दात | Baby Teeth | Milk Teeth | Cuspid Teeth

मुलांचे दात आणि मौखिक आरोग्य | डॉ. दर्शन परुळकर | Baby Teeth

 

मुलांचे दात आणि मौखिक आरोग्य

येणाऱ्या पहिल्या दातापासूनच मुलांच्या दातांची काळजी घेतली, तर त्यांचे मौखिक आरोग्य कायमस्वरूपी राखणे शक्य होते. दुधाचे दात पडणारच मग कशाला एवढी काळजी घ्यायला हवी, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.

मुलांच्या दातांची काळजी का घ्यावी?

शक्य तेवढी लवकर तपासणी केल्यामुळे दातांमध्ये निर्माण होणारी पोकळी, दात किडणे याला प्रतिबंध करता येतो. कारण या समस्यांमुळे मुलांना वेदना होतात, त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो आणि इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात. बाळाच्या दातांचे आरोग्य त्याला पहिला दात येण्याआधीपासूनच राखावे लागते. बाळाला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आणि तुमचे मूल मोठे होईपर्यंत म्हणजे अगदी महाविद्यालयात जाईपर्यंत (आणि त्यानंतरही) या सवयी टिकवून ठेवल्या पाहिजेत.

खानपानाच्या कोणत्या सवयी मुलांच्या दातांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात?

गोड आणि चिकट पदार्थ मुलांच्या दातांसाठी अपायकारक असतात. यात कडक आणि मऊ कँडी, चॉकलेट, क्रीम बिस्किटे, क्रॅकर्स आणि वेफर्सचा समावेश होतो.

मुलांच्या दातांच्या आरोग्यासाठी अपायकारक सवयी खालीलप्रमाणे ः

 • रात्री बाटलीने दूध पिणे
 • अंगठा चोखणे
 • नखे खाणे
 • पेन्सिल, पेन किंवा इतर वस्तू चावत राहणे
 • सतत गोड पदार्थ चघळणे
 • बालकांना पॅसि-फायर्स (चोखण्यासाठीची वस्तू) देणे

दुधाचेदात महत्त्वाचे का असतात आणि त्यांची काळजी घेणे का आवश्यक असते?

बालवयातील दुधाचे दात अनेक कारणांसाठी महत्त्वाचे असतात. घनपदार्थ चावण्यासाठी, बाळाच्या बोलण्याची क्षमता विकसित होण्यासाठी ते महत्त्वाचे असतात. कायमच्या दातांसाठी जागा राखून ठेवण्याचे कामही दुधाचे दात करत असतात. दुधाचे दात किडून पडले, अपघातामुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव ते वेळेआधीच काढून टाकावे लागले तर कायमचे दात येताना काही समस्या निर्माण होऊ शकते.

दातांचे आरोग्य राखणे गमतशीर कसे करता येईल?

 • मुलांना त्यांचा टूथब्रश आणि टूथपेस्ट निवडू द्या. ज्या कृतीमध्ये आपले म्हणणे ऐकून घेतले जात आहे, अशी कृती करताना त्यांना बरे वाटते.
 • मुलांसोबत तुम्हीही दात घासावे. मुले अनुकरण करतात, त्यामुळे तुमचे अनुकरण करून ते व्यवस्थित दातघासू शकतात. दात घासण्याबरोबरच जीभही घासण्यास विसरू नका.
 • दात घासणे गमतीशीर करा. हे करताना वेगवेगळ्या प्रकारे हसा, गमतीशीर हावभाव करा. दातघासण्या-साठी तुमचे गाणेही तयार करू शकता.
 • दात घासण्याचे आणि दातांची निगा राखण्यासंबंधित मोबाइलवर विविध व्हिडिओ पाहा आणि तसे प्रयोग करा.
 • दात घासण्यासाठी खास टायमरचा वापर करू शकता, जेणेकरून दोन मिनिटे व्यवस्थित दातघासणे शक्य होईल.
 • मुलाने नियमित दातघासल्याबद्दल त्याला बक्षीस देऊन प्रोत्साहन द्या.

दंत वैद्याकडे किती वेळा जावे? तातडीने दंतवैद्याकडे कधी जायला हवे?

दर सहा महिन्यांनी एकदा आपल्या दातांची तपासणी आणि वर्षातून दोन वेळा दात स्वच्छ करून घ्यायला हवे. दातांची काळजी घेऊनही हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा इतर कोणती समस्या आढळून आली, जसे की – तोंडातील अल्सर बरा होत नसेल तर लगेचच वैद्यकीय मदत घ्यावी.

एखादा अपघात झाला किंवा मूल पडले आणि त्याच्या तोंडाला / पुढच्या दातांना इजा झाली तर जबड्याला फ्रॅक्चर झाले आहे की नाही याची तपासणी करून घेण्यासाठी डेंटिस्ट आणि फिजिशिअनची भेट जरूर घ्यावी. पुढच्या बाजूच्या वरील दातांना इजा होणे हे लहान मुलांमध्ये सर्रास आढळून येते आणि त्यावर तातडीने उपचार करायला हवे. पडल्यामुळे किंवा खेळताना मुलांच्या दातांना इजा होऊन दाताला भेग पडू शकते, तुकडा पडू शकतो किंवा दातच पडू शकतो. अशा वेळी तातडीने उपचार केले असता वाचवता येऊ शकतात.

एकंदरच दातांची काळजी घेण्याची आपली कृती ‘इंटरेस्टिंग’ केली तर मुलांनाही लहान वयातच चांगल्या सवयी लागतात. याचा परिणाम म्हणजे त्यांचे मौखिक आरोग्य कायमस्वरूपी चांगले राखणे शक्य होते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. दर्शन परुळकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.