फुलांचं जग | शिरीष पै

Published by शिरीष पै on   November 15, 2019 in   2019Diwali Editionमराठी लेखणी

 

माझ्या वडिलांना चाफ्याची फुले फार आवडत. मला हिरवा चाफाही फार आवडतो. पण अलीकडे हिरव्या चाफ्याची फुले फारशी पाहायला मिळत नाहीत.आमच्या घरापुढे मोठी बाग होती आणि एक पारिजातकाचे सुंदर झाड होत. रोज पहाटे झाडाखाली फुलांचा सडा पडायचा. सकाळी उठले कीप्रथम मी फुले वेचायला धावायची आणि पारिजातकांचा फुलांचा हार गुंफायची. तशाच आमच्या बागेत जाईजुईंच्या वेलीही होत्या. मला जाईच्या फुलांचा हार गुंफायला फार आवडायचे. पुण्याहून आम्ही मुंबईला राहायला आलो तेव्हाही मी घरापुढे लहानशी बाग केली. एके दिवशी अचानक एक गंमत झाली. बागेत एक निळसर जांभळ्या पानांचे अपरिचित झाड उगवलेले पाहिले. ते उंच वाढतच राहिले. एके दिवशी त्याच्या टोकाला एक जांभळे फूल उगवले. असे झाड आणि असे फूल मी पूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्या फुलाला वास नव्हता पण ते सुंदर टपोरे होते. काही दिवसांनी ते झाड जसे आपोआप उगवले तसेच आपोआप कोमेजूनही गेले.

कुणीतरी मला एका गमतीदार झाडाची कुंडी बक्षीस दिली. ह्या झाडावर पौर्णिमेला फूल उगवले आणि त्याचा मधुर सुगंध बागभर पसरला. सकाळ उजाडली तेव्हा ते पार मावळून गेले होते.

आमच्या घरमालकानी बागेत एक कण्हेरीचे झाड लावले होते. ते फुलांनी डवरून गेले होते. पुण्याला मी राहत असताना कण्हेरीची फुले प्रेतावर उधळलेली पाहिली होती. तेव्हा हे अपशकुनी झाड आपल्या बागेत नको म्हणून मी माळ्याला ते मुळापासून तोडायला लावले. आणि त्या जागी रातराणीचे झाड लावले. कालांतराने रातराणीच्या झुडपावर असंख्य फुले उगवली. रात्री त्यांचा सुगंध बागभर दरवळायचा. एके दिवशी घरमालकाकडून ते झाड उपटून टाकायचा आदेश आला. कारण त्यांना त्याचा तिरस्कार होता. त्यामुळे रात्रीच्या रातराणीचा सुगंध त्यांना सहन होत नसे. नाइलाजाने मला रातराणीचे झाड मुळापासून तोडायला लागल. मी कण्हेरीचे झाड तोडलेत्याचा हा जणू सूड होता.

आमच्या घरातल्या एका खोलीच्या बाजूला एका पिवळ्या फुलांचे सुंदर झाड होते. काही दिवसांनी त्या झाडाची एक फांदी खिडकीतून आत घुसली आणि आमच्या खोलीत पिवळी फुले पडू लागली. पुढे हे झाड मालकांनी घराभोवती फरशा बसवण्याकरिता तोडून टाकले आणि आमच्या घरात पिवळी फुले पडायचे बंद झाले.

फुले हा माणसाच्या जीवनातला केवढा आनंद आहे ! फुले जगात नसती तर माणसाला सुगंध म्हणजे काय हे कधी कळले असते का ?

फुलांचे महत्त्व माणसाच्या जीवनात केवढे आहे ! फुले आपण देवाला वाहतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या आणि केशरी रंग लावून आपण देव मानलेल्या धोंड्यालाही ती वाहतो. तसबिरींवर आपण फुलांचे हार घालतो. समारंभात आलेल्या पाहुण्यांनाही आपण  पुष्पगुच्छ  देतो. प्रियकर  प्रेयसीच्या  हातात  प्रेमाने गुलाबाचे फूल देतो. आणि …. आणि प्रेतावरही आपण फुलेच टाकतो. माणसांच्या जगातले हे फुलांचे जग किती सुंदर आहे ! !!

 

कपबशी कुठलीही असो

पण चहा

मधुर हवा

 

संबंध संपले

दुःख नाही ह्याचे !

हे व्हायचेच होते

 

जमिनीवरील अन्नातून

खातो कावळा अन्न

आणि त्यासह मातीही

 

उन्हे उतरली

सूर्य मावळला

अंधार कसा नाही पडला

 

बाहेर प्रकाश आहे

प्रकाश घरात आहे

तरी दिवा जळतो आहे

 

लहानपणी मुले

आईवर प्रेम करतात

मोठेपणी भांडतात

  

सारखे तुला

भेटत राहावे

कविता करीत जगावे

 

साखरेचा कण

आहे एवढासा

ऊस किती आटला

 

तुझी आठवण आली

सारे अंग थरथरले

जणु तुलाच भेटले

 

तो गाऊ लागला

वाटलेआपणही गावे

सुरात सूर मिसळावे

 

पाऊस थांबला

थांबला वाराही

उघडली खिडकी मीही

 

वाऱ्यासारखा आलास

आणि वादळासारखा

निघून गेलास

  

चमत्कार झाला

मुंगी डसली

नाग मेला

 

असेल जनावर

जंगलातलं

पण किती सुंदर

 

जेव्हा जेव्हा मी

खिडकीबाहेर बघते

तेव्हा फुलपाखरू दिसते

 

कुणीही नाही घरात

कुणाला तरी पोचवायला

गेलेत सारे स्मशानात

 

मृत्यूनंतर आपण

कुठल्या जगात जातो?

आयुष्यावाचून कसे जगतो ?

 

मृत्यू जवळ आला

आता काय करायचं ?

आता मरायचं

 

उडून जातो कागद

जसा वाऱ्यावर

मी तशीच जाणार

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– शिरीष पै