नियोजन | retirement planning | financial planning

आर्थिक गुंतवणुकीचे रहस्य | शेखर साठे | The secret of financial investment | Shekhar Sathe

आर्थिक गुंतवणुकीचे रहस्य

कष्टाने कमावलेल्या पैशाचे नेमके नियोजन कसे करावे, हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे.  थोड्या कालावधीसाठी पैसे शेअर बाजारात गुंतवून दुप्पट करायच्या मोहाला अनेक जण बळी पडतात. यातून पदरचा पैसा उडून जातो आणि निराशा पदरात पडते. असे का होते हे समजून घेतले, तर पैशाचे नियोजन करणे सुलभ होईल आणि निराशा टळेल. पहिली गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणतीही एकच निश्चित पाककृती उपलब्ध असल्याचा समज ठेवू नये. गुंतवणुकीच्या रसायनाचे घटक, पदार्थ सतत बदलत असतात. ते भेसळयुक्त असू शकतात, त्यांची ‘निवड’ जागरूकपणे करावी लागते, त्या स्वयंपाकघरात कायम अनिश्चिततेचे वातावरण असते. कच्च्या मालावर, चुलीवरच्या भांड्यावर आणि शिजलेल्या अन्नावर डल्ला मारणारे अनेक बोकेही आजूबाजूला घुटमळत असतात. एखाद्या तत्पर गृहिणीप्रमाणे काय शिजते आहे, त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. म्हटले तर ती एक कला आहे, म्हटले तर ते एक शास्त्र आहे. एकदा मूलभूत तत्त्व समजले की पुढचे सोपे असते!

मध्यमवर्गीय सामान्य माणसासाठी नोकरी हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असते. बचतीमध्ये उत्पन्नाचे सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण, नोकऱ्यांची निर्मिती होईल आणि संधी मिळतील अशा अर्थव्यवस्थेसाठी आग्रह धरण्याचे काम आपण करू शकतो. हातात येणारा पैसा मुख्यत्वे करून दोन कारणांमुळे वाया जातो. एक म्हणजे महागाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे उधळपट्टी. वैयक्तिक उधळपट्टीवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. त्यातून बचत निर्माण होते. त्या बचतीला सर्वात मोठा धोका महागाईचा आहे. वस्तु-सेवांचे भाव वाढले, की चालू उत्पन्नातील बचत कमी होते आणि आजवर केलेल्या बचतीचे अवमूल्यन होते. ते अवमूल्यन होऊ नये म्हणून महागाईवर मात करता येईल अशा पद्धतीने बचतीचे नियोजन करावे लागते. जेणेकरून महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळेल अशा रीतीने गुंतवणूक योजावी लागते. नियोजनामध्ये परतावा, जोखीम आणि गुंतवणुकीचा कालावधी (बचतीचा उद्देश) यांच्यामध्ये तारतम्य ठेवावे लागते.

आधुनिक भांडवलशाही जगात बाजाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक विचारवंत शासन आणि समाज यांच्या जोडीला बाजाराला व्यवस्थेचा तिसरा आधारस्तंभ मानतात. त्यांच्या मते, आजच्या घडीला शासन आणि बाजार यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. दुर्दैवाने आर्थिक विकास चुकीच्या दिशेला वळल्यामुळे शासन आणि बाजार या दोन आधारस्तंभात एक घातक युती अलीकडच्या काही वर्षांत तयार होऊन समाजाचा आधारस्तंभ दुबळा होत आहे. अशा काळात व्यवस्थेतील अस्थिरता वाढते. बाजार म्हटले की व्यापार आला. व्यापार म्हटले की नफा आलाच. नफा म्हटले की नफेखोरी, पाठोपाठ मक्तेदारी येते. परिणामी, गुंतवणुकीतील जोखीम वाढते. असे होते तेव्हा सुरक्षिततेसाठी अव्वल कंपन्यांचे शेअर्स, कर्जरोखे आणि बँका यांच्या दिशेने गुंतवणूक वळवावी लागते. अर्थात, ही गोष्ट वैयक्तिक पातळीवर साधणे सोपे नाही. सुदैवाने, सध्याच्या काळात यासाठी छोट्या गुंतवणूकदारांसाठी सोईस्कर मार्ग आणि वाहने उपलब्ध झालेली आहेत. ती कोणती हे पाहण्याआधी आपण काही मूलभूत तत्त्वांची उजळणी करू.

पहिली गोष्ट म्हणजे बाजार संपत्ती निर्माण करत नाहीत. संपत्ती निर्माण करण्याचे काम समाजातल्या उत्पादक शक्ती शेतात, कारखान्यात आणि सेवा-उद्योगात करतात. बाजार हे केवळ त्या संपत्तीची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण असते. दुसरी गोष्ट म्हणजे संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही. मूल्य निर्मितीसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. झटपट श्रीमंती मृगजळासमान असते. तिसरी गोष्ट म्हणजे बाजारात चोर-भामट्यांचा सुळसुळाट असतो. म्हणून बाजाराच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेबी, आरबीआय, आयआरडीए, पेन्शन नियामक मंडळ यासारख्या संस्था आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणा निःपक्षपातीपणाने आणि जागरूक राहून वित्तीय आणि शेअर बाजार सुरक्षित ठेवतील अशी रास्त अपेक्षा सुशासित राज्यात आपण करू शकतो. झटपट श्रीमंत झालेले लोक अकस्मात घबाड सापडल्यामुळे किंवा बेसुमार जोखीम घेतल्यामुळे कधी लबाडीने तर कधी सत्तेच्या दुरुपयोगाने श्रीमंत झाले असण्याची शक्यता अधिक असते. कुणी एका झटक्यात अरबपती झाला तर कुठेतरी खड्डा पडून तसे घडले असे समजायला काहीही हरकत नाही. अशा लोकांच्या पाठी लागणे यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही. महागाई हा भांडवली अर्थव्यवस्थेचा आधारभूत घटक आहे. त्यामुळे ती या व्यवस्थेत नाहीशी करता येणार नाही. पण ती बेतात आणि आटोक्यात ठेवण्याचे काम राज्यकर्त्यांचे आणि धोरणकर्त्यांचे आहे. ते तसे करतात की नाही, यावर नजर ठेवण्याचे काम आपले आहे.

नियोजनासाठी गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचे भान बाळगणे अपरिहार्य आहे. तहान लागल्यावर विहीर खणणे जसे अव्यवहार्य आहे, तसेच पैसे उडून गेल्यावर बचतीचा विचार करणे अदूरदृष्टीचे निदर्शक आहे. प्रत्येकाने कमवायला लागल्याबरोबर लगेच गुंतवणुकीचा विचार करायला हवा. कमवायला जसे डबल इंजिन हवे तसेच गुंतवणुकीलाही, शेअर बाजार आणि ठेवी-कर्जरोख्यांचे! घर किंवा उच्च शिक्षणासारख्या दीर्घकालीन गरजेसाठी सम्यक कर्जाचाही विचार करावा. परंतु तसे करताना उत्पन्नाच्या शाश्वतीचा आणि कर्जाच्या हप्त्याचा मेळ घातला पाहिजे. मात्र आर्थिक गुंतवणुकीसाठी कर्ज काढणे अत्यंत धोकादायक असते, हे लक्षात ठेवायला हवे. मी-मी म्हणणारे धनाढ्य लोक अशा कर्जापायी स्वतः मेटाकुटीला आल्याची आणि त्यांच्याबरोबर इतर सामान्य गुंतवणूकदारांना फटका बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे अर्थसाक्षरतेच्या अडाणीपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

वर गुंतवणुकीच्या नव्या मार्गांचा आणि वाहनांचा उल्लेख केला, त्यामध्ये म्युच्युअल फंड हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. म्युच्युअल फंडाची आणि त्यांच्या योग्य गुंतवणुकीच्या योजनांची निवड करताना अधिकृत सल्लागाराची (फी भरून) मदत घेणे केव्हाही श्रेयस्कर. फुकटचा सल्ला बरेचदा महागात पडतो किंवा सल्लागाराच्या फायद्यात जातो. हल्ली सिस्टेमॅटिक गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे छोट्या-छोट्या रकमेच्या गुंतवणुकीतसुद्धा आपण ‘डायव्हर्सिफिकेशन’ करू शकतो. शेअर बाजार आणि कर्जरोखे दोन्ही प्रकारांमध्ये निवेश आणि निकास यासाठी हा मार्ग अत्यंत सुलभ आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘शेअर इंडेक्स फंड’ अतिशय किफायतशीर आणि परिणामकारक असतात. तरुण वयात ‘शेअर्स फंड’ अधिक सयुक्तिक तर उतारवयात ‘डेट फंड’ समर्पक. कोणताही चांगला, प्रशिक्षित सल्लागार ही माहिती सहज देऊ शकेल. अजून एका गोष्टीबद्दल सावधगिरी बाळगायला हवी. आयुर्विमा कंपन्यांकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहू नये. त्यांच्याकडे केवळ विमा उतरविणाऱ्या संस्था म्हणून पाहावे. आरोग्य सेवा आणि शिक्षण यावरील खर्च नियंत्रणाबाहेर आणि आवाक्याबाहेर जाऊ शकतो. शिक्षण आणि आरोग्य ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. याचे महत्त्व आपल्या कुटुंबीयांना  पटवून  दिले  पाहिजे. तसेच त्या बाबतीतल्या अनियंत्रित महागाईबद्दल सरकारलासुद्धा धारेवर धरायला हवे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शेखर साठे

(लेखक ज्येष्ठ वित्त आणि गुंतवणूक तज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.