मीडिया | social media and fitness

सोशल मीडिया आणि व्यायाम | संकेत कुळकर्णी | Social Media And Exercise | Sanket Kulkarni

सोशल मीडिया आणि व्यायाम

सध्याचे युग हे समाज माध्यमांचे म्हणजेच सोशल मीडियाचे युग आहे. अर्थात, या सगळ्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही झालेला पाहायला मिळतो. माहिती मिळवण्यासाठी, समस्येच्या निराकरणासाठी हल्ली सोशल मीडियाचा सर्रास आधार घेतला जातो. याच सोशल मीडियाला हल्ली अनेकांनी आपल्या ‘हेल्थ रुटिन’चाही भाग बनवलेले दिसते. वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर आलेले रील्स, व्हॉट्स अॅप फॉरवर्ड्स, मेसेजेस पाहून आणि वाचून व्यायाम करणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतून आलेल्या या मेसेजेसची सत्यता पडताळून पाहण्याची खबरदारीही घेतली जात नाही. पण अशा पद्धतीने व्यायाम-डाएट करणे किंवा आपल्या फिटनेसची काळजी घेणे अजिबात योग्य नाही. कधी कधी तर असे वागणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.

आजकाल यू ट्यूब किंवा वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर आलेले रील्स पाहून व्यायाम आणि डाएट केले जातात. पण डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी करताना आपल्या शरीरप्रकृतीचा विचार करावा लागतो. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला न घेता असे कोणतेही प्रयोग आपल्या शरीरावर करू नका.हल्ली या माध्यमामुळे किटो, इंटरमिटंट असे वेटलॉसचे फॅड डाएट सगळीकडे पसरलेले दिसतात. मात्र असा कोणताही डाएट फॉलो करण्यापूर्वी शरीराची गरज आणि आपल्याला असणाऱ्या वैद्यकीय समस्या लक्षात घ्याव्या लागतात. रील्स किंवा व्हॉट्स अॅपवरचे मेसेज विश्वासार्ह असतीलच, याची खात्री नसते. हे सर्व डाएट प्लॅन प्रायोगिक आहेत, त्यांना कोणत्याही तज्ज्ञाने/संस्थेने मान्यता दिलेली नाही. आपल्या शरीरासाठी आहारातील पोषणमूल्ये अतिशय महत्त्वाची आहेत. जसे संतुलित आहाराला आपल्याकडे महत्त्व आहे, तसेच महत्त्व यूकेमध्ये ‘Eat well plate theory’ला आहे. चुकीच्या डाएटमुळे शरीरात पोषकतत्त्वांची, खनिजांची कमतरता निर्माण होऊन केस गळणे, हाडे कमकुवत होणे, अॅनिमिया, हिमोग्लोबिनची कमतरता, कमकुवत प्रतिकारशक्ती आदी वैद्यकीय समस्या निर्माण होऊ शकतात. डाएट हे generalised (सरसकट सगळ्यांसाठी) नसते, तर personalised(वैयक्तिक) असते, ही गोष्ट इथे विसरून चालणार नाही.

डाएटबरोबरच बसल्या जागी व्यायाम, दहा ते वीस मिनिटांचा व्यायाम आदी प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. लाखोंमध्ये व्ह्यूज किंवा लाइक्स मिळाले म्हणून सदर रील, व्हिडिओ किंवा पोस्ट योग्य असेलच असा त्याचा अर्थ होत नाही. व्यायाम हा कधीही ठरावीक एखाद्या भागाचा केला जात नाही, तर संपूर्ण शरीराचा व्यायाम करायला हवा. ट्रेंडच्या मागे धावताना आपल्या तब्येतीचे खेळ होणार नाहीत, याकडे लक्ष द्या.

सोशल मीडियाला फॉलो करणाऱ्या व्यक्तींमध्ये तरुणांचे प्रमाण अधिकाधिक आहे. वाढत्या वयातील मुलेही इथे पडीक असतात. या वयातील मुलेमुली अशा आकर्षणाला लगेच बळी पडतात. सोशल मीडियावरील अशा गोष्टी त्यांना पटतात आणि आवडतातही. मात्र अशा सरसकट पोस्टना न भुलता आपण कोणाला फॉलो करत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. डाएटच्या बाबतीत कोणतेही अंधानुकरण न करता एखाद्या अनुभवी डाएटिशयनचा प्रत्यक्ष सल्ला/मार्गदर्शन घ्या. सोशल मीडियावर फॉलो करायचे झाल्यास अशाच तज्ज्ञांना फॉलो करा. व्यायाम कसा करावा या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी व्हायरल होणाऱ्या फिटनेस इनफ्लूएर्न्सऐवजी प्रशिक्षित ट्रेनरचा सल्ला घ्यायला हवा. रील किंवा पोस्ट पाहून व्यायाम करण्याआधी ती रील/पोस्ट प्रशिक्षित ट्रेनरचीच आहे ना, याची खातरजमा करून घ्या. तसेच तुम्हाला काही मानसिक/शारीरिक व्याधी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी संबंधित तज्ज्ञाला प्रत्यक्ष भेटा.

आजच्या या डिजिटल युगात स्मार्ट वॉच, फिटनेस अॅप्स वापरणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. ट्रेंड म्हणून असे गॅजेट्स वापरत असाल, तरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते ‘मस्ट’ आहेत असे अजिबात नाही. मात्र काही जणांना यातून व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. तर काही जणांना व्यग्र दिनक्रमातून पाणी पिण्याची, ब्रेक घेऊन थोडासा झटपट व्यायाम किंवा वॉक करायची आठवण हे तंत्रज्ञान करून देते.

आरोग्याची काळजी घेण्याच्या बाबतीत जागरूकता सध्या वाढलेली दिसते. याचीच परिणिती म्हणून डाएट, वेटलॉस, कॅलरी इन्टेक, वर्कआऊट हे परवलीचे शब्द होऊन बसले आहेत. मात्र यामागचे शास्त्रशुद्ध गणित सर्वांनी समजून घ्यायला हवे. केवळ एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्या प्रकारे आपले आरोग्यविषयक धोरण राबवणे योग्य ठरत नाही. प्रत्येकाची शरीरयष्टी, वैद्यकीय स्थिती, वय, लिंग, तापमान, आनुवंशिकता, कामाचे स्वरूप, दैनंदिन आयुष्य या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात. डिजिटल तंत्रज्ञानालाही या सर्व मर्यादा आहेत. अशा वेळी सरसकट कोणा एकाचा व्हिडिओ किंवा रील पाहून व्यायाम, डाएट करणे कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न सर्वांना पडायला हवा. आपल्या फिटनेसची, आरोग्याची काळजी घेताना हा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अशा प्रकारे सोशल मीडियाच्या मागे न धावता प्रत्यक्ष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे.

एवढ्या एवढ्या कॅलरीज मी घेतल्या किंवा एवढ्या कॅलरीज बर्न केल्या अशी सर्रास भाषा हल्लीच्या तरुणांकडून ऐकायला मिळते. पण कॅलरीजचे हे गणित तुम्हाला नेमके किती समजले आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. अमुक एवढ्या कॅलरीज घ्यायच्या म्हणून चौरस आहाराऐवजी जर तुम्ही तेवढ्याच कॅलरीजचा पिझ्झा खाणार असाल, तर ते साफ चूक आहे. अशा वेळी शरीराला मिळणारे पोषण या महत्त्वाच्या घटकाकडेच तुम्ही साफ दुर्लक्ष करत आहात.

एकीकडे सोशल मीडियाला सरसकट फॉलो करताना दिसून येणारा हा तोटा असला तरी काही वेळेस या माध्यमाचा फायदाही आहे. आपल्या आहारात पोषणमूल्यांचे महत्त्व प्रचंड आहे. म्हणूनच आपण सर्वांनी संतुलित आहार घ्यावा, अशी शिफारस आहारतज्ज्ञ, डॉक्टर्स करत असतात. मात्र फास्ट आणि जंक फूडच्या या जगात अशा तज्ज्ञांचे म्हणणे आजकाल किती जण गांभीर्याने घेतात, हा प्रश्नच आहे. अशा वेळी रील्स, मेसेजेस, पोस्ट या ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे आरोग्यासाठी पोषणमूल्ययुक्त आहाराचे महत्त्व सगळ्यांना समजू शकेल. डॉक्टरांच्या कोरड्या सल्ल्यापेक्षा आकर्षक ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे सहजशक्य आहे. तरीही प्रशिक्षित व अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला न घेता कोणताही व्यायाम, डाएट करू नका.


फिटनेससाठी सोशल मीडियाचा आधार घेताना

* शरीराला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचू देता विश्वासार्ह/ अधिकृत माहितीचाच अवलंब करा.

* सोशल मीडियावरील रील्स/ पोस्ट पाहून कोणतीही कृती करताना आपल्याला त्याचा त्रास होत नाही ना, याकडे लक्ष द्या.

वाढत्या वयातील मुलांसाठी हे लक्षात ठेवा

* आपल्या रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा.

* वेळेवर आहार घ्या.

* दिवसभरात पुरेसे पाणी प्या.

* आर्चरी, जिम्नॅस्टिक्स, डान्स किंवा इतर मैदानी खेळ खेळण्यावर भर द्या.

स सोशल मीडियाचा स सकारात्मकतेचा..!

इंटरनेट, सोशल मीडियाचे जग महाकाय आहे. इथे माहितीचा महासागर तुमच्यासाठी खुला आहे. यातील योग्य त्या गोष्टींची निवड करणे तुमच्या हातात असते. अॅमेझॉन/किंडलवरील डाएट, व्यायामासंबंधित ईबुक्स तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू शकतील. विविध वेबसाइट्सवरील विश्वासार्ह व्हिडिओज व ऑनलाइन क्लासेसही तुमच्या मदतीला इथे आहेत.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– संकेत कुळकर्णी

(लेखक फिटनेस सल्लागार, क्रीडा आहारतज्ज्ञ व सेलिब्रेटी फिटनेस सल्लागार आहेत.)

शब्दांकन : मिताली तवसाळकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.