अनपत्यता | Aayurved and Childlessness | Dr Vineeta Bendale | No Pregnancy | New Parent

आयुर्वेद आणि अनपत्यता | वैद्य विनीता बेंडाळे | Aayurved and Childlessness | Dr Vineeta Bendale

 

गेल्या काही वर्षांत आरोग्याशी संबंधित अनेक नवनवीन समस्या निर्माण होताना दिसतात. त्यात ‘अनपत्यता’ म्हणजेच मूल न होण्याच्या समस्येचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आजच हे प्रमाण का वाढले आहे? काय आहेत यामागची कारणे?

साधारणतः पाळीच्या बाराव्या ते चौदाव्या दिवशी स्त्रीबीज निर्मिती म्हणजे ovulation होत असते. या दरम्यान शरीरसंबंध येऊन पुरुषबीज (sperms) स्त्रीच्या योनिमार्गातून प्रवेश करून गर्भाशयनलिकेत पोहोचल्यास स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्रित येऊन गर्भधारणा होण्याची शक्यता असते. ही प्रक्रिया घडून येण्यासाठी त्यात अंतर्भूत असणारे सर्व घटक व प्रक्रिया सुरळीत होणे आवश्यक असते. केवळ स्त्रीबीज व पुरुषबीज यांची निर्मिती घडून येणे पुरेसे नसते, तर त्याबरोबर त्यांची प्रत उत्तम असणे म्हणजेच बीज सकस असणे फार आवश्यक असते. काही वेळा हार्मोन्समधील असंतुलन, Polycystic ovary syndrome (PCOS), वजन वाढणे, थायरॉइड ग्रंथीचे कार्य बिघडणे, मानसिक ताण, वय अधिक असणे या साऱ्या कारणांमुळे स्त्रीबीज निर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित होत नसते किंवा ते बीज योग्य प्रतीचे नसते. पुरुषबीजांची संख्या, त्यांचा वेग, तसेच त्यांची रचना या सगळ्या गोष्टी योग्य असणे हे गर्भधारणेसाठी आवश्यक असते. हार्मोन्समधील असंतुलन, दौर्बल्य किंवा शरीरसंबंधांच्या वेळी येणाऱ्या इतर अडचणी, मानसिक ताण, स्थौल्य, मधुमेह, प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांना मार लागणे या साऱ्या कारणांमुळे पुरुषबीजांशी संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात.

योनिमार्गात प्रवेश करताना पुरुषबीजांची (sperms) संख्या ही लाखांमध्ये असते. परंतु गर्भाशय-नलिकेमध्ये म्हणजे स्त्रीबीजापर्यंत पोहोचेपर्यंत ही संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी होऊ शकते. पुरुषबीजाची सकसता आणि स्त्री शरीरातील अपत्यमार्गातील आरोग्य यावर पुरुषबीजाचा प्रवास यशस्वी होणे अवलंबून असते. योनिमुखात (vagina) काही संसर्ग असणे किंवा काही वेळा संबंध येताना योनिमुखाच्या स्नायूंचा तीव्र संकोच होऊन (Vaginismus) संबंध नीट न होणे यासारख्या अडचणी असू शकतात तर गर्भाशयमुखाला (cervix) संसर्ग होणे किंवा तिथले स्राव अतिशय घट्ट असणे हे पुरुषबीजांसाठी हानिकारक ठरू शकते. गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स, गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूने पेशींची वाढ होणे (endometriosis), गर्भाशयाच्या स्नायूंमुळे गर्भाशयाच्या आतील बाजूला इजा पोहोचणे (adenomyosis) यांसारख्या काही आजारांमुळे गर्भधारणा व्हायला किंवा गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयामध्ये गर्भ रुजायला अडचणी निर्माण होऊ शकतात. गर्भाशयातील आतील स्तराची (endometrium) वाढ योग्य प्रकारे होत नसेल तरी गर्भ रुजण्यात अडथळा येतो. काही कारणामुळे गर्भाशयनलिकेमध्ये अडथळा निर्माण झाला असेल, तर त्यामुळे गर्भधारणेत अडचण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर गर्भधारणेसाठी दोन्ही जोडीदारांची मानसिकताही अनुकूल असणे अत्यंत महत्त्वाचे असते.

यापैकी कोणत्याही कारणामुळे गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्यास दाम्पत्याला संततीसुख मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. ‘अनपत्यता’ असे निदान झाल्यास त्या संबंधित चिकित्सांचे चक्र सुरू होते. या सगळ्याचा त्या जोडप्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर येणाऱ्या सामाजिक दडपणामुळे बऱ्याचदा त्या जोडप्याच्या मनात एकूणच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक स्तरावर विपरीत परिणाम
तर होतोच, याशिवाय घेत असलेल्या उपचारांचाही योग्य तो परिणाम होऊ शकत नाही.

अशी समस्या(अनपत्यता) सतावते तेव्हा सर्वप्रथम वस्तुस्थिती स्वीकारा. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात, तसेच हीसुद्धा एक समस्या आहे आणि त्यावर योग्य उपाययोजना केल्या जाऊ शकतात, अशा स्वरूपाची विचारधारा ठेवणे हितकारक ठरते.

आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने गर्भधारणा राहण्यासाठी स्त्री व पुरुषबीज उत्तम प्रतीचे असणे, स्त्री प्रजनन संस्थेतील सर्व अवयव निरोगी असणे, दोन्ही जोडीदारांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, त्यांचे वय योग्य असणे, योग्य काळी म्हणजे स्त्रीबीज निर्मितीच्या दरम्यान संबंध घडून येणे या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. काही वेळा दोन्ही जोडीदारांच्या सर्व तपासण्या निर्दोष असूनही गर्भधारणा होत नाही. अशा वेळेला वरील सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून चिकित्सा योजना केली असता यश आल्याचे अनेकदा दिसून येते. पोटातून घेण्याच्या औषधांबरोबरच आयुर्वेदातील पंचकर्म, योनिधावन, योनिपिचू, उत्तरबस्ती यांसारखे उपचार विशेष परिणामकारक ठरतात. बस्ती, उत्तरबस्ती या उपचारांमुळे स्त्रीबीज निर्मितीचे कार्य उत्तम प्रकारे घडून येते. PCOS च्या रुग्णांमध्येही हे प्रमाण विशेष सुधारते. योनिमुख किंवा गर्भाशयमुखाच्या विकारांची चिकित्सा करण्यासाठी, तेथील स्राव पुरुषबीजांसाठी उपकारक करण्याच्या दृष्टीने योनिधावन, योनिपिचू यांसारख्या चिकित्सा अत्यंत उपयुक्त ठरतात. गर्भाशय नलिकेतील अडथळे (blockages) दूर करण्यासाठी, endometriosis, adenomyosis यांसारख्या आजारांची चिकित्सा करण्यासाठी, तसेच गर्भधारणेसाठी आवश्यक अशा गर्भाशयाच्या आतील स्तराची वाढ योग्य होण्याच्या दृष्टीने उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. पुरुषबीज निर्मितीची प्रक्रिया सुधारण्यासाठी म्हणजे त्यांची संख्या, वेग, रचना या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा होण्यासाठी आणि संबंध घडून येताना निर्माण होणाऱ्या अडचणींसाठीही औषधे आणि पंचकर्मातील काही चिकित्सा पद्धतींचा चांगला उपयोग होतो. योग्य वेळेला योग्य तपासण्यांच्या आधारे चिकित्सेची दिशा ठरवली जाते.

या सगळ्याबरोबरच जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल करावे लागतात. आहाराचे स्वरूप, प्रमाण, वेळा याबरोबरच त्याचे पचन कसे होते ही गोष्ट एकूणच चयापचय प्रक्रियेच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते. तसेच नियमित झोप, योग्य प्रमाणात नियमित व्यायाम करायला हवा. सतत अत्याधिक प्रमाणात व्यायाम करण्याचाही प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे काही अभ्यासावरून लक्षात आले आहे. मासिक पाळीच्या दरम्यान आहार हलका असावा, व्यायाम करू नये अशा स्वरूपाच्या सूचना आयुर्वेदात दिलेल्या आहेत. मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीच्या विशिष्ट अवयवांवर आणि एकूणच शरीरावर नेहमीपेक्षा अधिक ताण असतो. त्यामुळे या काळात योग्य ती काळजी घेतली नाही तर पाळी अनियमित होणे, पाळीच्या वेळेस पोट दुखणे, अंगावरून जास्त जाणे अशा स्वरूपाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा संबंध पुढे अनपत्यतेच्या कारणांशी असू शकतो. नियमित प्राणायाम आणि ध्यान हे शारीरिक व मानसिक स्तरावर पुष्कळ सकारात्मक बदल घडवून आणतात.

अनपत्यता’ ही समस्या आज मोठ्या प्रमाणावर दिसून येत असली, तरी सकारात्मकतेची ऊर्जा आणि योग्य चिकित्सेची दिशा यांच्या आधारे या समस्येवर योग्य तो मार्ग काढणे शक्य आहे. अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैद्य विनीता बेंडाळे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.