीने काही न करणे योग्य ठरत नाही.‘चूकभूल द्यावी-घ्यावी’, असे म्हणतात. यामागे हेच सत्य दडलेले आहे आणि चूक झाली तर त्याविषयी दिलगिरी व्यक्त करणे हाही मनाचा मोठेपणा असतो. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ याप्रमाणे दुसऱ्यांच्या चुकांतून शिकत पुढे जावे.
७. आत्मसंतुष्ट लोकांचे अनुकरण करू नये.
आपल्या आसपास अनेकदा कृतार्थ जीवनाच्या ओल्याचिंब भावनेने ओथंबलेला झगा पांघरून वावरणारी माणसे आढळतात. अनेकदा हे कृतार्थतेचे ढोंग असते. जो आत्मसंतुष्ट झाला तो खुंटला. त्याची आत्मसंभावना त्याला दुबळी करते. मात्र आपण भारून जाऊन अशा लोकांचे अनुकरण करून आत्मसंतुष्टतेचा झगा लवकरात लवकर पांघरण्याचे धोरण बाळगू नये. जीवन पाण्यासारखे वाहते असते. वाहणे थांबले की त्याचे डबके होते. पण म्हणून घाण्याच्या बैलासारखे सतत कामात राहण्यासाठी एकाच जागी गरागरा फिरतही राहू नये. तर नवनवीन छंद, दिशा, आनंद, अभ्यास, औत्सुक्य याबाबतीत सतत तहानलेले राहावे. जसे की स्टीव्ह जॉब म्हणतो, ‘Stay Hungry, Stay Foolish.’
८. बढाया मारणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
शौर्याच्या बढाया मारणारी माणसे टाळावीत. अशा प्रकारचे लोक खासकरून दोन पेग झाल्यावर, गुन्हेगारांचे थरारक अनुभव कथन करू लागतात तेव्हा त्यांचा दुसऱ्यांना न्यूनगंड द्यायचा इरादा असतो. त्यांची ही कथानके ऐकीव असतात. पण मुळात मनाने ते दुबळे असतात. तसेच आपली राजकीय मते आपल्याकडेच ठेवावीत, दुसऱ्यांची ऐकून घ्यावीत. राजकीय वादविवाद अर्थशून्य असतात.
९. कोणत्याही प्रश्नावर विचार करूनच उत्तर द्या.
हजरजबाबीपणा हा गुण नसून तो नेहमीच दुर्गुण ठरतो. एखादा साधा प्रश्नसुद्धा पोटात गहन अर्थ घेऊन ‘सहज म्हणून’ विचारला जातो, तेव्हा तातडीने त्याचे उत्तर कधीच देऊ नये. काही वेळ गेल्यानंतर विचार करून तर कधी आठवत नाही म्हणून उत्तर देणे टाळावे. उद्या सांगतो म्हणणे अधिक चांगले. प्रश्न एखाद्या व्यक्तीबद्दल असेल तर उत्तर देणे नक्कीच टाळावे.
समाजभानाची ही सूत्रे ज्यांना नव्याने गवसली असतील, त्यांनी त्यांचा अंगीकार केल्यास त्यांचे समाजस्वास्थ्य चांगले राहील.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
जयराज साळगावकर
(लेखक अर्थतज्ज्ञ व साहित्यिक आहेत.)
