आहार | old people food | nutritious food for old age | healthy food for old age | food for old age person | best food for old age | old age food | food for old people

वृद्धावस्थेतील आहार | डॉ.लीना राजे, पीएच.डी.(फूड सायन्स अँड न्यूट्रिशन)| Diet in old age | Dr. Leena Raje

वृद्धावस्थेतील आहार

उत्तम वृद्धावस्थेची तीन लक्षणे म्हणजे निरोगी निरामय आयुष्य, सतत काहीतरी कार्य करण्याची सिद्धी आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य. शास्त्रीय निकषांनुसार ६० वर्षांच्या पुढील व्यक्तीला वृद्ध म्हणून संबोधिले जाते. परंतु सद्य परिस्थितीत आयुर्मान खूप वाढले असल्यामुळे वयाच्या ८० वर्षांपर्यंत व्यक्ती व्यवस्थित कार्यरत राहून चांगले आयुष्य व्यतीत करताना दिसतात.

जसजसे वयोमान वाढत जाते, तसतसे व्यक्तीच्या प्रकृतीत बरेच बदल होतात.उदा., पचनसंस्थेचे कार्य मंदावते व त्यामुळे पचन नीट होत नाही. मेंदूमधील पेशींची संख्या कमी झाल्यामुळे विस्मरण वाढते. रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. हाडे व स्नायू यांची हालचाल मंदावते व त्यांच्यातील शक्ती / जोर कमी होतो. या सर्व बदलांमुळे वयोमानानुसार आपल्या आहारात बदल घडून येणे आवश्यक ठरते. शरीराच्या हालचाली मंदावल्यामुळे एकंदर उष्मांकाची गरज कमी होते. म्हणून त्या प्रमाणात आहारातून कर्बोदके व स्निग्ध पदार्थांचे सेवन कमी करणे उत्तम. परंतु प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे शरीरातील चयापचय व इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी आवश्यक असल्यामुळे त्यांचे प्रमाण आहारात व्यवस्थित असावे लागते.

असा असावा आहार :

  • आपण घेत असलेला एकंदर आहार हा पचण्यास हलका असावा, पण पोषणमूल्यांच्या दृष्टीने संपृक्त असला पाहिजे. प्रथिनांची कमतरता झाल्यास अ‍ॅनिमिया होतो व हाता-पायांवर सूज येते. प्रतिकारशक्ती कमी होते. एकंदरीत शरीराची शक्ती कमी होते. यासाठी दूध, दही, पनीर, अंडी, डाळी, कडधान्ये, मासे हे प्रथिनयुक्त पदार्थ पुरेसे प्रमाणात खायला हवेत. उष्मांकाच्या एकंदर गरजेपैकी ५०% उष्मांक हे कर्बोदकांमधून मिळतात, परंतु व्यक्ती मधुमेही असल्यास हे प्रमाण कमी करावे लागते. आहारामध्ये ब्रेड, बिस्किटे व मैद्यापासून बनविलेले इतर पदार्थ कमी प्रमाणात खाणे इष्ट असते.

  • वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेल/तुपाचा वापर संयमित असावा.

हाडांची झीज झाल्याने कॅल्शियमची गरज वाढते. कॅल्शियम व लोह यांचे शरीरात अभिशोषण कमी होत गेल्यामुळे या काळात ही दोन्ही खनिजे जास्त प्रमाणात सेवन करावीत. उष्मांकाच्या प्रमाणानुसार ‘ब’ जीवनसत्त्वाचे प्रमाण ठरते. परंतु एकूणच सर्वच जीवनसत्त्वांची या वयात शरीराला जास्त गरज असते. दृष्टीसाठी ‘अ’, हाडांसाठी व मानसिक आरोग्यासाठी ‘ड’ आणि शरीरातील सर्व पेशींचे आरोग्य कायम ठेवण्यासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाचीही गरज खूप असते.

हे लक्षात ठेवा :

  • वृद्ध व्यक्तींच्या जेवणाबाबतीत दिवसभराचे आयोजन करताना सकाळी भरपूर नाश्ता द्यावा, दुपारचे जेवण व्यवस्थित असावे व रात्रीचे जेवण कमी प्रमाणात द्यावे. शौचाला नियमित होण्यासाठी तंतुमय पदार्थांनी युक्त आहार घेणे गरजेचे आहे.उदा., सालासकट फळे, पालेभाज्या.

  • वर नमूद केल्याप्रमाणे, वृद्धावस्थेमध्ये शारीरिक बदलांनुसार आहारात खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी-जास्त करून वृद्ध व्यक्तीचे आरोग्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करावे. शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित पार पडून दिवसभरासाठी चांगली ऊर्जा राहावी व कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, या दृष्टीने सतर्कता दाखवली गेली तर त्याचा फायदा होईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ.लीना राजे, पीएच.डी.(फूड सायन्स अँड न्यूट्रिशन)

One comment

  1. Girish Shsh

    अत्यंत उपयुक्त

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.