कमी | less is good

कमीत कमी | अरुंधती दीक्षित | Least Minimum | Arundhati Dixit

कमीत कमी

कोणाच्या घरी गेल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची कल्पना घर पाहून यायला लागते. ‘‘हा शो पीस लंडनचा, हा न्यूयॉर्कचा, हा जपानचा… मी इथे गेलो होतो/गेले होते…’’  संपूर्ण घर हे, घर कमी आणि वस्तुसंग्रहालय जास्त झालेले दिसते. कुठे बसावे तर आपला धक्का लागून कुठली महागाची गोष्ट फुटणार तर नाही ना, ह्याची काळजी वाटत राहते. असंख्य अप्लायन्सेस शंभर रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत पैसे खर्चून, अमक्या ढमक्याने घेतली मग माझ्याकडे का नको म्हणत घरात सतत येत राहतात. घरबसल्या ऑनलाइन खरेदी, २४ तास ते सात दिवस किंवा महिन्याभरात परत केल्यास ५० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत मिळणारा ‘रिफंड’, ह्यासारखी खरेदीसाठी मिळालेली लालूच यामुळे खरेदीची ही यादी लांबत जाते. यथावकाश ह्या वस्तू मग अडगळीच्या सामानात सरकवल्या जातात. काही दिवसांतच ‘उंटाला दिला तंबू’ म्हणत संपूर्ण घर व्यापून घरच्या लोकांनाच हलायला जागा उरत नाही.

मालिका आणि सिनेमातील कपडे, साड्या, अलंकार, चपला-बूट लगेच बाजारात आणून व्यापारी स्वतःची चलती करून घेतात. I am fed up with my wardrobe. I want to change it completely (माझ्या वॉर्डरोबचा – कपड्यांचा मला कंटाळा आला आहे. पूर्णपणे बदलून टाकणार आहे मी) अशी तरुणाईची भाषा सर्रास ऐकायला मिळते. चाणाक्ष बहुराष्ट्रीय Branded  कंपन्यांनी अत्यंत धोरणीपणे, कुटिलतेने तयार केलेले Shop till you Drop हे लोभस, गोंडस आणि हवेहवेसे वाक्य म्हणजे तरुणाईला सापळ््यात अडकवण्याचा चमकदार सापळा आहे. त्याच्या जोडीला क्रेडिट कार्डचा ‘जिन्न’ खिसा कधी साफ करून जाईल हे सांगताच येत नाही.

ह्या तमतृष्णेने आंधळे झालेले लहान-मोठे मासे दिखाऊ चमकधमक असलेल्या पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या जाळ््यात गवसत राहतात. Shop till you Drop हा गळाचा हूक खिशाच्या कंठनालेत अडकून खिसा फाटेपर्यंत ग्राहकाला गंडवत राहतो. तरीही Shop till you Drop  हीच खरी आनंदाची व्याख्या आहे, असे मोठ्या दिमाखात सांगणाऱ्या काही थोड्यांच्या रुबाबाला भाळून इतरही त्यात अडकत राहतात आणि पार कफल्लक होतात.अमेरिकेत एकदा विद्यापीठात प्रश्न विचारला गेला, की तुम्ही सगळ््यात आनंदी कधी व्हाल? कोणी म्हणे मला हीच गाडी हवी; कोणी म्हणे मला हीच नोकरी हवी; कोणी म्हणे मला खूप खूप पैसे हवे. एका भारतीयाने सांगितले, ‘आनंद मनातच असतो. तो कुठल्या बाहेरच्या गोष्टीने मिळत नाही.(Happiness is a state of mind). ’ सारे खो खो हसले. तिथूनच माझ्या मनाने ‘हव्यास ते आता बास!’ हा बॅक टू इंडिया प्रवास सुरू केला.आयुष्यामध्ये कामनेच्या दोरावरून तोल सावरत जाणे हे सोपे नाही. ह्या कामनेच्या दोराचा आपल्या सर्वात जवळच्या टोकाचा बिंदू असतो ‘बास’ हा! तर त्याचे ‘हव्यास’ हे दुसरे टोक कुठल्या मेरू पर्वताच्या शिखराला बांधलेले असते ते दृष्टिपथातही येत नाही. जसजसे पुढे चालत जावे तसतसे आता इथे आहे असे वाटणारे क्षितिजही पुढे पुढे सरकत जाते, पण आपण त्याला हात लावू शकत नाही तसे ‘हव्यास’ हे दुसरे दुर्गम टोकही कधी हाती येत नाही.Till you Drop हा क्षण आला तरीही नाही. जीवनातील आनंद मात्र कधीच विरून जातो. त्यामुळे ‘हव्यास ते आता बास’ ह्या दोन टोकाच्या शब्दांमध्ये भारतीय अध्यात्म जेवढे लवकर मुरेल तेवढा हा प्रवास ‘कमीत कमी’ अंतरात आणि सुखकारक होतो. हव्यास ते आता बास हा प्रवास झाला नाही, तर त्रास आणि ऱ्हासच संभवतो.

‘कमीत कमी’ म्हणजे नेमके किती? ‘कमीत कमी’ ह्याचा मानक सांगताना श्रीमद् आद्य शंकराचार्य म्हणतात, ‘‘कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः।’’ लाज झाकण्यापुरते एक वस्त्र पुरे. ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झाले, की ‘कमीत कमी’चा मानक (प्रमाण- standard ) फार लवकरही सापडतो. मग फाटकी झोळी कचऱ्यात भिरकावून द्यावी त्याप्रमाणे अपार ऐश्वर्याचाही माणूस सहज त्याग करतो. घराच्या काल्पनिक भिंती ढासळतात आणि ‘सर्व विश्वची माझे घर’ होते. एखाद्या झाडाखाली बसून मिळालेले दोन घास हाताचीच थाळी करून तो आनंदाने खातो. असा तो कौपिनवन्त (लंगोटीधारी) अत्यल्पवस्त्रधारी माणूस सर्वांहून भाग्यवान असतो.

वेदान्त ज्याच्या मुरला स्वभावी। भिक्षान्न ज्यासी सुखवी विशेषी

शोकास ना स्थान कदापि चित्ती। तरूतळी राहतसे सुखानी

भिक्षेस ज्या ओंजळ हेचि पात्र। सा‍ऱ्या दिशा हे घर ज्या नरास

द्यावीच झोळी भिरकावुनी ती। आव्हेरली ज्या कमला तशी ती

ना आडकाठी कुठल्या दिशेची। अत्यल्पवस्त्री नर भाग्यशाली

कबीरही काही वेगळे सांगत नाही,

मन लागो मेरो यार फकिरी में।

जो सुख पावो रामभजनमें

वो सुख नाही अमिरी में॥

‘कमीत कमी’चा त्याचा मानक ‘‘हाथ में कुंडी, बगलमें सोटा। चारो दिशा जागिरी में’’ इथेच संपतो.

एक ओळखीचे अधिकारी वारले तेव्हा त्यांच्या अमेरिकास्थित साठीपुढच्या मुलीला भेटण्याचा प्रसंग आला. ती म्हणत होती, ‘‘मम्मा आणि डॅडींनी इतकं सामान जमवलं आहे आता ते काय काय आहे, हे एकदा बघून त्याची विल्हेवाट लावणंही माझ्याच्याने शक्य नाही.’’ डोक्याला हात लावून बसली होती.एक राजस्थानी तडफदार तरुण भेटला. घरदार सोडून वनवासी लोकांसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून घेतले होते त्याने. म्हणला, ‘‘मी घरंदाज श्रीमंत आहे. वडिलांना निरनिराळ्या भारी कपड्यांची आवड होती. कपाटेच्या कपाटे त्यांच्या वेगवेगळ्या कपड्यांनी भरलेली असत. पण आमच्याकडे माणूस गेल्यावर त्याचे कपडे, भुताचे कपडे म्हणून कोणीही घेत नाहीत. वडिलांचे वय पाहून मी त्यांना आपला कपड्याचा शौक आवरता घ्यायला सांगितला. आहेत ते कपडे गरिबांना देऊन टाका म्हणून सांगितले; पण तसे झाले नाही आणि ह्या सगळ्या कपाटातील कपडे भुताचे कपडे म्हणून पडून आहेत.’’ तो तरुण मात्र दोन जोडी कपड्यांमध्ये आनंदी दिसत होता.

हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून मांडलेली श्रीमद् आद्य शंकराचार्यांची वचने म्हणूनच जुनी होत नाहीत. जो जागा होतो, त्याला पुन्हापुन्हा त्याची प्रचिती येते आणि श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या पाच रत्नांप्रमाणे असलेल्या लक्ष्मीनरसिंहपञ्चरत्नाचा आस्वाद घेत तो मनाला सांगतो,

मना-मधुकरा फुका फिरसी का, निरस अशा ह्या संसारी

मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची आस धरी

लक्ष्मीनरसिंहाच्या पावन पदकमलांची कास धरी

अनुपम सुख-मधु मिळेल तुजला, तृप्त करे जो जन्मभरी॥

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अरुंधती दीक्षित

(अरुंधती दीक्षित ह्या ज्येष्ठ लेखिका  व अनुवादक आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.