भरवा करटुली | Spiny Gourd | रानभाज्या

Published by ज्योती खोपकर on   August 4, 2021 in   रानभाज्या

भरवा करटुली

मराठी नाव : करटुली

इंग्रजी नाव : Spiny Gourd

शास्त्रीय नाव : Momordica dioica

आढळ : महाराष्ट्रातील जंगलात सर्रास आढळते.

कालावधी : जून ते ऑगस्ट

वर्णन : सर्वात लोकप्रिय आणि बाजारात सहज उपलब्ध असलेली ही रानभाजी आहे. रुंद हृदयाकृती दातेरी कडांची पाने असलेली ही नाजूक खोडाची वेल आहे. याला भोपळ्याच्या फुलासारखी पण छोटी पिवळी फुले लागतात. याला पोपटी तजेलदार रंगांची ५ ते ७ सेंटीमीटर्सची लंबगोलाकृती फळे लागतात. करटुल्याच्या फळांवर नाजूक काटेरी आवरण असते.

साहित्य : १/४ किलो करटुली, १/२ वाटी शेंगदाण्याचे कूट, १/२ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे, २ चमचे गोडा मसाला, १ चमचा तिखट, हळद, २ चमचे चिंचेचा कोळ, १/२ चमचा साखर, तेल, १/२ चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ.

करटुल्यात भरण्यासाठी तयार करायचा मसाला – दाण्याचे कूट, भाजलेले खोबरे, सर्व मसाले, चिंचेचा कोळ, मीठ, साखर एकत्र करून घ्यावे.आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालावे.

कृती : करटुली स्वच्छ धुऊन घ्यावीत. मसाला भरण्यासाठी करटुल्यावर चीर द्यावी. आतील बिया काढून टाकाव्यात. हा मसाला करटुल्यामध्ये भरून घ्यावा. कढईत तेल गरम करून मसाला भरलेली करटुली त्यात सोडावीत. मसाल्यातच मंद छान शिजू द्यावीत. चमच्याने सारखी हलवू नयेत. शेवटी खाताना त्यावर चाट मसाला भुरभुरावा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– ज्योती खोपकर