ज्वारीचा पौष्टिक बन डोसा
साहित्य: १ वाटी ज्वारी, प्रत्येकी १/४ वाटी काळे उडीद, कोबी, १ छोटा चमचा जिरे, २ छोटे चमचे बडीशेप, तीन ते चार लसूण पाकळ्या, १/२ इंच आले, प्रत्येकी १ छोटा कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, प्रत्येकी १/२ वाटी कोथिंबीर, किसलेले गाजर, किसलेले बीट, ४-५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.
चटणीसाठी साहित्य: १ छोटा बटाटा, कैरीचे तुकडे, प्रत्येकी १ छोटा चमचा जिरे, उडीद डाळ, चवीनुसार लाल तिखट, मीठ, गूळ, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता.
चटणीची कृती: कच्चा बटाटा किसून किंवा तुकडे करून घ्या. त्यात जिरे, मीठ, लाल तिखट, गूळ, कैरीचे तुकडे हे सगळे एकत्र करून बारीक वाटून घ्या. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, उडदाची डाळ, हिंग, कढीपत्ता टाकून चटणी घाला व दोन मिनिटे झाकून ठेवा.वरून थोडी कोथिंबीर घाला.
बन डोसा कृती: ज्वारी आणि काळे उडीद धुऊन सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवा. ज्वारीतील पाणी निथळून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण ७ तास झाकून ठेवा. जिरे, आले, लसूण, बडीशेप, हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर जाडसर वाटून घ्या. हे वाटण पिठात घालून एकजीव करून घ्या. या मिश्रणाचा डोसा घाला. त्यावर सर्व भाज्या थोड्या थोड्या घालून डोसा झाकून ठेवा. भाज्या वाफेवर शिजतील. डोश्याच्या कडेने थोडे तेल सोडा. हा डोसा परतला नाही तरी चालेल. गरमागरम बन डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शर्मिला सुरळकर, नवी मुंबई