बेसनी मटार रस्सा

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   April 29, 2019 in   2019Food Corner
  • साहित्य :

२५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर.

  • कृती :

बेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे. त्यात चवीपुरते मीठ, हळद घालावी. जाड बुडाच्या भांड्यात एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात हे मिश्रण घालून सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होत आल्यावर एक दणदणीत वाफ आणावी. तेल लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण घालून थंड करण्यास ठेवावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे ज़्रावेत.ते तेलात तळून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.सर्व मसाले एकत्र वाटावेत. कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबीसर परतून घ्यावा. त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. दही घालून चांगले परतून घ्यावे. मटार घालावा. चवीनुसार मीठ घालून एक कप गरम पाणी घालून मटार शिजवून घ्यावा. गरज वाटल्यास अधिक पाणी घालावे. मटार शिजल्यावर उकळी आल्यावर त्यात बेसनाच्या तळलेल्या पाटवड्या घालून एक वाफ काढावी. कोथिंबिरीने सजवून पोळी किंवा भाजीसोबत सर्व्ह करावे.