मल्टिव्हिटॅमिन्स : गरज आणि भडिमार

व्हिटॅमिन्सची गोष्ट माणसाच्या गोष्टीइतकीच रंजक आहे, रहस्यमय आहे. व्हिटॅमिन्सच्या कहानी में कई ट्‌विस्ट भी है. आपलं जगणं, आरोग्य याबाबत माणूस अनेक चुकांतून शिकत आला आहे.

वास्को-द-गामा,खलाशी आणि स्कर्व्ही

जगाचा शोध घेत समुद्रमार्गे फिरणारा जिद्दी दर्यावर्दी वास्को-द-गामा आपल्याला माहीत आहे.  व्हिटॅमिनची कहाणी त्याच्या जलप्रवासाशीदेखील जोडलेली आहे. त्याच्या एका समुद्रसफारीत त्याच्यासोबत असलेले अनेक खलाशी आजारी पडले. हिरड्या- सांधे सुजणे, दात सैल होणे, दातांतून, कातडीतून रक्त येणे, प्रचंड थकवा अशी लक्षणे त्यांच्यामध्ये दिसत होती. त्यांना स्कर्व्ही नावाचा आजार झाला होता. त्या प्रवासात त्याच्या जहाजावरील १६० पैकी ११३ खलाश्यांचा मृत्यू या आजाराने झाला. मात्र उरलेले काही खलाशी जेव्हा नव्या बेटावर उतरले आणि त्यांनी तिथली ताजी फळे, पालेभाज्या, अन्न यांचा आस्वाद घेतला तेव्हा ते काही दिवसांतच खडखडीत बरे झाले. जहाजावरील प्रदीर्घ प्रवासात ताजे अन्न, फळे खायला मिळत नसत त्यामुळे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे या खलाश्यांना स्कर्व्ही होई. अर्थात लिंबूवर्गीय फळे खाल्याने हा आजार बरा होतो, हे लक्षात येत होते, पण ascorbic acid म्हणजे व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्व्ही होतो, हे कळायला किती तरी काळ लागला.

मल्टिव्हिटॅमिन्स म्हणजे काय?

व्हिटॅमिन्स म्हणजे काय आणि ती माणसाला कशी सापडत गेली, याचा इतिहास तसा अनेक शतकांचा आहे. व्हिटॅमिन्सना आपण मराठीत जीवनसत्त्वे म्हणतो. जीवनसत्त्वे म्हणजे आपल्याला जगविण्यासाठी लागणारे अतिमहत्त्वाचे आणि आवश्यक असे अन्नातील घटक. हे घटक शरीर पुरेशा प्रमाणात तयार करू शकत नाही आणि म्हणूनच ती आपल्या आहारातून मिळणे आवश्यक असते. आजच्या घडीला तेरा व्हिटॅमिन्स मानवाला ज्ञात आहेत, म्हणून ती मल्टिव्हिटॅमिन्स! A C D K E ही पाच आणि B प्रकारची आठ अशी एकूण तेरा व्हिटॅमिन्स!

जीवनसत्त्वे दोन प्रकारची असतात  – एक पाण्यात विरघळणारी तर दुसरी पाण्यात न विरघळणारी पण मेदात विरघळणारी. व्हिटॅमिन A D K E ही मेदात विरघळणारी तर उर्वरित सारी पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन्स आहेत.

मल्टिव्हिटॅमिन्सचे मानवी आरोग्यातील स्थान :

ही सारी व्हिटॅमिन्स मानवी आरोग्यासाठी का आवश्यक आहेत? ती मानवी आरोग्याला नेमकी कोणती मदत करतात? ती रोजच्या आहारात किती प्रमाणात असली पाहिजेत आणि ती कोणत्या अन्नपदार्थांमध्ये असतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सची माहिती खाली दिलेल्या तक्क्यात दिली आहे. जीवनसत्त्वे आपल्या बहुपेशीय जीवांच्या वाढ आणि विकासाकरिता आवश्यक असतात. गर्भाच्या वाढीमध्ये त्वचा, स्नायू आणि हाडे तयार होताना व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. अशा वाढीच्या वेळी व्हिटॅमिनची कमतरता काही वेळा कायमस्वरूपी अपायदेखील करू शकते. बहुतेक सारी व्हिटॅमिन्स ही अन्नातून मिळतात. पण काही अपवादही आहेत. आपल्या आतड्यांमध्ये असणारे काही बॅक्टेरिया बायोटिन (B 7) तयार करतात तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने कातडीत व्हिटॅमिन D तयार होते. बीटा कॅरोटिनपासून आपल्या शरीरात व्हिटॅमिन A तयार होते. एकदा गर्भाची वाढ आणि पूर्ण विकास झाला की पेशी आणि इतर अवयवांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिनची गरज असते.

जीवनसत्त्वकोणत्या पदार्थातून मिळतेमुख्य कार्यकमतरतेचे परिणाम
पपई, आंबे, गाजर यासारखी पिवळ्या रंगाची फळे, पालेभाज्या, काॅड लिव्हर ऑईल, मासे इ. डोळ्यांचे, बाह्य तसेच आतल्या त्वचेचे आरोग्य राखणेरातांधळेपणा
अंधत्व
कातडीवर विपरीत परिणाम
डीअंडी, मासे, लिव्हर, मशरूम, उन्हात बसल्याने त्वचेत व्हिटॅमिन डी तयार होते दात, हाडे, मज्जातंतू आणि स्नायू बळकट होतात.रिकेटस (मूडदुस) हाडे कमजोर बनतात.
तेलबिया, कडधान्ये, तृणधान्ये अॅण्टी आॅक्सिडन्ट कमतरता अगदी अभावानेच आढळते. पुरुषांमध्ये वंध्यत्व, स्त्रियांमध्ये गर्भपात
सीसंत्री वर्गातील फळे, आवळा, पालेभाज्या, शेवगाहिरड्यांचे आणि त्वचेचे आरोग्य, जखमा भरुन आणणेस्कर्व्ही
बी १(थायमीन)
कडधान्ये, तृणधान्ये, यिस्ट, भाज्या, लिव्हर, अंडी, बिनसडीचा तांदूळ ब गटातील सर्व जीवनसत्त्वे एकत्र काम करतात. ती कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असतात. डोळ्यांचे आरोग्य राखतात. फोलिक अॅसिड आणि सायनोकोबालमिन अॅनिमिया प्रतिबंधासाठी आवश्यक असतात. सायनोकोबालामीन मज्जातंतूंच्या वाढीस मदत करते. बेरीबेरी
बी २(रायबोफ्लॅविन)दूध, मटण, कडधान्ये, तृणधान्ये, फळे, भाज्या, यिस्ट ब गटातील सर्व जीवनसत्त्वे एकत्र काम करतात. ती कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असतात. डोळ्यांचे आरोग्य राखतात. फोलिक अॅसिड आणि सायनोकोबालमिन अॅनिमिया प्रतिबंधासाठी आवश्यक असतात. सायनोकोबालामीन मज्जातंतूंच्या वाढीस मदत करते. डोळ्यांचा त्रास, तोंड येणे
बी ३(नायसिन) मांसल पदार्थ, कडधान्ये, तृणधान्ये, शेंगदाणेब गटातील सर्व जीवनसत्त्वे एकत्र काम करतात. ती कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असतात. डोळ्यांचे आरोग्य राखतात. फोलिक अॅसिड आणि सायनोकोबालमिन अॅनिमिया प्रतिबंधासाठी आवश्यक असतात. सायनोकोबालामीन मज्जातंतूंच्या वाढीस मदत करते. पेलाग्रा
बी ९(फोलिक अॅसिड) यिस्ट, लेट्युस, बिटाची पाने, पालेभाज्याब गटातील सर्व जीवनसत्त्वे एकत्र काम करतात. ती कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असतात. डोळ्यांचे आरोग्य राखतात. फोलिक अॅसिड आणि सायनोकोबालमिन अॅनिमिया प्रतिबंधासाठी आवश्यक असतात. सायनोकोबालामीन मज्जातंतूंच्या वाढीस मदत करते. अॅनिमिया
बी १२(सायनोकोबालामिन)मासे,दूध, लिव्हर, यिस्ट अॅनिमिया

लहान मुले व जीवनसत्त्वांची कमतरता

व्हिटॅमिन ‘A ‘ चे उदाहरण घ्या. आपल्या अंगावरील कातडीप्रमाणेच आतल्या कातडीचे (म्युकोसा) आरोग्य या व्हिटॅमिनवर अवलंबून असते. लहान मुलांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता रातांधळेपणास कारणीभूत ठरते, पण त्याचबरोबर अतिसार आणि न्यूमोनियासारखे बालवयातील महत्त्वाचे आजार प्रतिबंधामध्येदेखील या जीवनसत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच लहान मुलांना त्यांच्या लसीकरणासोबत जीवनसत्त्व ‘ A ‘ चा डोसदेखील देतात. वयाच्या दहाव्या महिन्यापासून बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत दर सहा महिन्यांनी हा डोस देतात.

जीवनसत्त्वे कधी एन्झायमची तर कधी एखाद्या हार्मोनची म्हणजे संप्रेरकाची भूमिका निभावतात. व्हिटॅमिन D कॅल्शियम आणि तत्सम मिनरल्सची चयापचय क्रिया नियंत्रित करते आणि म्हणूनच दात, स्नायू, हाडे यांच्या मजबुतीकरता त्याची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ई आणि सी हे अॅण्टी ऑक्सिडन्ट म्हणून काम करतात. व्हिटॅमिन A आणि D शरीरात साठवली जात असल्याने ती जास्त प्रमाणात घेतल्यास ते शरीराला अपायकारक ठरते.

B गटातील थायमिन, राय- बोफ्लेविन, नायसिन, पीरिडॉक्सिन, फोलिक अॅसिड, सायनोकोबालामिन ही सर्व जीवनसत्त्वे एकत्र काम करतात. ती कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असतात.

बाह्य व्हिटॅमिन्सची गरज माणसाला नक्की केव्हा भासते?

खरे म्हणजे कोणत्याही निरोगी माणसाला बाह्य व्हिटॅमिनची आवश्यकता नसते. वृद्ध मंडळी, गरोदर माता, स्तनदा माता, आजारात अथवा आजारातून उठल्यानंतर लोकांना बाह्य व्हिटॅमिनची गरज भासते. आहारातून मिळणाऱ्या नैसर्गिक व्हिटॅमिनची किमया काही औरच असते. डॉ. कमला सोहोनी यांनी आपल्या ‘ आहार गाथा ‘ या पुस्तकात लिहिले आहे, ‘हल्ली उठल्यासुठल्या गरज असो की नसो, जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेण्याची प्रवृत्ती दिसते. हे एक फॅड होऊन बसले आहे. अशीही समजूत आहे की, जीवनत्त्वांची गोळी दररोज घेतली तर आपले सर्व रोगांपासून संरक्षण होते. पण ही समजूत अगदी चुकीची आहे. जास्त जीवनसत्त्वे कारण नसताना घेतली तर त्यामुळे शरीराला अपाय होतो.’ हीच बाब अलीकडील काही संशोधनांतून समोर आली आहे. मिनेसोटा विद्यापीठाच्या एका अभ्यासात मल्टिव्हिटॅमिन्स घेणाऱ्या स्त्रियांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या मृत्यूदर अधिक आढळला तर क्लिवलॅण्ड क्लिनिकच्या एका अभ्यासात व्हिटॅमिन E घेणाऱ्या पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळले.

जीवनसत्त्वांचा अतिरेक व आरोग्य:

वास्तविक पाहता व्हिटॅमिन्सची गरज आपल्या आहारातून बहुतांशी पूर्ण होऊ शकते पण त्याकरिता आपला आहार चौरस हवा. शिवाय आहारातील व्हिटॅमिन्स शाबूत राहावीत याकरिता, काय करायला हवे, हेही आपण समजून घ्यायला हवे. भाज्या कापल्यानंतर धुतल्यामुळे त्यातील जीवनसत्त्व C सारखी पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन्स वाहून जातात. भाज्यांमध्ये सोडा घातल्यानेही व्हिटॅमिन C चा नाश होतो. भाज्या उघड्या भांड्यात आणि संथपणे शिजवल्यासही त्यातील व्हिटॅमिन C नष्ट होते. तळण्यामुळे सर्व व्हिटॅमिन्सचा नाश होतो. भाज्या शिजविण्यापूर्वी खूप आधी कापून ठेवू नयेत. कोशिंबीरसुद्धा अगदी जेवायच्या वेळेस करावी. कोशिंबिरीत लिंबाचा वापर केल्याने त्यातील व्हिटॅमिन सी टिकून राहते. थोडक्यात म्हणजे योग्य आहार, स्वयंपाकाची योग्य पद्धत यामुळे व्हिटॅमिन्सची आपली बहुतांश गरज आहारातून भागू शकते. काही वेळा बाह्य व्हिटॅमिन्सची गरज भासू शकते, पण ती आपण मल्टिव्हिटॅमिन्सच्या फसव्या जाहिराती पाहून ठरवता कामा नये. कारण मर्यादित स्वरूपात ही व्हिटॅमिन्स आपल्यासाठी  ‘ जीवन ‘ सत्त्वे असली तरी त्यांचा अतिरेक हा आरोग्याला अपायकारक असतो, हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे, ते नजरेआड करता कामा नये.

 – डॉ. प्रदीप आवटे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.