शाही कॉर्न मसाला स्टफ्ड खाजा | गौरी विचारे, मुंबई | Shahi Corn Masala Stuffed Khaja | Gauri Vichare, Mumbai

Published by गौरी विचारे, मुंबई on   September 8, 2021 in   Recipes

शाही कॉर्न मसाला स्टफ्ड खाजा

साहित्य : २ कप मक्याचे दाणे, १/२ कप खोवलेले खोबरे, १/२ कप चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ चमचा भाजून जाडसर कुटलेली धणे-बडीशेप पूड, १ चमचा तीळ, १ चमचा लाल तिखट, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा साखर, २ चमचे काजू-बेदाणे (बारीक तुकडे केलेले), आवश्यकतेनुसार तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ व चीझ.

पारीसाठी : २ कप मैदा, २ चमचे कॉर्नफ्लोअर, ४ चमचे गरम तुपाचे मोहन, आवश्यकतेनुसार दूध, पाणी, ३-४ चमचे फेटलेले तूप व २-३ चमचे कॉर्नफ्लोअरचे मिश्रण, मीठ, टोमॅटो सॉस, तळण्यासाठी तेल.

सारणासाठी : मक्याचे दाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. कढईत तेल तापवून मोहरी, हिंग, हळद व वाटलेला मका, खोवलेले खोबरे घालून परतवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धणे-बडीशेप पूड, तीळ, हिरवी मिरची घालून चांगले परतवून वाफ  काढा. त्यात आवश्यकतेनुसार मीठ, लिंबाचा रस, साखर, चिरलेली कोथिंबीर व काजू-बेदाणे घालून चांगले मिक्स करा. सारण थंड झाल्यानंतर चीझ किसून घाला.

कृती : सर्वप्रथम मैदा, कॉर्नफ्लोअर, गरम तुपाचे मोहन, आवश्यकतेनुसार दूध, पाणी व मीठ घालून पीठ मळून घ्या. थोड्या वेळानंतर मळलेल्या पिठाच्या तीन पातळ पोळ्या लाटून घ्या. त्यावर तूप-कॉर्नफ्लोअरचे मिश्रण पसरवून एकावर एक पोळ्या ठेवून रोल करा. तयार रोलचे एक इंचाइतके काप करून पुरी लाटून घ्या. एका पुरीवर तयार केलेले सारण पसरवून पुरीच्या कडेला पाणी लावून दुसरी पुरी ठेवून कडा दाबून घ्या. गरम तेलात तयार केलेला खाजा मंद आचेवर तळून घ्या. त्यावर चीझ किसून घाला. टोमॅटो सॉसने सजवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गौरी विचारे, मुंबई