समस्या | health checker | how to find illness | check my symptoms | disease symptom checker | symptoms disease finder | symptom finder | symptoms and disease finder

असे ओळखा आजारपण… | कोमल दामुद्रे | How to identify illness | Komal Damudre

असे ओळखा आजारपण…(समस्या)

आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम जीभ, कान, नाक, नखे, डोळे तपासून पाहतात. याचे कारण म्हणजे आपल्या या अवयवांवर संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असते. तसेच या अवयवांच्या प्राथमिक तपासामुळे आपल्या आरोग्याचे गणित कुठे चुकते आहे, त्याचा प्राथमिक अंदाज लावता येतो. पुढे दिलेल्या निरीक्षणांद्वारे तुम्हालाही असा प्राथमिक अंदाज लावता येऊ शकेल. मात्र आरोग्याची समस्या समजून घेताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. उगीच स्वतःच ठोकताळे लावून उपचार करून घेऊ नका.

१. जिभेद्वारे समजून घ्या आरोग्याच्या समस्या: ब्रश करताना जीभ साफ  करायला विसरू नका. अन्यथा जिभेवर जीवाणूंचे संक्रमण होऊन दाट पिवळ्या रंगाचा थर जिभेवर साचण्यास सुरुवात होते. यामुळे ताप-सर्दी-खोकला, श्वसनाचे आजार जडतात. तर जीभ लाल होणे, हे अॅनिमियाचे प्राथमिक लक्षण मानले जाते. शरीरात व्हिटॅमिन ‘बी १२’ च्या कमतरतेमुळेही जीभ लाल होण्याची शक्यता असते. शरीरातील पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे जीभ चिकट-गुळगुळीत होते. शक्यतो धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या दिसून येते.

काही जणांमध्ये वरचेवर तोंड येण्याची समस्या आढळते. सतत तिखट पदार्थांचे सेवन केल्यास तोंड येण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे हार्मोन्स असंतुलित होऊन अल्सरची शक्यता वाढते. जिभेवरील पांढऱ्या रंगाच्या चकत्या, शरीर कमजोर असल्याच्या निदर्शक आहेत.

हे लक्षात ठेवा :

  • निरोगी जीभ फिकट गुलाबी व ओलसर असते, यावर डाग नसतात.

  • जिभेवरचा जाड थर अपचन, गॅसेस व शारीरिक अशक्तपणा किंवा व्हायरल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो.

  • जिभेवरील जाड पिवळा थर म्हणजे अपचन, सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, शरीरात अतिउष्णता असण्याचा संकेत ठरू शकतो

  • चमकदार लाल जीभ असल्यास ताप, रक्तातील उष्णतेचा संकेत आहे. आंतरिक जखम, इन्फेक्शनची शक्यताही नाकारता येत नाही.

  • फिकट पिवळी जीभ म्हणजे रक्ताची कमतरता, कावीळ, अशक्तपणा, आतड्याला सूज, झोपेची कमतरता, थकवा यांची लक्षणे असतात.

  • निळसर रंगाची जीभ व्हिटॅमिन बी-२ ची कमतरता, शरीरात वेदना व सूज, महिलांमध्ये वेदनादायी मासिक पाळी किंवा औषधांचे दुष्परिणाम दर्शविते.

  • जिभेचा समोरचा भाग लाल होत असल्यास शारीरिक अशक्तपणाचे व मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे. तसेच महिलांमध्ये मेनॉपॉजच्या सुरुवातीचा हा संकेत आहे.

  • जिभेचे दोन्ही काठ जास्त लाल दिसत असल्यास अल्कोहोल, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन व आतड्यांची समस्या ही कारणे असू  शकतात.

  • जिभेवर पांढरे डाग दिसत असल्यास शरीरात अनेक प्रकारचे इन्फेक्शन व सतत घाम येण्याच्या समस्येचे संकेत असू शकतात.

२. नखांद्वारे समजून घ्या आरोग्याच्या समस्या: तुमची नखे सहजपणे तुटत असतील किंवा दुमडली जात असतील तर त्यांची पुरेशी काळजी घ्या. असे करूनही त्याच समस्या पुन्हा जाणवत असतील, तर शरीरात लोहाची कमतरता आहे, ज्यामुळे तुम्हाला अॅनिमिया व त्यासारख्या इतर आजारांना तोंड द्यावे लागू शकते. ठिसूळ नखे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ए, बी व सी यांच्या अभावाचे तसेच हायपर थायरॉइडचेदेखील लक्षण असू शकते. पिवळसर नखे म्हणजे सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर किंवा गैरवापर केल्यामुळे फंगल इन्फेक्शनचे निदर्शक होय. रक्तवाहिन्यांच्या जाळ्या व ग्रंथींमधील समस्या तसेच शरीरातील अतिरिक्त पाणी कमी होणे दर्शवितात. परिणामी, हाता-पायांना सूज येते. फुप्फुसांमध्ये अतिरिक्त पाणी जमा होण्याच्या समस्येतही नखे पिवळी पडतात.

पांढऱ्या नखांवर गुलाबी छटा म्हणजे यकृताची समस्या किंवा कदाचित हेपिटायटीसचे प्राथमिक लक्षण असू शकते. नखांवर निळा रंग दिसल्यास तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे यकृताच्या कार्यात समस्या अथवा हृदयाची समस्या असू शकते. नखांवर एखाद्या पिनेने खरवडल्यासारखे खड्डे दिसत असतील तर ते सोरायसिसचे प्राथमिक लक्षण असू शकते. जर नखांवर आडव्या गडद रेषा आढळल्यास मधुमेह, रक्ताभिसरणाची समस्या किंवा न्यूमोनियासारख्या गंभीर विकाराचे लक्षण असू शकते. तुमच्या नखांवर अशी काही लक्षणे आढळली, तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य.

३. चेहऱ्यांवरील बदलांद्वारे समजून घ्या आजारांची लक्षणे:

  • कपाळाच्या वरील भागावर मुरूम येणे हे किडनीच्या समस्येचे लक्षण आहे.

  • सतत दारू, चहा, कॉफी यांच्या सेवनाचा परिणाम म्हणजे कपाळ लाल होते.

  • अतिरिक्त प्रमाणात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कपाळावर पांढरे डाग येतात.

  • सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यास किंवा टेन्शन घेतल्यास कपाळाचा मधला भाग लाल होतो.

  • कपाळाच्या खालच्या भागावर सतत मुरूम येणे हे जास्त ताण, अपुरे रक्ताभिसरण आणि अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे.

  • केसांसाठी रसायनयुक्त जेल, तेल यांचा अधिक प्रमाणात वापर केल्यास कपाळावर ‘पोमेड अॅक्ने’ (मुरूम) येतात.

  • भुवयांच्या मध्ये दोन उभ्या रेषा येत असतील, तर ते लिव्हरमध्ये फॅट आणि कफाचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.

  • नाकावर मोठ्या आकाराचे मुरूम येत असल्यास हृदयात आणि रक्तामध्ये अशुद्धता असल्याचे लक्षण आहे. सतत चहा, कॉफी, दारू, गुटखा यांच्या सेवनाचा परिणाम म्हणूनही नाकावर मुरूम येतात.

  • नाक लाल होणे आणि सूज येणे हे छातीत कफ वाढल्याचे तसेच लिव्हरमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे.

  • डोळ्यांखाली काळे डाग येणे, डोळे लाल होणे किंवा डोळ्यांवर सूज येणे ही यकृताची समस्या असल्याचे निदर्शक आहे.

  • असंतुलित आहारामुळे डोळ्यांवरील त्वचेवर सूज येते.

  • किडनीमध्ये समस्या असल्यास कानावर मोठे मुरूम येतात, तसेच कान लाल होतात.

  • फुप्फुसाची समस्या, रक्ताभिसरणाची समस्या आणि पचनात अडथळा असल्यास गालावर मुरूमे येतात.

  • शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास गाल बारीक होतात.

  • प्रजनन संस्थेच्या कार्यात समस्या उद्भवल्यास स्त्रियांच्या गालांवर बारीक केस येतात.

  • ओठ काळे पडणे, कोरडे पडणे किंवा भेगा पडत असल्यास किडनीची समस्या असू शकते.

४. सतत गळणाऱ्या केसांमुळे समजून घ्या आरोग्याच्या समस्याः

  • चाई पडणे : शरीरातील काही पेशी विरुद्ध दिशेने तयार होऊ लागल्या, की शरीराच्या इतर भागांतील (उदा. डोके, भुवई, दाढी, मिश्या, अंगावरचे केस) केस गोलाकारात गळतात व त्या केसांच्या मुळांवर हल्ला करतात. रोगप्रतिकारकशक्तीशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

  • बाळंतपणानंतर गळणारे केस : आहाराकडे लक्ष न दिल्यास किंवा स्वतःच्या खाण्यावर फारसा भर न दिल्यास शरीरात विविध अन्नघटकांच्या कमतरतेमुळे पाळीच्या समस्या, रक्तस्राव होणे व यातून शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे केसगळतीची समस्या अधिक प्रमाणात होऊ लागते.

  • कीटकजन्य आजारांमुळे गळणारे केस : डेंग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड, काविळीसारखे आजार, तसेच दीर्घ मुदतीचे इतर आजार केस गळण्यास कारणीभूत ठरतात.

  • औषधांचा होणारा परिणामः स्टिरॉइड्स, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने केस विरळ होतात.

  • केसांवरील सौंदर्य उपचारः केसांच्या रचनेत बदल करणारे उपचार, प्रसाधनांचा अतिरेकी वापर, कर्करोगावर वापरण्यात येणारी केमोथेरपी यामुळे केस अधिक प्रमाणात गळू लागतात.

  • टक्कल पडणे : शरीरात तयार होणाऱ्या अँड्रोजेन हार्मोनचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो व केसांची मुळे हळूहळू बारीक होतात. केसांच्या जाडीवरदेखील याचा परिणाम होतो. त्यामुळे केस विरळ होतात. या प्रकारात केस प्रत्यक्ष गळत नाहीत, परंतु केसांमध्ये फटी पडून आतील त्वचा दिसायला लागते. स्त्रियांमध्ये जर पॉलिसिस्टीम ओव्हरीज असतील तर ही लक्षणे आढळून येतात.

तसेच, रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्याने टक्कल पडू लागते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कोमल दामुद्रे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.