September 11, 2024
प्लॅन | Plan your menu accordingly | Komal Damudre

असा करा मेन्यू प्लॅन | कोमल दामुद्रे | Plan your menu accordingly | Komal Damudre

असा करा मेन्यू प्लॅन

रोज डब्यासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी काय करायचे, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या, लहान मुलांच्या अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे रोजचा मेन्यू ठरवताना गृहिणीची तारांबळ उडते. अशा वेळी सुट्टीच्या एखाद दिवशी आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन केला आणि शक्य तेवढी तयारी केली तर ऐन वेळेला धावपळ होणार नाही. आठवड्याभराच्या मेन्यू प्लॅनिंगसाठी हे लक्षात ठेवा:

  • आठवड्याभराचा मेन्यू सुट्टीच्या दिवशी एकदाच ठरवावा. त्यामुळे दररोज कामाच्या घाईत जेवण / नाश्ता काय बनवायचे, हा विचार तुम्हाला त्रास देणार नाही.

  • आपले आठवड्याभराचे कामाचे वेळापत्रक पाहून त्यानुसार किंवा आपण किती वेळ घरात थांबू शकणार आहोत, घरी परत येण्याची आपली वेळ काय असेल, आठवड्यात कुठल्या दिवशी जास्त दगदग होईल आदी सर्व विचार करून आठवड्याचा मेन्यू प्लॅन करा.

  • ‘गुगल प्ले’ वर मेन्यू प्लॅनिंगचे काही मोफत अॅप आहेत. मेन्यू ठरविण्यासाठी या अॅप्सची मदत घेता येईल.

  • घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी किंवा बाजारात सहजासहजी उपलब्ध होऊ शकतील अशाच जिन्नसांच्या आधारे हा मेन्यू प्लॅन करा.

  • जर तुम्ही आधी भाज्या खरेदी केल्या असतील, तर त्यानुसार आठवड्याभराचा मेन्यू प्लॅनिंग करा किंवा घरात असणाऱ्या भाज्या आणि जिन्नसांचा वापर करून आपल्याला आठवड्याभरात काय काय बनवता येईल, ते ठरवा.

  • आठवड्याचा मेन्यू ठरविताना हवामानाचा व ऋतूबदलाचाही विचार करा.

  • मेन्यू प्लॅनिंग केल्यानंतर त्याची फोटोकॉपी आपल्याजवळ ठेवा म्हणजे बाहेरून किंवा ऑफिसवरून घरी येताना आठवड्याची भाजी व इतर सामान आणता येईल.

  • जे पदार्थ बनविण्यासाठी जास्त वेळ लागतो, असे पदार्थ सुट्टीच्या दिवशी बनवा किंवा आधीच त्यांची तयारी करून ठेवा.

  • काही वेळेस फ्रीजची साफ-सफाई करताना थोड्या थोड्या उरलेल्या पालेभाज्या, फळभाज्या मिळतात. या सर्व भाज्या एकत्र करून पराठे, पुलाव असे काहीतरी बनविता येईल.

  • आठवड्यातून किमान एकदा-तरी पालेभाजी बनवा अथवा पराठे, पुलाव, सॅलड वा इतर कोणत्याही पद्धतीने पालेभाजीचा आपल्या आहारात समावेश करा.

  • घरात भाजी नसल्यास किंवा आणायला विसरल्यास कडधान्याची उसळ / सॅलड / कोशिंबीर करता येईल.

  • काही विशिष्ट मेन्यू बनवायचा असल्यास एक-दोन दिवस आधीच तयारी करून ठेवावी, जेणेकरून ऐन वेळी तो पदार्थ बनविताना आपली धावपळ होणार नाही.

  • सुट्टीच्या दिवशी किंवा तुमच्या-कडे वेळ असेल तसे खोबऱ्याचे वाटण, आले-लसूण पेस्ट बनवून, खोबरे किसून फ्रीजमध्ये ठेवून द्या. लसूण सोलून ठेवा, कोथिंबीर निवडून ठेवा. असे केल्यास ऐन वेळी कामाचा जास्त ताण जाणवत नाही. भाजीही आदल्या दिवशी निवडून ठेवता येईल.

  • एखाद्या दिवशी बनविण्यासाठी अवघड किंवा किचकट भाज्या, कोशिंबिरी, चटणी, आमटी आणि दुसऱ्या दिवशी अगदीच साधे व सोपे असा स्वयंपाक न करता आठवडाभराचे काम समप्रमाणात विभागले जाईल, अशा पद्धतीने मेन्यू प्लॅन करा.

  • आठवड्यातून एखादा कधीतरी नावीन्यपूर्ण किंवा कलात्मक पाककृती करायची असल्यास दाक्षिणात्य /

फ्रेंच / चायनीज अशा इतर क्यूझिन-मधील पदार्थांची थीम घेऊन जेवण बनवा. यामुळे नवीन काही शिकताही येते, शिवाय चवीमध्येही सर्वांना बदल मिळतो.

  • सुट्टीच्या दिवशी तिखट, मीठ, मसाल्याचा डबाही भरून ठेवा, नाहीतर ऐनवेळी कामाच्या गडबडीत हे संपले, ते संपले अशी अडचण होऊ शकते.

अशा पद्धतीने मेन्यू आधीच तयार केला, तर बहुतांश तयारी आधीच करून ठेवता येते आणि आयत्या वेळी गडबड गोंधळ होत नाही.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कोमल दामुद्रे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.